हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले कमी

हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले कमी
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले कमी

नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर कमी झाल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. गेल्या आठवड्यात कळमणा बाजार समितीत ३७०० ते ४१३२ रुपये क्‍विंटल असलेली तूर ३४०० ते ३९०० रुपये क्‍विंटलवर आली. आयातीच्या परिणामी तुरीचे दर आणखी कमी होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला.  कळमणा बाजार समितीत गहू, हरभरा, ज्वारी, तुरीची आवक होत आहे. मोझांबिकवरून केंद्र सरकारने तूर आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच शासकीय हमीभाव खरेदीदेखील बंद करण्यात आली. त्याचा फटका बाजाराला बसत तुरीचे दर कोसळले. गेल्या आठवड्यात ४१०० रुपये क्‍विंटलपर्यंत असलेली तूर ३९०० रुपयांपर्यंत खाली आली. तुरीची बाजारातील रोजची सरासरी आवक एक हजार क्‍विंटलच्या घरात आहे. बाजारात लुचई तांदूळाची आवक होत असून २२०० ते २५०० रुपये असे तांदूळाचे दर आहेत. तांदूळाची रोजची आवक ९० ते १०० क्‍विंटलची आहे. हरभऱ्याची सर्वाधिक पाच हजार क्‍विंटलपेक्षा रोजची आवक आहे. ३००० ते ३३६० रुपये क्‍विंटल असे हरभऱ्याचे दर आहेत. १८ तारखेला मूगाची अवघी ११ क्‍विंटल आवक झाली. ४३०० ते ४५०० रुपये क्‍विंटल असा मुगाचा दर होता. उडीदाचीदेखील आठवड्यात एकदाच आवक झाली. १८ मे रोजी २१ क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. ३२०० ते ३५०० रुपये क्‍विंटलने उडीदाचे व्यवहार झाले. बाजारात सोयाबीनची आवक नियमित असून ४५० ते ५०० क्‍विंटल अशी आवक होते. ३००० ते ३५०० रुपये क्‍विंटलचा दर सोयाबीनला मिळत आहे. नाशिक परिसरातून द्राक्षाची आवक होत आहे. सरासरी ४० क्‍विंटलची द्राक्षाची आवक असल्याचे सांगण्यात आले. ४००० ते ६००० रुपये क्‍विंटलचा दर द्राक्षाला असल्याचे सांगण्यात आले. डाळिंब गेल्या पंधरवाड्यापासून २००० ते ८००० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले आहे. डाळिंबाची सरासरी ६०० क्‍विंटलची आवक आहे. तोतापल्ली आंबादेखील बाजारात नियमित येत आहे. सरासरी ३५०० ते ४००० क्‍विंटल इतकी मोठी आंब्याची आवक आहे. गेल्या आठवड्यात १८०० ते २४०० रुपये क्‍विंटल तोतापल्ली आंब्याचे दर होते. त्यात घसरण होत ते या आठवड्यात १२०० ते २००० रुपयांवर पोचले आहेत. बटाट्याचे दर १६०० ते १८०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले आहेत. २८०० ते ३००० क्‍विंटलची बटाट्याची रोजची आवक आहे.  मोसंबीची आवक नियमित हंगाम संपल्याच्या परिणामी संत्र्याची नसली तरी मोसंबीची आवक मात्र होत आहे. मोठ्या आकाराच्या मोसंबी फळाची सरासरी ५० ते ६० क्‍विंटलची आवक आहे. गेल्या आठवड्यात सर्वाधिक १०० क्‍विंटल आवक झाली होती. त्यानंतर आवक कमी होत गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ३००० ते ३५०० रुपये क्‍विंटलने मोसंबीचे व्यवहार होत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com