उद्धव ठाकरे आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे

मुंबई : शिवसेना - राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवारी) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्कच्या मैदानावर संध्याकाळी सहा वाजून ४० मिनिटांच्या मुहूर्तावर हा भव्य-दिव्य सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी शिवसेनेने जय्यत तयारी सुरू केली आहे.

जिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज घुमला, त्या शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच्या साक्षीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवाजी पार्कमध्ये सहा हजार चौरस फुटांवर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. मंचावर शंभर जणांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी ६० हजार खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे.

शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता यावे म्हणून शिवाजी पार्कच्या कानाकोपऱ्यात २० भव्य-दिव्य एलईडी लावले जाणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची समाधीही सजविण्यात येत आहे.   उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिल्याचे समजते. याशिवाय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यादेखील या सोहळ्याला उपस्थित राहण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून कोण उपस्थित राहणार, याची उत्सुकता आहे. विविध देशांच्या राजदूतांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. शेतकरी ते वारकरी, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील कोण नेते शपथ घेणार, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात कोणते चेहरे असणार, हे अद्यापही निश्चित झालेले नाही. पहिल्या टप्प्यात उद्धव यांच्यासोबत तिन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन जण मंत्रिपदाची शपथ घेतील, असे वृत्त आहे. नव्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधला जाईल, असे समजते. याच अनुषंगाने या तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरला बोलाविण्यात आली होती. 

असे असतील मंत्रिपदाचे संभाव्य चेहरे शिवसेनेतून सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे, अनिल परब, रवींद्र वायकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, नीलम गोऱ्हे, संजय शिरसाट, आशिष जैस्वाल, शंकरराव गडाख, अनिल बाबर, शंभूराज देसाई, बच्चू कडू यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सतेज पाटील, नाना पटोले, विश्वजित कदम, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी, वर्षा गायकवाड यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर, पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद दिले जाऊ शकते. याशिवाय आघाडीच्या वतीने राजू शेट्टी यांच्याही नावाची चर्चा आहे. तसेच, या तिन्ही पक्षांतून काही नावे ऐनवेळी पुढे येऊ शकतात, अशी चर्चा आहे. 

उद्धव ठाकरे राजभवनावर दरम्यान, राज्‍यपाल भगतसिंह कोशियारी यांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सकाळी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com