सातारा जिल्ह्यात सौर कृषिपंपांसाठी अडीच हजारांवर अर्ज

सातारा जिल्ह्यात सौर कृषिपंपांसाठी अडीच हजारांवर अर्ज
सातारा जिल्ह्यात सौर कृषिपंपांसाठी अडीच हजारांवर अर्ज

सातारा : शेतकऱ्यांसाठी शाश्‍वत विजेचा पर्याय म्हणून सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील दोन हजार ८९३ शेतकऱ्यांनी सौरपंपांसाठी अर्ज केले आहेत. त्यातील २३ पंप बसविलेही आहेत. शिवाय, एक हजार ६५० पंपांना मंजुरी मिळाली आहे. 

कृषिपंपांना पारंपरिक पद्घतीने वीजपुरवठा करण्यासाठी ६३ केव्हीए अथवा १०० केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र उभारण्यात येतात. त्यावरील लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु, वीजचोरी, इतर तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यांसारख्या अनेक अडचणी निर्माण होतात. दुर्गम किंवा डोंगराळ भागात वीजयंत्रणेचे जाळे नाही. तेथे डिझेल इंधनाचा वापर करून कृषिपंप चालविले जातात. या सर्वांसाठी पर्याय म्हणून दिवसा, अखंडित व शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासनाने ही योजना अमलात आणली आहे.  

सौर कृषिपंप सूर्याच्या किरणांपासून चालणारा पंप आहे. सौरपंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनेल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे, इतर आवश्‍यक साहित्य असणार आहे. सूर्यकिरणे पंपाच्या सोलर पॅनेल्सवर पडतात, तेव्हा डीसी (डायरेक्‍ट करंट) शक्ती निर्माण होऊन सौरपंप कार्यान्वित होईल. त्यामुळे पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो. सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा पाण्याचा उपसा करता येईल. सौरपंपाद्वारे विहिरी, नदी, शेततळे, कालव्यामधून पाण्याचा उपसा करून पाइपद्वारे पिकांना पाणी देता येईल.  सौर कृषिपंप योजनेसाठी महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल सुरू केले आहे. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर किंवा https://www.mahadiscom.in/solar/ या लिंकवर अर्ज ऑनलाइन भरता येतील. हे सौर कृषिपंप २५ वर्षे सेवा देऊ शकतात. त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पाच वर्षे, तर सौर पॅनेलसाठी दहा वर्षांची हमी आहे. या कालावधीत सौर कृषिपंप किंवा सौर पॅनेल नादुरुस्त झाल्यास विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची असेल. 

सौर कृषिपंप, सौर पॅनेल नादुरुस्त झाल्यास संबंधित शेतकऱ्यांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला कळवावे. तीन दिवसांत तक्रारीचे निवारण होईल. पाच वर्षांचा विमा असल्याने चोरी झाल्यास त्याचा विमा मिळेल. सध्या जिल्ह्यात १६५० सौरपंप मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी  ८०२ लाभार्थ्यांनी रक्‍कम भरली आहे. २०५ पंपांना वर्कऑर्डर देण्यात आली आहे. २३ सौर कृषिपंप बसविण्यात आले असून, ४२ पंपांचे काम सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com