कृषिपंपांना बारा तास वीज पुरवठा करा ः पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

पावसाच्या अनियमिततेमुळे धान जिवंत ठेवण्यासाठी कृषिपंपांना बारा तास वीज देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी वीज विभागाला दिल्या.
Twelve hours power supply to agricultural pumps: Minister Kedar
Twelve hours power supply to agricultural pumps: Minister Kedar

भंडारा : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने धान रोवणी केली असून पावसाच्या अनियमिततेमुळे धान जिवंत ठेवण्यासाठी कृषिपंपांना बारा तास वीज देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी वीज विभागाला दिल्या.

या विषयी केदार यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असिम गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. ७) विविध विषयांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

भंडारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर गोडावून बांधकाम, पीक कर्ज वाटप व कृषिपंप वीज जोडणीचा आढावा पालकमंत्र्यांनी या बैठकीत घेतला. आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदिपचंद्रन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा पणन अधिकारी चंद्रकांत खाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

वीज उपलब्ध झाल्यास धानाचे पीक हातचे जाणार नाही, असे नमूद करून पालकमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा असून पावसाच्या अनियमिततेमुळे कृषी पंपाला बारा तास वीज पुरवठा आवश्यक आहे. यासाठीचे नियोजन महावितरणने तातडीने करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. धान उत्पादक जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यात गोडावूनची कमी असून गोडावून उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना धान साठविणे सोईचे होईल. यासाठी बाजार समितीच्या गोडावूनची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पणन महासंघाकडे पाठविण्यात यावा. गोडावून बांधण्यासाठी शासकीय जमिनीचा शोध घेऊन प्रस्ताव तयार करण्यात यावा. तसेच सेवा सहकारी सोसायटीजवळ असलेल्या जागेवर गोडावून बांधकामाचे नियोजन करावे, असे निर्देश दिले. जिल्ह्यात शासकीय जागा उपलब्ध झाल्यास वखार महामंडळ गोडावून बांधण्यास इच्छुक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सर्व बाजार समित्यांच्या ठिकाणी गोडाऊनसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा उपनिबंधक यांनी अहवाल तयार करावा, असे ते म्हणाले.

पीककर्ज वाटपाचा आढावा या बैठकीत पीककर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. खरीप हंगाम २०२०-२१ साठी जिल्ह्याला ४२६ कोटी २५ लाखाचे पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. ६ ऑगस्ट २०२० अखेर जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँकांनी ८२ हजार ८७८ खातेदारांना ४११ कोटी ६० लाखाचे पीक कर्ज वितरण केले. पीक कर्ज वितरणाची टक्केवारी ९७ टक्के आहे. भंडारा जिल्हा मध्यवती सहकारी बँकेने ११५ टक्के पीक कर्ज वितरण केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी बँकेचे कौतुक केले. राष्ट्रीयीकृत बँकेने आपले उद्दिष्ट १७ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. पंतप्रधान पीक विमा योजना, खते व बियाणे आदी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com