दोन लाख नागरिकांचे स्थलांतर

दोन लाख नागरिकांचे स्थलांतर
दोन लाख नागरिकांचे स्थलांतर

पुणे : पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे आतापर्यंत दोन लाख नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्यांची संख्या २७ झाली आहे. सांगली जिल्ह्यातील बोट दुर्घटनेतील ९ ग्रामस्थांचे मृतदेह हाती आले असून, अद्याप बचावकार्य सुरू आहे. मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख आणि विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी (ता. ८) माहिती दिली. “कोल्हापूर, सांगली भागांत मदत कार्य पूर्ण क्षमतेने सुरू आहे. मुख्यमंत्री सतत केंद्र व इतर राज्यांच्या संपर्कात आहेत. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांचा सातत्याने आढावा घेतो आहे. काही पूरग्रस्त भागात बोटीने प्रवास करून मदत कार्याची माहिती घेतली आहे. प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करीत असून नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंची कमतरता पडणार नाही,” असे मंत्री देशमुख म्हणाले.  डॉ. म्हैसेकर म्हणाले, “भीमेच्या खोऱ्यातील पूर परिस्थिती सुधारते आहे. मात्र, कोयना व कृष्णेच्या खोऱ्यातील चिंता मिटलेली नाही. प्रशासनाने दोन लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी आणले आहे. 

मात्र, सांगलीत ११, कोल्हापूर २, सातारा ७, पुणे ६ व सोलापूरला एक अशा २७ जणांचा मृत्यू झालेला आहे. सांगलीशी आम्ही रस्ते मार्गाने मदत करीत आहोत. मात्र, कोल्हापूरला रस्ते पाण्याखाली आहेत. अर्थात तेथे आणीबाणीची स्थिती नाही. परिस्थिती उद्भवली तर ‘एअरलिफ्टिंग’ करण्याची तयारी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी माहिती देत आहोत. पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला आहे. ते स्वतः संरक्षणमंत्र्यांशी बोलले असून केंद्रीयस्तरावरील विविध यंत्रणांकडून जादा कुमक पाठविली जात आहे.” ब्रम्हनाळमधील बोट उलटून झालेल्या दुर्घटनेबाबत डॉ. म्हैसेकर म्हणाले,  “ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीची स्वतःची बोट घेऊन मदत कार्य केले जात होते. ती शासनाने पाठवलेली बोट नव्हती. पॅनिक होऊ नका. आम्ही स्थलांतरित करतो, असे प्रशासनाकडून सर्वत्र सांगितलेले होते. मात्र, २० आसनाची क्षमता असताना ३०-३५ जण या बोटीत होते. त्यामुळे बोट उलटली आहे. त्यातील ९ जणांचे मृतदेह सापडले आहेत. १९ व्यक्ती बचावल्या आहेत. अजून काही व्यक्ती बेपत्ता आहेत. मृतांमधील आठ जणांची ओळख पटली आहे. तेथे दोन एनडीआरएफच्या टीम आहेत. पोलिस अधीक्षक, प्रांत देखील पोचले आहेत. अजून दोन ते अडीच हजार लोक तेथे असून मदत कार्य अव्याहतपणे सुरू आहे. ” सात तालुक्यांत पुन्हा अतिवृष्टी पुणे विभागात आज (ता. ८) एकूण १४२ टक्के पाऊस झाला. त्यात सांगली २२५ टक्के, सातारा १८०, पुणे १६८, कोल्हापूर १२३ तर सोलापूर जिल्ह्यात ७८ टक्के पाऊस आहे. सातारा जिल्ह्यात दोन तर कोल्हापूर पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली.  

अलमट्टीच्या विसर्गावर सतत लक्ष महाराष्ट्रातील गावांना असलेला पुराचा धोका पाहून कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून जादा पाणी सोडण्याबाबत सतत पाठपुरावा केला जात असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. “मुख्यमंत्री पुन्हा याबाबत कर्नाटक सरकारशी बोलले आहेत. अलमट्टीत सध्या ३.३६ लाख क्युसेक पाणी जमा (इनफ्लो) होते आहे. मात्र, डिस्चार्ज सुरू ३.५५ लाख क्युसेक आहे. तो वाढवून ४.५५ लाख क्युसेक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, उत्तर कर्नाटकात देखील पूर परिस्थिती असून तेथेही गावे पाण्यात गेली आहेत.”  कोयना धरणातून सध्या डिस्चार्ज आता केला जात आहे. मात्र, अलमट्टीतून सोडले जाणारे पाणी, कोयना धरणाची स्थिती आणि अतिवृष्टी यावर पूर परिस्थिती अवलंबून राहणार आहे. दरम्यान, पुणे-बंगलोर महामार्ग अजूनही बंद आहे. सांगलीत पाण्याची पातळी वाढली आहे. यात अजून वाढ होऊ शकते. आमच्यासमोर सांगली परिसर हा चिंतेची बाब आहे, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे. 

कोल्हापूरसाठीची मदत एनडीआरएफच्या सात टीम २० बोटी व १४० जवान. प्रादेशिक सेनेचे चार पथके दोन बोटी व १०६ जवान. नेव्हीचे १४ पथके १४ बोटी व ७० जवान. जिल्हा प्रशासनाची २१ पथके २३ बोटी व १२७ स्थानिक जवान तेथे ठेवले आहेत. याशिवाय धुळ्याहून एक पथक आले त्यात दोन बोटी व २८ जवान आले आहेत. एकूण ४८ पथके, ६३ बोटी व ४८१ जवान कोल्हापूरला काम करीत आहेत. कोल्हापूरला सर्वांत जास्त स्थलांतरित सांगलीत ८०,३१९ नागरिकांना स्थलांतरित केले गेले असून, ९४ केंद्रे उघडली गेली आहे. कोल्हापूर भागात ९७१०२ नागरिकांचे स्थलांतर करून १५४ निवारा केंद्रांमधून मदत पुरविली जात आहे. सातारा जिल्ह्यात ७०८५ तर सोलापूर भागात ३७७४९ लोकांचे स्थलांतर केले गेले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com