नगरमधील ३२ मंडळात सरासरीच्या दुप्पट पाऊस

दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या नगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच सरासरीच्या ७१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. एकूण ९७ महसूल मंडळांपैकी तब्बल ३२ मंडळात २०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
नगरमधील ३२ मंडलात सरासरीच्या दुप्पट पाऊसTwice the average rainfall in 32 districts of nagar
नगरमधील ३२ मंडलात सरासरीच्या दुप्पट पाऊसTwice the average rainfall in 32 districts of nagar

नगर (प्रतिनिधी) : दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या नगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच सरासरीच्या ७१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. एकूण ९७ महसूल मंडळांपैकी तब्बल ३२ मंडळात २०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

यंदा सर्वाधिक २६३ टक्के म्हणजे १ हजार ४६० मिलिमीटर पाऊस अकोले तालुक्यातील शेंडी महसूल मंडळात झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. टॅंकरने पिण्यासाठी पाणी पुरवठा करावा लागलेल्या पाथर्डी, शेवगाव, पारनेर, कर्जत, जामखेड तालुक्यात ही अनेक भागात यंदा पहिल्यांदाच मुबलक पाणीसाठा झाला आहे.  नगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत सहा ते सात वेळा पुरेशा पावसाअभावी दुष्काळ सोसावा लागला. खास करून पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नगर संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले तालुक्यातील अनेक गावांत तर पाणी पातळी खालावल्याने पिण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागला होता. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच संपूर्ण पावसाळ्याच्या कालावधीत जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाचा खरिपासह रब्बीच्या पिकांना फटका बसला असला तरी पाणीसाठा मात्र मुबलक झाला आहे. विशेष करून दुष्काळी भागातील विहिरी, नद्या, तलाव, विंधन विहिरी पाण्याने डबडबल्या आहेत. शेवगाव तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात सरासरीच्या तुलनेत दुप्पट पाऊस झाला आहे.  मुळा, भंडारदरा, निळवंडे, घाटशीळ पारगाव, सिनासह अन्य प्रकल्प महिनाभर आधीच भरले आहेत. 

जिल्ह्यामधील ९७ महसूल मंडलांपैकी सावेडी, पळशी, श्रीगोंदा, पेंडगाव, शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, एरंडगाव, ढोरजळगाव, नेवासा (खुर्द व बुद्रूक), मिरी, सलाबतपूर, घोडेगाव, सोनई, राहुरी, ब्राह्मणी, शिबलापूर, साकूर, वीरगाव, शेंडी, पेंडगाव महसूल मंडळात दोनशे टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. नगर जिल्ह्यात सरासरी ४४८ मिलिमीटर पाऊस पडत असतो. यंदा ७६७  म्हणजे १७१ टक्के पाऊस झाला आहे. नेवासा, शेवगाव तालुक्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याची नोंद केली आहे.

उन्हाळी पिकांना होणार फायदा  नगर जिल्ह्यातील अनेक भागात कापूस, कांदा, हरभरा व ज्वारीनंतर त्या जागी पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी पिके घेतली जातात. यंदा ज्वारी पेरणीला उशीर झाला आहे. मात्र बहुतांश भागात पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने यंदा उन्हाळी पिकांना तसेच रब्बीच्या उशिराने पेरणी झालेल्या पिकांना उपलब्ध पाण्याचा फायदा होणार आहे. 

तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) (कंसात सरासरी) 

  • नगर    ८२७ (४७९)
  • पारनेर     ७०२ (४१४) 
  • श्रींगोदा    ६५९ (४०२) 
  • कर्जत    ५९६ (४४७) 
  • जामखेड    ७३५ (५७६)
  • शेवगाव    ९६६ (४६३)
  • पाथर्डी    ८३८ (४७३) 
  • नेवासा    ९०४ (४२९)
  • राहुरी    ८५३ (४३१), 
  • संगमनेर    ६५२ (३५१) 
  • अकोले    ८३१ (४८८) 
  • कोपरगाव    ६७४ (४०४)
  • श्रीरामपूर    ७२५ (४६३) 
  • राहाता    ७४७ (४५४)  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com