बाजारात हळदीचे दर दबावात

बाजारात हळदीचे दर दबावात
बाजारात हळदीचे दर दबावात

सांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण असल्याने उत्पादनात १० लाख पोत्यांनी वाढ झाली. मात्र, याचा फटका दराला बसला आहे. सध्या बाजारात गेल्यावर्षीच्या तुलनेत हळदीचे दर प्रतिक्विंटलला ८०० ते १००० कमी झाले आहेत. भविष्यात दरासंबंधी अनिश्‍चितता हळद उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. देशातील आंध्रप्रदेश, तमीळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या हळद उत्पादन राज्यात सरासरी मागील वर्षी २ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड होते. सन २०१८ मध्ये हळदीचे क्षेत्र स्थिर होते. देशात दरवर्षी सुमारे ७५ लाख पोत्यांचे (७० किलोचे पोते) हळदीचे उत्पादन होते. तर शिल्लक २० ते २५ लाख पोती असतात. त्यामुळे हळदीच्या दरात तेजी मंदी होते. शेवट्याच टप्प्यात हळदीच्या दरात प्रतिक्विंटलला ३००  ते ५०० रुपयांची वाढ होते.  दरम्यान, गेल्यावर्षी हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात चांगला पाऊस झाला, रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे हळदीचे उत्पादनात १० लाख पोत्यांनी वाढ झाली. हळदीचे ७५ लाखा पोत्यावरून ८५ लाख पोत्याचे उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी २० ते २५ लाख पोती हळद शिल्लक होती. वास्तविक पाहता शिल्लक हळद आणि उत्पादन झालेली हळद अशी एक कोटी पाच लाख ते एक कोटी १५ लाख पोती बाजार विक्रीस आली. त्यामुळे मागणी कमी झाल्याने दरात तेजी झाली नाही. दोन वर्षांपूर्वी हळदीला ६ हजार ५०० ते १० हजार प्रतिक्विंटल असा दर मिळाला होता. गेल्यावर्षी हळदीचा दर प्रतिक्विंटल ८ ते ९  हजार रुपये इतकाच राहिला. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.  हळदीचे दर होणार कमी सन २०१७ मध्ये हळदीचे उत्पादन ७५ लाख पोती झाले, शिल्लक पोती २० ते२५ लाख असे एकूण ९५ ते १ कोटी हळदीची पोती विक्रीस आली. सरासरी ९ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. मात्र, गेल्यावर्षी हळदीच्या मधल्या टप्प्यात ३०० ते ५०० रुपयांनी दर कमी झाले तर गेल्या महिन्यात हळदीच्या दरात पुन्हा ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली. अर्थात एका वर्षात सुमारे हळदीच्या दरात ८०० ते एक हजार रुपयांनी दर कमी झाले असल्याचे दिसते आहे.  हळद उत्पादनाची स्थिती 

  • मागील वर्षी २ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड
  • सात महिन्यांत १८ ते २० लाख पोत्यांची होणार विक्री
  • डिसेंबर अखेर २५ लाख पोती शिल्लक राहण्याची शक्यता
  • यंदा देशातील हळद उत्पादन करणाऱ्या राज्यात पाऊस चांगला असल्याने उत्पादन वाढण्याची शक्यता
  • मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी हळदीची केली साठवणूक
  • देशात अंदाजे एक कोटी पोत्यांचे हळदीचे उत्पादन मिळत होते
  • हळदीची निर्यात कमी होत असल्याने दरावर परिणाम
  • देशातील राज्यनिहाय शिल्लक पोती

  • तमिळनाडू ः १२ ते १३ लाख पोती
  • महाराष्ट्र ः १६ ते १७ लाख पोती
  • तेलंगण आणि आंध्र प्रदेश : १३ लाख पोती
  • हळदीचे अधिक उत्पादनाचा परिमाण दरावर झाला आहे. त्यामुळे मंदीचे सावट निर्माण झाले आहे. मुळात हळदीची निर्यात होणे अपेक्षित होते. परंतु, हळदीची निर्यात झाली नाही याचा ही परिमाण दरावर झाला आहे. भविष्यात हळदीवर मंदीचे सावट येण्याची शक्यता आहे.  - मनोहर सारडा,  हळद व्यापारी, सांगली. हळदीला शासनाने हमीभाव दिला पाहिजे. त्याबरोबर प्रक्रिया उद्योगासाठी प्रोस्ताहीत केले पाहिजे. तसेच देशातून हळदीची निर्यात कमी होते. हळदीच्या निर्यात वाढीसाठी चालना द्यावी, म्हणजे हळदीचे दर चढे राहतील. - प्रमोद पाटील, शेतकरी,  मौजे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com