रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात, नाचणीचे नुकसान

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १० ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ६४ हजार शेतकऱ्यांचे ११ हजार ८१२ हेक्टर भात, नाचणी पिकांचे नुकसान झाले आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर झालेल्या मदतीच्या निकषानुसार ९ कोटी ६० लाख रुपयांची गरज भासणार आहे.
Twelve thousand hectares of paddy and rattan damage in Ratnagiri
Twelve thousand hectares of paddy and rattan damage in Ratnagiri

रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १० ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ६४ हजार शेतकऱ्यांचे ११ हजार ८१२ हेक्टर भात, नाचणी पिकांचे नुकसान झाले आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर झालेल्या मदतीच्या निकषानुसार ९ कोटी ६० लाख रुपयांची गरज भासणार आहे.

बदलत्या वातावरणामुळे १० ऑक्टोबरपासून कोकण किनारपट्टीवर पावसाला सुरुवात झाली. याचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला. या कालावधीत हळवी भातं कापणी योग्य झाली होती. अनेकांनी पावसाचा अंदाज न घेताच कापणी करून ठेवली होती. अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या पुरात अनेकांची भातं वाहून गेली. काहींच्या उडव्याही वाहून गेल्या. सर्वाधिक फटका संगमेश्‍वर, रत्नागिरी तालुक्याला बसला आहे. तेथील नदीकिनारी भातशेती पाण्यामुळे आडवी झाली. ४८ तासांपेक्षा अधिक काळ शेती आडवी होऊन पाण्याखाली राहिल्यामुळे ती कुजून गेली.

काही ठिकाणी पडलेल्या भाताला पुन्हा कोंब आले होते. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला होता. या परिस्थितीची दखल घेऊन शासनाकडून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दोनवेळा बैठक घेऊन कृषी विभागाला दिले होते. कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले.

कातळावरील कापलेली भातशेतीही वाया गेल्याने उत्पादनावर परिणा होणार आहे. आठ ते दहा दिवस पावसाचा जोर राहिल्यामुळे भाताचा दर्जा घसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी विभागाचे पंचनामे पूर्ण झाले असून तसा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. सरकारकडून हेक्टरी १० हजार रुपये जाहीर केले आहेत; मात्र तसा शासन निर्णय अद्यापही आलेला नसल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

तालुका क्षेत्र हेक्टरी शेतकरी
मंडणगड ७८३ ३,२१०
दापोली ७३३ ५,५६५
खेड १,६९५ ७,४५९
चिपळूण १,३३७ ७,४५९
गुहागर ७३४ ३,९४६
संगमेश्‍वर २,२०६ १२,२१९
रत्नागिरी १,८३५ १०,२१९
लांजा १,३०४ ६,९९२
राजापूर १,१८४ ७,५३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com