...तर मुंबईतील विमा कंपन्यांचे ऑफिस बंद पाडू : उध्दव ठाकरे

लासूर स्टेशन येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना उध्दव ठाकरे
लासूर स्टेशन येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना उध्दव ठाकरे

औरंगाबाद : पीकविम्यात घोळ झाल्याचे आधी बोललो होतो. लोकांचे हक्काचे पैसे घेऊन गेले, पण विमा परतावा मिळाला नाही. त्यासाठीच पीकविमा मदत केंद्रे सुरू केली आहेत. विमा भरणारे मल्ल्या, निरव मोदी नाहीत, शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना नडाल तर मुंबईतील विमा कंपन्यांचे ऑफिस बंद पाडू, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला. 

राज्यभरात पीकविमा परताव्याचा गुंता सोडविण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्यावतीने पीक विमा मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शनिवारी (ता. २२) श्री. ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथील मदत केंद्राला भेट दिली. या वेळी त्यांनी पीकविमा मदत केंद्रावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, आमदार मनिषा कायंदे, प्रशांत बंब आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. ठाकरे म्हणाले, की राज्यातील पहिले पीकविमा मदत केंद्र औरंगाबादेत सुरू केले याचा अभिमान आहे. शेतकरी जेव्हा अडचणीत असतात, तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम शिवसेना करते. मुख्यमंत्र्यांशी मैत्री ही जगजाहीर आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की शेतकऱ्यांसाठीचे पैसे बॅंकांना दिले आहेत. आम्हाला खुर्चीवर बसवणाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार असू तर आम्हीही काँग्रेससारखेच होऊ. तुमच्या आशीर्वादामुळे आमची ताकद वाढते. तोंडाची वाफ दडवण्यापेक्षा आपल्याला प्रत्यक्ष मैदानात उतरले पाहिजे ही आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडू. गरज पडली तर शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांकडे नेईन. शेतकऱ्यांमध्ये लढण्याची धमक आहे. शिवसेनासोबत आहे. निवडणुका येतील जातील, परंतु आपले नाते टिकू द्या, असेही श्री. ठाकरे म्हणाले. 

जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती, उपाययोजनांबाबत माहिती दिली. अंबादास दानवे यांनी पीकविमा मदत केंद्र सुरू करण्यामागची भूमिका व विमा परताव्याप्रश्नी शिवसेनेने केलेल्या कामाचा आढावा सादर केला. राज्यातील शेतकऱ्यांनी १७ हजार १७४ कोटी रुपये भरले परतावा म्हणून केवळ ३५७५ कोटी मिळाले. दुष्काळी स्थितीत हे घडलं. याप्रकरणी न्याय न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्याची शिवसेनेची भूमिका त्यांनी विषद केली. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की सरकार पैसे देते पण ते जनतेपर्यंत पोचत नाहीत. सीएससी सेंटरने पैसे स्वीकारले पण ते कंपनीपर्यंत पोचले नसल्याचाही प्रकार समोर आलाय. पीकविमा मदत केंद्रातून शेतकऱ्यांना मदत केली जाणार. या वेळी शेतकरी गंगाधर वाघले व गोखरनाथ जगताप यांनी मागण्यांचे निवेदन श्री. ठाकरे यांना सादर केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com