मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येत असू
अॅग्रो विशेष
तुरीला मिळणार दराची ‘फोडणी’
देशात यंदा तूर उत्पादनात घटीचा अंदाज आहे. त्यातच पाऊस व वातावरणाचा दर्जावर परिणाम झाला आहे. सध्या बाजारात तुरीची आवक सुरू झाली आहे.
पुणे ः देशात यंदा तूर उत्पादनात घटीचा अंदाज आहे. त्यातच पाऊस व वातावरणाचा दर्जावर परिणाम झाला आहे. सध्या बाजारात तुरीची आवक सुरू झाली आहे. दर्जेदार तुरीला ६२५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तूर उत्पादनात यंदा १० ते ३० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा तुरीला चांगले दर मिळतील, असा अंदाज व्यक्त करत शेतकऱ्यांनी एकदाच माल बाहेर न काढता टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असे आवाहन बाजारातील जाणकारांनी केले आहे.
देशात यंदा खरिपात मूग आणि उडीद या कडधान्य पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर तूर पिकालाही फटका बसला. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेला पाऊस, त्यानंतर डिसेंबरमधील अवकाळी आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाचा फटका तूर पिकाला बसला. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशातही पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
सध्या राज्यातील बाजारात तुरीची काही प्रमाणात आवक सुरू झाली आहे. मात्र आवकेचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही. सध्या राज्यातील ठिकठिकाणच्या बाजारात ६ हजार ते १२ हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. सध्या दरही चांगले असून, हे दर कायम राहण्याची शक्यता आहे.
उत्पादन, दर्जावर परिणाम
यंदा पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे तूर उत्पादनाला फटका बसला आहे. तुरीचा दाणा बारीक राहिल्याने एकूण उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारातील व्यापारी आणि विश्लेषकांच्या मते तूर उत्पादन यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात ३.८३ दशलक्ष टन तूर उत्पादन झाले होते. त्यातच मालाच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी पीक काळवंडले असून, अनेक ठिकाणी दाणा बारीक राहिला आहे.
तूर भाव खाणार
देशात एकूणच कडधान्य पिकांचे उत्पादन घटल्याने तूर भाव खाणार आहे. सध्या तुरीला ४७०० ते ६२५० रुपये दर मिळत आहे. बाजारात एकदम आवक झाल्यास दर २०० ते ३०० रुपयांनी दबावात येण्याची शक्यता आहे. मात्र एकूणच उत्पादन कमी असल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कडधान्यांत तेजी असल्याने पुढील काळात तूर हमीभावाच्या खाली येणार नाही, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
बाजारातील स्थिती
- उत्पादनात १० ते ३० टक्क्यांपर्यंत घट शक्य
- पाऊस, ढगाळ हवामानाचा दर्जावर परिणाम
- दर्जेदार तुरीला ५८५० ते ६२५० रुपयांपर्यंत दर
- आवक वाढल्यास दर ३०० रुपयांपर्यंत तुटण्याची शक्यता
- आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कायम
- निर्यात वाढण्याची शक्यता
- टप्प्याटप्प्याने तूर विकण्याचे जाणकारांचे आवाहन
प्रतिक्रिया
बाजारात तुरीची आवक सुरू झाली आहे. पंधरवाड्यानंतर आवक वाढेल. यंदा उत्पादनात १० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घटीचा अंदाज आहे. तुरीला ५८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
- अशोक अग्रवाल, तूर व्यापारी, लातूर
- 1 of 674
- ››