Two weeks before the kharif onion market
Two weeks before the kharif onion market

दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारात

दोन सप्ताह अगोदर हा कांदा उमराणे (ता. देवळा) येथील रामेश्‍वर कृषी मार्केट येथे सोमवारी (ता. २१) दाखल झाला. जिल्ह्यात झालेली ही पहिली आवक असून या कांद्याला ३१३१ रुपये मुहूर्ताचा दर मिळाला आहे.

नाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला, नांदगाव, सिन्नर व सटाणा तालुके खरीप लाल कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या आसपास नवीन लाल कांद्याची आवक सुरू होते. मात्र चालू वर्षी दोन सप्ताह अगोदर हा कांदा उमराणे (ता. देवळा) येथील रामेश्‍वर कृषी मार्केट येथे सोमवारी (ता. २१) दाखल झाला. जिल्ह्यात झालेली ही पहिली आवक असून या कांद्याला ३१३१ रुपये मुहूर्ताचा दर मिळाला आहे. 

दरेगाव (ता. चांदवड) येथील शेतकरी कौतिक राजाराम जाधव यांनी तयार लाल कांदा लिलावसाठी आणला होता. कावेरी अडत दुकानामार्फत संगम फार्मर यांनी तो खरेदी केला. या वेळी शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला. लिलावाप्रसंगी मार्केटचे मुख्य संचालक श्रीपाल ओस्तवाल, पुंडलीक देवरे, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू (काका) देवरे, सचिव दौलतराव शिंदे, व्यापारी दिनेश देवरे, हरिदास जाधव, दिनेश पारख, योगेश पगार, विलास आहिरे, सचिन देवरे व हमाल, मापारी उपस्थित होते.जाधव यांनी ७ जून रोजी २ एकरांवर कांदापात विक्रीच्या हेतूने पहिल्यांदाच पेरणी केली होती. मात्र कांदा पातीवर आला असताना त्यास अपेक्षित दर न मिळाल्याने तो ठेवला. त्यास तीनदा रोग प्रतिबंधात्मक फवारण्या करून कांदा जगविला. कोंबडी खत यासह युरियाची मात्रा दिली होती. 

आता हा कांदा पोसला असताना दोन एकर कांदाकाढणी पूर्ण झाली आहे. त्यांचे पावसामुळे निम्म्यावर कांदा खराब झाला आहे. दोन एकरांवर चार ट्रॉली कांदा निघाला आहे. त्यापैकी निम्मा कांदा खराब झाल्याने दोन ट्रॉली कांदा विक्रीयोग्य निघाला आहे. त्यापैकी पहिल्या ट्रॅक्टरमधून २५ क्विंटल ४० किलो कांदा आणला होता. त्यास ३,१३१ दर मिळाला. प्रतवारी चांगली असल्याने त्यास चांगला भाव मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

लालसह उन्हाळ कांदा भाव खाण्याची शक्यता  उशिराने झालेल्या पावसामुळे खरीप कांदा लागवडीचे नियोजन कोलमडले आहे. यासह मालेगाव, नांदगाव तालुक्यांत झालेल्या कांदा लागवडी अतिवृष्टीमुळे बाधित झाल्या आहे. याशिवाय वातावरणीय बदलामुळे उन्हाळ कांद्याची सड मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कांदा दरात सुधारणा होईल, नवीन कांद्याचा बाजारावर कुठलाही परिणाम होणार नाही, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

पेरणी कांद्याच्या पहिल्या वर्षी प्रयोग केला आहे. त्यात यश आले. मात्र काढणीवेळी पाऊस सुरू होऊन कांद्याच्या नाळीमध्ये पाणी गेल्याने निम्म्यावर कांदा खराब झाला आहे. मात्र दर चांगले मिळाले आहेत.  -कौतिक राजाराम जाधव, कांदा उत्पादक, दरेगाव, ता. चांदवड   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com