पाण्याअभावी होरपळली तुती; रेशीम उत्पादक अडचणीत

पाच एकर शेती आहे. इतर पिकांपासून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने यंदा एकरभर तुती लागवड केली. एका बॅंचचे ७५ किलो कोष उत्पादन मिळाले. परंतु, दोन महिन्यांपूर्वीच पाणी कमी पडल्यामुळे सर्व तुती वाळून गेली. गावातील दहा ते बारा शेतक-यांची अशीच परिस्थिती आहे. - मारोती देसाई, शेतकरी, चुडावा, ता. पूर्णा, जि. परभणी.
पाण्याअभावी तुती होरपळली
पाण्याअभावी तुती होरपळली

नांदेड : दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता नसल्याने नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेकडो एकरांवरील नवीन तुतीचे पीक होरपळून गेले आहे. त्यामुळे रेशीम कोष उत्पादन ठप्प झाले आहे. तुतीचे पीक समूळ होरपळून गेल्याने शेतक-यांना फटका बसला आहे. अनेक शेतक-यांना कोष उत्पादन सुरू ठेवण्यासाठी परत तुती लागवड करावी लागणार आहे.

सततच्या दुष्काळी स्थितीमुळे पारंपरिक शेती पीकपध्दतीतून उत्पादनाची खात्री राहिली नसल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी तुलनेने कमी पाण्याची गरज असलेल्या तुतीची लागवड करून त्यावर आधारित रेशीम कोष उत्पादन व्यवसायाकडे वळले आहेत. परंतु, गतवर्षी पावसाळ्यात कमी पाऊस झाला. परिणामी, उद्भवलेल्या दुष्काळामुळे सद्यःस्थितीत सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता नसलेल्या शेतक-यांच्या शेतातील तुतीचे पीक जागीच होरपळून गेले आहे.

मार्चअखेर जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाकडील नोंदीनुसार जुनी आणि नवी मिळून नांदेड जिल्ह्यात ६८६ शेतक-यांनी ८३३ एकरांवर, परभणी जिल्ह्यात ८५६ शेतक-यांनी ९४० एकरांवर, हिंगोली जिल्ह्यातील ५२१ शेतक-यांनी ५५९.६५ एकरांवर याप्रमाणे तीन जिल्ह्यांतील २ हजार ६३ शेतक-यांनी २ हजार ३३२.६५ एकरांवर तुती लागवड केलेली आहे. याशिवाय, अनेक शेतक-यांनी स्वखर्चाने तुती लागवड करून रेशीम कोष उत्पादन सुरू केलेले आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते तोपर्यंत या शेतक-यांनी रेशीम कोष उत्पादन घेतले.

परंतु, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा चटका वाढल्याने या तीन जिल्ह्यांतील शेकडो एकरांवरील गतवर्षी आणि नवीन लागवड केलेले तुतीचे पीक मुळापासून होरपळून गेले आहे. जुनी लागवड असलेल्या अनेक शेतक-यांची तुतीची छाटणी केली आहे. परंतु, अनेक ठिकाणी जुन्या तुतीसाठीसुध्दा पाणी कमी पडत आहे. त्यामुळे रेशीम कोष उत्पादन घेण्यासाठी परत नव्याने तुती लागवड करावी लागणार आहे. यंदा जेमतेम कोष उत्पादन मिळाले, त्यात तुती जळून गेली. उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

शेतकरी प्रतिक्रिया

अनेक वर्षांपासून रेशीम शेती करीत आहोत. याआधीच्या दुष्काळात तुतीचे पीक वाचविले. यंदा मात्र पाणी कमी पडत आहे. पाऊस पडेपर्यंत उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करावा लागणार आहे.  - हरिभाऊ पगडे, शेतकरी,  धनगरवाडी, जि.नांदेड.

यापूर्वीच्या दुष्काळात टॅंकरच्या पाण्यावर तुती जगविली होती. यंदा मात्र खूप पाणी कमी पडत आहे. आमच्या गावातील सुमारे दहा एकरांवरील तुती पाण्याअभावी वाळून गेली आहे. त्या शेतक-यांना नव्याने तुती लागवड करावी लागेल.  - सोपान शिंदे, शेतकरी,  पांगरा शिंदे, ता. वसमत, जि. हिंगोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com