महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन रात्री काढल्या गावातच

महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन रात्री काढल्या गावातच
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन रात्री काढल्या गावातच

नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता. वाळवा) येथील येसाबाई आकाराम कदम (वय ७०) व लिलाबाई पाटील (वय ४५) या दोन महिलांनी उरात धडकी भरविणारा महापूर आलेला असतानाही तीन रात्री गावातच काढल्या. त्यांच्या या धाडसाला सलामच करावा लागेल.

येसाबाई आकाराम कदम या मोलमजुरी करून गुजराण करतात. मागील सोमवारी व मंगळवारी महापुराची तीव्रता वाढली. झपाट्याने वाढलेल्या पाणीपातळीमुळे गावाबाहेर पडण्याचे मार्ग बंद होणार होते. लोकांनी जनावरे काही समान बाहेर काढत गाव सोडले. येसाबाई आपल्या मुलाच्या मदतीने बाहेर पडणार होत्या. परंतु त्यांचा मुलगा मळी भागात शेतमजुरीसाठी गेला होता. तो तिकडेच अडकून पडला होता. तोपर्यंत रात्र झाली. वीस ते पंचवीस लोक वगळता गावात कोणीच राहिले नाही. त्यामुळे येसाबाई यांनाही घराबाहेर पडता आले नाही. त्या अपंग असल्याने त्यांना चालत जाणे शक्‍य नव्हते. परंतु, या स्थितीतही त्यांनी धीर सोडला नाही. आपल्या साध्या विटामातीच्या घराला कुलूप लावले आणि त्या घराबाहेर पडल्या आणि घरासमोर बांधकाम सुरू असणाऱ्या घराचा आडोसा त्यांनी घेतला. तोपर्यंत त्यांच्या घरात पाच फुटापर्यंत पाणी आले होते. त्यांनी धीर न सोडता काळोख, विषारी साप, विंचू याची पर्वा न करता महापुराच्या त्या रात्री गावातच राहिल्या.

येसाबाई यांच्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या लिलाबाई यांचे पती आजारी असल्याने त्यांनाही घराबाहेर पडता आले नाही. त्यांनीही कोरड्या जागेत आसरा घेत प्रचंड महापुरात गावातच राहणे पसंत केले. गावात थांबलेल्या युवकांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांना बाहेर काढून धोका पत्करण्यापेक्षा आहे त्या ठिकाणीच जेवण पोच करून त्यांना आधार दिला. महापूर ओसरल्यावर येसाबाई यांनी घरात प्रवेश केला. मात्र विटा मातीच्या घराच्या भिंती कधीही पडतील अशी स्थिती निर्माण झाली असून त्याच घरात त्या राहतात. त्यांच्या घरकुलचा प्रस्ताव शासन दप्तरी धूळ खात पडला आहे.

‘मला मदत मिळाली, दुसऱ्यांनाही द्या’ येसाबाई या मजुरी करतात. पूर ओसरल्यावर गावात धान्य व इतर साहित्यांची मदत येणे सुरू आहे. घरात पाणी न गेलेले ही मदत हातोहात लुटत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गावात हे वाटप सुरू असताना येसाबाईंना त्यांची मदत मिळाली होती. तरीही एका संयोजकाने त्यांना मदत घ्या असे सांगितले. मला मदत मिळाली आहे, बाबा, दुसऱ्यांना द्या, असे सांगत त्यांनी गरीब परिस्थितीतही जपलेला प्रामाणिकपणा इतरांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com