सांगली बाजारात हळदीचे दर स्थिर 

गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर असून, हळदीच्या दरात १०० ते २०० रुपयांचा चढ-उतार होत आहे. आतापर्यंत हळदीचा हंगाम ६० टक्के पूर्ण झाला आहे, अशी माहिती हळद व्यापाऱ्यांनी दिली.
turmeric powder
turmeric powder

सांगली ः गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर असून, हळदीच्या दरात १०० ते २०० रुपयांचा चढ-उतार होत आहे. आतापर्यंत हळदीचा हंगाम ६० टक्के पूर्ण झाला आहे, अशी माहिती हळद व्यापाऱ्यांनी दिली. सांगलीच्या हळद बाजार मेअखेर सुरू राहील, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

सांगली बाजार समितीत हळदीचा बाजार वाढू लागला आहे. हळदीचा बाजार प्रामुख्याने जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत सुरू राहतो. या दरम्यान, सांगलीसह परराज्यातील हळद विक्रीला येते. बाजार समितीत दररोज २५ हजार ते ३० हजार क्विंटल हळदीची आवक होत आहे. यंदा देशात हळदीच्या उत्पादनात २० टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला असून, यंदा सुमारे ८० लाख पोत्यांचे उत्पादन होईल. सध्या देशातील बाजारपेठेत हळदीची विक्री सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात हळदीची काढणी झाली होती. शेतकऱ्यांनी हळद शिजवून वाळण्यासाठी टाकली होती. त्याच दरम्यान, बहुतांश ठिकाणी पाऊस झाला होता. तसेच दरही पडले होते. त्याचा फटका हळदीला बसला आहे. काही ठिकाणी हळद लाल होण्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम दरावरही झाला आहे. परंतु आतापर्यंत किती पोत्यांची विक्री झाली आहे, हे आताच सांगता येणार नाही, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.  पावडरला मोठी मागणी  निजामाबादहून हळदीची निर्यात सुरू आहे. निर्यातक्षम हळदीचा दर प्रति क्विंटल ८५०० रुपये इतका आहे. सांगलीच्या हळद पावडरीला मागणी अधिक आहे. सर्वसाधारणपणे दररोज २०० ते ३०० टन हळदीची विक्री होत असून, पावडरीला प्रति क्विटंल ९५०० ते ११५०० रुपये असा दर मिळतो आहे. यंदा देशातून हळद आणि पावडरीची निर्यात वाढेल. हळदीचा हंगाम ६० टक्के पूर्ण झाला आहे. आता ४० टक्के हंगाम उरला आहे. या दरम्यान, हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची शक्यता नसून दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.  सांगली बाजार समितीतील हळदीचे दर (प्रति क्विंटल)  सेलम कणी  : ७८०० ते ८२००  देशी कडपा   : ७५०० ते ८०००  मध्यम  : ८५०० ते ९०००  उच्च सेलम  : ९००० ते १०५००  लगडी  : १०५०० ते ११५००  प्रतिक्रिया  यंदा हळदीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात ८० लाख पोती हळदीचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. सांगली बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर आहेत. तसेच सांगलीतून हळद पावडरची मागणीही वाढली आहे. त्यामुळे हळद पावडरीला दरही चांगले मिळत आहेत.  - गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com