सहाशे काजू उत्पादकांना गंडा घालणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना अटक

काजू
काजू

मुंबई: कोल्हापूर आणि बेळगाव भागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा काजू खरेदी करून पैसे न देताच फसवणूक करणाऱ्या दोघा फरार व्यापाऱ्यांना ठाणे पोलिसांनी गुजरातमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून रोख रकमेसह सुमारे सव्वा दोन कोटींचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. या व्यापाऱ्यांनी सुमारे सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक गंडा घातला होता.  ठाणे येथील अष्टविनायक ट्रेडिंगचे मालक दीपककुमार भरतभाई पटेल ऊर्फ अमितकुमार असनानी आणि सुमितकुमार राजेश असनानी ऊर्फ महेश भोजराज ग्यानचंदानी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  गेल्या काही दिवसात सांगली, नाशिक येथील द्राक्षउत्पादक शेतकरी, जळगावच्या केळी उत्पादक शेतकरी, नागपूरचे संत्राउत्पादक शेतकरी आणि कोल्हापूर तसेच कोकण परिसरातील काजूउत्पादक शेतकऱ्यांकडून काही व्यापारी बोगस कंपनी स्थापन करून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल खरेदी करतात. हा शेतीमाल परस्पर विक्री करून शेतकऱ्यांना त्या मालाचे पैसे न देता हे व्यापारी पसार होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.  अशाच प्रकारे कोल्हापूर आणि बेळगाव परिसरातील काजू उत्पादक शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपयांचा काजू खरेदी करून त्यांची फसवणूक करून संबंधित व्यापारी फरार झाले होते. या संदर्भात शौकतअली मुजावर (ता. कोल्हापूर) यांनी ठाण्याच्या कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. ठाणे येथील अष्टविनायक ट्रेडिंगचे मालक दीपककुमार भरतभाई पटेल उर्फ अमितकुमार असनानी आणि सुमितकुमार राजेश असनानी उर्फ महेश भोजराज ग्यानचंदानी यांचा कोणताही ठावठिकाणा नसताना गुन्हे शाखा- घटक एक, ठाणे यांनी या फरार आरोपींचा गुजरातमध्ये शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. तसेच या आरोपींकडून ११०९ काजूगराचे बॉक्स, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, चंदगड, मुरगूड पोलीस ठाणे आणि बेळगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथील चार गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील सुमारे अर्धा मुद्देमाल जप्त केला आहे. या एकूण पाच गुन्ह्यातील २,२३४ काजूगराचे बॉक्स आणि रोख रक्कम असा सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल संबंधितांकडून जप्त करण्यात आला आहे.  या व्यापाऱ्यांनी सुमारे सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक गंडा घातला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बागूल या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com