रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांत बारा कोटींचे नुकसान

रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांत बारा कोटींचे नुकसान
रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांत बारा कोटींचे नुकसान

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे भात, नागली पिकांच्या नुकसानीचा आकडा दोन दिवसांत पावणेचार कोटींवरून १६ कोटी ६५ लाखांवर पोचला आहे. आतापर्यंत ८,७४९ हेक्टर भातशेती बाधित झाल्याचे पंचनामा करणाऱ्‍या संयुक्त पथकांच्या अहवालातून पुढे आले आहे. बुधवारपर्यंत (ता. ६) अंतिम अहवाल शासनाला सादर करावयाचा आहे. त्यामुळे यात आणखी भर पडेल, अशी शक्यता आहे. या अंदाजानुसार एकूण लागवडीच्या पंधरा टक्के पिकांचे नुकसान झाले आहे.

सोमवारपर्यंतच्या (ता. ४) पंचनाम्यांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात पावणेचार कोटींचे नुकसान होते. ८७ टक्के पंचनामे पूर्ण केल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले होते. मात्र, मंगळवारी (ता. ५) दुपारपर्यंत त्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.

दसऱ्‍यानंतर ‘क्याऱ वादळाच्या प्रभावामुळे पडलेल्या मुसळधार पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्‍यांकडून मिळालेली माहिती आणि प्रशासनाचा नजर अंदाज या आकडेवारीत तफावत होती. प्रत्यक्ष पंचनामे सुरू झाल्यानंतर नुकसानीचे आकडे वाढू लागले आहेत. ७९ हजार हेक्टरपैकी ८,७४९.०५ हेक्टरचे नुकसान झाले, तर ४२ हजार ८८६ शेतकऱ्‍यांना याचा फटका बसला.

मंगळवारपर्यंत पंचनाम्यांचे ९७ टक्के काम पूर्ण झाले. त्या अहवालानुसार काढणीपश्‍चात ११,३७७ शेतकऱ्‍यांचे १८९७ हेक्टर; तर २९,४७६ शेतकऱ्‍यांच्या ६,२२७ हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार १६ कोटी ६५ लाख रुपयांचे नुकसान यंदाच्या पावसाने केले आहे. अजूनही पंचनामे सुरू असून, आयुक्तांच्या आदेशानुसार शेतातच नव्हे, तर शेतकऱ्‍यांच्या घरापर्यंत जाऊन झालेल्या नुकसानीची नोंद होत आहे. 

अनेकांनी पावसाची उघडीप मिळाल्यानंतर भात कापून घरात नेला आणि तो झोडला. त्यातील ओला झालेला पेंढा कुजून गेला. त्यावरून नुकसानीची तीव्रता लक्षात येते. ही नोंदही पंचनाम्यात होत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. पंचनामे पूर्ण झालेल्या क्षेत्रापैकी विमासंरक्षित असलेले शेतकरी १६४ असून, त्यांचे क्षेत्र ९७.७५ हेक्टर आहे. विमा उतरविणाऱ्‍यांची संख्या जिल्ह्यात अत्यल्प आहे. आतापर्यंत त्याचा फायदा होत नसल्याने शेतकरी विमा उतरविण्यास अनुकूल नव्हता. यंदा नुकसान झाल्याने निकष डावलून लाभांश मिळणार का, हा प्रश्‍नच आहे.

तालुका   नुकसानग्रस्त शेती 

तालुका नुकसानग्रस्त शेती (हेक्टर) किंमत (लाखात)
मंडणगड ५२६.३   २२८.९४
दापोली  ४६५.५१    ३१.६५
खेड १३०० ४६०.६२
गुहागर  १५७३.८६ १०६.०१
चिपळूण   ५५१.२८  ३७.४८
संगमेश्‍वर  १०५९.५३ ७२.०५
रत्नागिरी १२५० ६०.२१
लांजा ८४०.७३ ५८८.५१
राजापूर  ११८१.८४   ८०.०२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com