संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात अडीच हजार हेक्टरने घट

हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात ३२ हजार ५३४ हेक्टरवर हळद लागवड झाली आहे. गतवर्षी (२०१८-१९) च्या तुलनेत यंदा हळद लागवड क्षेत्रात २६६७ हेक्टरने घट झाली आहे. यंदा जिल्ह्यात पावसाचे आगमन उशिरा झाले, त्यामुळे हळद लागवडीस विलंब झाला. कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उलब्धता नसल्यामुळे यंदा हळद लागवड क्षेत्रात घट झाली आहे.

केळी, ऊस या जास्त पाण्याची गरज असलेल्या पिकांच्या तुलनेत कमी पाण्यावर किफायतशीर उत्पादन मिळत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात गेल्या पाच वर्षांपासून वाढ होत आहे. त्यामुळे प्रमुख हळद उत्पादक जिल्हा म्हणून हिंगोलीची ओळख निर्माण झाली आहे. सिंचनासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार तसेच पावसाच्या आगमनानुसार दरवर्षी मे महिन्याचा अखेरचा आठवडा ते जून महिन्यापर्यंत हळद लागवड केली जाते. परंतु, गतवर्षीच्या दुष्काळामुळे यंदा मे महिन्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध नव्हते. पावसाचे आगमन देखील उशिरा झाल्याने यंदा हळद लागवडीस उशीर झाला. यंदा कमी पावसामुळे विहिरींना पाणी आलेले नाही. सिध्देश्वर प्रकल्पामध्ये देखील उपयुक्त पाणीसाठा नाही. त्यामुळे सिंचनाची खात्री नसल्यामुळे हळद लागवड क्षेत्रात यंदा २ हजार ६६७ हेक्टरने घट झाली. जिल्ह्यात ३२ हजार ५३४ हेक्टरवर हळद लागवड झाली आहे.

जिल्ह्यामध्ये २०१५-१६ मध्ये १६ हजार ४४२  हेक्टरवर हळद लागवड झाली होती. परंतु, अल्प पावासमुळे उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीचा हळद उत्पादकांना मोठा फटका बसला होता. २०१६-१७ मध्ये २४ हजार १९६ हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. चांगल्या पावसामुळे उत्पादनही चांगले आले होते. परंतु, कमी दरामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. २०१७-१८ मध्ये २५ हजार ५४२ हेक्टरवर लागवड झाली होती. २०१८-१९ मध्ये हळदीच्या क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे ९ हजार ६५९ हेक्टरने वाढ होऊन ३५ हजार २०१ हेक्टरवर लागवड झाली होती. गतवर्षीपर्यंत जिल्ह्यातील हळद लागवड क्षेत्रात वाढ होत गेली. परंतु, यंदा मात्र २ हजार ६६७ हेक्टरने घट झाली असून एकूण ३२ हजार ५३४ हेक्टरवर लागवड झाली आहे.  

तालुकानिहाय हळद लागवड स्थिती (हेक्टर)
तालुका  २०१८ २०१९
हिंगोली ४५५९ ४७७३
कळमनुरी ५०००  ४८६४
वसमत  १६७०० १४९८०
औंढा नागनाथ ४८५२ ४९००
सेनगाव  ४०९० ३०१७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com