‘उचंगी' प्रकल्पाच्या कामाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध

‘उचंगी' प्रकल्पाच्या कामाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध
‘उचंगी' प्रकल्पाच्या कामाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध

आजरा, जि. कोल्हापूर : ‘उचंगी’ प्रकल्पाच्या घळभरणीच्या कामाच्या तयारीला बुधवारी (ता. ६) प्रकल्पग्रस्तांनी विरोध केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसनाची मागणी करत धरणाच्या कामाला विरोध केला. प्रकल्पग्रस्त व लाभधारक शेतकऱ्यांत शाब्दिक वाद झाला. अधिकाऱ्यांनी चर्चेला येण्याचे निमंत्रण प्रकल्पग्रस्तांनी नाकारले. शुक्रवारी (ता. ८) याबाबत बैठक बोलावून तोडगा काढण्याचे ठरले.  तत्पूर्वी प्रकल्पस्थळावर तणावाचे वातावरण तयार होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. पाटबंधारे विभाग बुधवारपासून घळभरणीच्या पूर्वतयारीची कामे सुरू करणार होते. पण प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान, प्रकल्पस्थळावर पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, मुकुंदराव देसाई, सभापती रचना होलम, संग्रामसिंह कुपेकर, अल्बर्ट डिसोझा, मसणू सुतार, बाबूराव गुरबे, दिगंबर देसाई, सुभाष देसाई, संभाजी पाटील, आप्पासाहेब देसाई, मधुकर यल्गार, विजय देसाई, अनिल फडके आदींसह धरणग्रस्त या वेळी बसून होते.  आजरा भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पुनर्वसनासह विविध प्रश्‍न सामंजस्याने सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. वन टू वन प्रश्‍न सोडवण्यासाठी चर्चा करण्याची विनंती केली. पण प्रकल्पग्रस्तांनी चर्चेला नकार दिला. धरणकृती समितीचे कॉ. संजय तर्डेकर म्हणाले की, प्रशासनाकडून आमचा खेळ झाला आहे. १९९६ ला जे संकलन रजिस्टर प्रशासनाने तयार केले आहे. ते ग्राह्य मानून त्यानुसार धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले पाहीजेत. त्यामध्ये दुरुस्ती करून जमीन वाटप केल्यानंतर धरणाचे काम सुरू करू दिले जाईल. चार एकरच्या स्लॅबनुसार धरणग्रस्तांना पुरेल इतकी जमिन होती. त्यानंतर प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी संगनमत करून तो रद्द करून आठ एकरचा स्लॅब केला. त्यामुळे जमिन उपलब्ध झाल्या नाहीत. त्याला प्रकल्पग्रस्त जबाबदार नाहीत. त्याला लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.  श्रमिक मुक्ती दलाचे नारायण भडांगे, दशरथ घुरे यांनी भाषणे केली. दरम्यान, संग्रामसिंह कुपेकर यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून चर्चेला येण्याबाबत विनंती केली. तहसीलदार अनिता देशमुख, कार्यकारी अभियंता स्मिता माने, उपविभागीय अभियंता अनिल कोरगावकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com