सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चोवीस धरणे तुडुंब

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चोवीस धरणे तुडुंब
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चोवीस धरणे तुडुंब

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ३३ धरणांपैकी २४ धरणे १०० टक्के भरली असून सात धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत ४२८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मोठी दोन, मध्यम तीन आणि लघु २८ प्रकल्प आहेत. या वर्षी जूनच्या अखेरच्या आठवड्यात चांगल्या पावसाला सुरवात झाली. त्यामुळे धरणांमध्ये कितपत पाणीसाठा होईल याची शाश्‍वती नव्हती. परंतु, पाऊस सुरू झाल्यानतंर तो अखंडपणे बरसत राहिला. जुलैच्या अखेरचा आठवडा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. धरण पाणलोट क्षेत्रात देखील अतिशय चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत देखील चांगली वाढ झाली.

जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी जलविद्युत प्रकल्पात ९८ टक्के तर तिलारी आंतरराज्य प्रकल्पात ९३ टक्के पाणीसाठा झाला आहे. देवधर मध्यम प्रकल्पात ९०.०१ टक्के तर अरूणा आणि कोर्ले सातेंडी प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर २८ लघु प्रकल्पांपैकी कणकवली तालुक्यातील शिवडाव, ओटाव, तरदंळे, हरकुळ बुद्रुक, ओसरगाव, ओझरम पूर्णपणे भरले आहेत. तसेच, वैभववाडी तालुक्यातील नाधवडे, तिथवली आणि वेंगुर्ला तालुक्यांतील आडेली, सांवतवाडी तालुक्यांतील आंबोली, माडखोल, वाफोली, कारीवडे ही भरले आहेत. कुडाळ तालुक्यातील चोरगेवाडी, हातेरी, निळेली, ओरोस बुद्रुक, दाभाचीवाडी, पावशी, पुळास, दोडामार्ग तालुक्यांतील शिरवल, मालवण तालुक्यांतील धामापूर हे लघु प्रकल्प पूर्णपणे भरले आहेत. 

जिल्ह्यातील सध्याच्या उपयुक्त पाण्याची टक्केवारी ९३.८५ टक्के इतकी आहे. कणकवलीतील देंदोनवाडी प्रकल्पात फक्त १०.२४ पाणीसाठा आहे. स्थानिक लोकांना पर्यायी रस्ता नसल्यामुळे या धरणात पाणीसाठा केलेला नाही. दरम्यान, यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात ४२८५.८८ मिलिमीटर झाला आहे. सर्वाधिक पाऊस दोडामार्ग तालुक्यात ५१२१ मिलिमीटर इतका झाला आहे. तर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस देवगड तालुक्यात ३१३२ मिलिमीटर इतका झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com