खानदेशात सलग दोन दिवस भीज पाऊस

खानदेशात सलग दोन दिवस भीज पाऊस
खानदेशात सलग दोन दिवस भीज पाऊस

जळगाव  ः खानदेशात सोमवारी (ता. २६) दिवसभर व मंगळवारी (ता. २७) सकाळपर्यंत भीज पाऊस सुरूच होता. पावसाची टक्केवारी वाढत असून, जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ७७ टक्के, धुळ्यात ७१ टक्के पाऊस झाला आहे.  चोपडा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर या भागांत पर्जन्यमान कमी राहिले. धुळ्यातही धुळे, शिंदखेडा भागांत कमी पर्जन्यमान होते. नंदुरबार वगळता इतर तालुक्‍यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. पावसाचा जोर कमी असल्याने कुठेही अतिवृष्टी, पूर अशी स्थिती नाही. परंतु, भीज पावसामुळे पिकांना लाभ होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  मुगाला शेंगा लागत असून, त्या पक्व होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोयाबीनलाही शेंगा लगडल्या आहेत. कोरडवाहू कापूस पिकातही फुले, पाते लागण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. तर पूर्वहंगामी पावसाला कैऱ्या लागत आहेत. पिकांची स्थिती बऱ्यापैकी असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. भीज पावसामुळे शेतांमध्ये सखल भागात पाणी साचणे किंवा नाल्यांना पूर येण्याची स्थिती कुठेही नाही. अतिवृष्टी झालेली नाही. परंतु, पाऊस सुरूच राहिला तर काळ्या कसदार जमिनीतील कापूस, मूग पिकाला फटका बसण्याची शक्‍यता आहे.  पावसाला पुन्हा एकदा सुरवात झाली आहे, पण जळगाव जिल्ह्यातील गिरणा, वाघूर, अंजनी या नद्यांना मोठा पूर आलेला नाही. धुळ्यातील अनेर, पांझरा, नंदुरबारमधील गोमाई, सुसरी, उदय, रंगावली या नद्यांमधील जलप्रवाह वाढत आहे. सोमवारी रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. मंगळवारी सकाळी १० पर्यंत पाऊस सुरू होता. नंतर पावसाने थोडी उसंत घेतली. भीज पावसाने शेतात वाफसा मोडल्याने खते देणे, तणनियंत्रण, आंतरमशागतीची कामे बंद झाली.  मागील दोन दिवसांमधील पावसामुळे जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ७७ टक्के, धुळ्यात ७१ तर नंदुरबारात १६० टक्के पाऊस झाला आहे. जळगावात सप्टेंबरअखेरपर्यंत ७६५ मिलिमीटर पाऊस पडतो. मंगळवारी सकाळपर्यंत एकूण सुमारे ५०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासांत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः जळगाव जिल्हा ः पारोळा १८, एरंडोल २६, धरणगाव २३, चोपडा १९, जळगाव २३, यावल २९, रावेर ३१, मुक्ताईनगर २१. धुळे - शिंदखेडा १६, धुळे १५, साक्री २३. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com