उध्दव ठाकरे
उध्दव ठाकरे

कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग महाराष्ट्रात का नाही : उध्दव ठाकरे

मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. अनेक लोक स्थलांतर करीत आहेत. मग केंद्र आणि राज्यात सरकार असतानाही आपले मुख्यमंत्री दुष्काळ जाहीर करण्याची धमक का दाखवत नाहीत, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळी भागात चारा-पाण्याची व्यवस्था न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा श्री. ठाकरे यांनी सरकारला या वेळी दिला. पाणी, चाराटंचाई दिसताच तातडीने दुष्काळ जाहीर करणाऱ्या कर्नाटक सरकारची श्री. ठाकरे यांनी या वेळी प्रशंसा केली.

शिवसेनेच्या वतीने गुरुवारी (ता.१८) दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, ॲड. लीलाधर डाके, सुधीर जोशी, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार आनंदाराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सौ. रश्मी ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत  उपस्थित होते.

या सभेत श्री. ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर कडाडून टीका करतानाच शिवसेना यापुढे राम मंदिराचा मुद्दा ठोसपणे हाती घेणार असल्याचे जाहीर केले. राम मंदिर हाही भाजपचा निवडणुकीसाठीचा जुमला तर नाही ना, असा तिखट सवाल करीत त्यांनी २५ नोव्हेंबरला ‘चलो अयोध्या’ असा नारा या वेळी दिला.

दरवाढ सरकारच्या हातात नाही, असे सांगणाऱ्या केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना श्री. ठाकरे यांनी या वेळी लक्ष्य केले. भाववाढ, महागाई तुम्ही रोखू शकत नाही, महिलांवरील अत्याचार रोखू शकत नाही, बेरोजगारांना नोकऱ्या देऊ शकत नाही; मग तुमच्या हातात नेमके काय आहे, असा सवाल श्री. ठाकरे यांनी या वेळी केला.

या वेळी श्री. ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला प्रश्न विचारला, की ‘जो कारभार या देशात, राज्यात सुरू आहे तो तुम्हाला मान्य आहे काय?’ त्यावर ‘नाही, अजिबात नाही,’ असा जोरदार आवाज गर्दीतून घुमला. सरकारच्या विरोधात कुणी बोलले, तर त्याला सरकारद्रोही, देशद्रोही ठरवले जाते, पण शिवसेना पहिल्या दिवसापासून जे बोलतेय तेच आता संघही बोलू लागला आहे. भैयाजी जोशी काय म्हणाले, तर या देशामध्ये प्रजेला सुखी ठेवण्याचे काम हे राजाचे असते. म्हणजेच संघालासुद्धा तुमचा कारभार पटत नाही. भाजपला सत्तेत बसवण्यात संघाचा हात होता. मग त्यांना बाहेर का काढत नाही, असा सवाल श्री. ठाकरे यांनी केला.

हवामानावर बोलायचे झाले, तर  २०१४ ची हवा आता राहिली नाही, ती बदलली आहे, अशी खिल्लीही श्री. ठाकरे यांनी उडवली. २०१४ मध्ये देशामध्ये उधळलेला अश्वमेध महाराष्ट्राने पहिला अडवला आणि शिवसेनेने स्वतःच्या बळावर ६३ आमदार निवडून आणले, असे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com