राज्यातील शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा कराः उध्दव ठाकरे

पंढरपूर ः येथे आयोजित शिवसेनेच्या महासभेत मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.
पंढरपूर ः येथे आयोजित शिवसेनेच्या महासभेत मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

पंढरपूर, जि. सोलापूर ः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो, कर्जमाफी करतो, म्हणणाऱ्यांनी काय केलं, झाले का दुप्पट उत्पन्न, किती जणांची कर्जमाफी झाली, पीकविम्याचे पैसे किती जणांना मिळाले, या सगळ्या घोषणा केवळ निवडणुकी जुमला होत्या, हे आता लपून राहिलेलं नाही. राज्यातील शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी देवून सात-बारा कोरा करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. २४) येथील महासभेत केली.  श्री. ठाकरे म्हणाले, की दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आले, पण बुलेटट्रेनमधून आले आणि पटापट पाहणी करून निघून गेले. दुष्काळाची भीषण स्थिती आज राज्यासमोर आहे. पिके करपून गेली आहेत. मध्यंतरी बीडमध्ये दुष्काळ पाहणीला गेलो, तिथे कापूस होता की नाही, ते कळत नव्हते. कडूनिंबाच्या झाडालाही किडीने खाल्ले होते, यावरून परिस्थिती लक्षात येते. प्रधानमंत्री जगभर फिरतात; पण त्यांनी महाराष्ट्रातील मातीलाही थोडा पाय लावावा आणि दुष्काळाची परिस्थिती जाणून घ्यावी.  पंढरपुरला आलात, तर पुण्यही मिळेल. पीकविम्यापोटी हजारो रुपयांचे हप्ते भरूनही शेतकऱ्यांना पाच रुपये आणि शंभर रुपयांचे चेक मिळाले, जय जवान, जय किसानची घोषणा दिली जाते. पण राफेलसारख्या योजनेत घोटाळा करून जवानांचा अपमान केला जातो, तर पीकविमा योजनेत घोटाळा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. अरे किती पापे कराल, देशाचा पहारेकरीही आता चोरी करायला लागला आहे, अशी टीका करताना पीकविम्याचे पैसे कधी देताय, कर्जमाफ झालेला शेतकरी कधी दाखवताय, कांदा प्रश्न किती दिवसांत सोडवताय, हे सांगा, असेही श्री. ठाकरे म्हणाले. प्रास्ताविक संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी केले. त्यात शेतीप्रश्नासह कर्जमाफी, दुष्काळ या प्रश्नावर लक्ष वेधले. राम मंदिर उभारणीची मागणी करत अयोध्या दौरा केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या घाटावर महाआरती केली. तत्पूर्वी झालेल्या महासभेत श्री. ठाकरे बोलत होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख तानाजी सावंत आदी उपस्थित होते.

धनगर, कोळी समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर मराठा आरक्षणासाठी आम्ही ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरलो, त्याचप्रमाणे धनगर आणि कोळी समाजाच्या आरक्षणासाठी, त्यांच्या न्यायहक्काच्या लढ्यासाठी शिवसेना पुढे राहील, प्रसंगी रस्तत्यावरही उतरेल, शिवसेना दिलेले वचन कधीही मोडत नाही, असेही श्री.  ठाकरे म्हणाले. 

..म्हणून राममंदिराचा मुद्दा  राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर घेतला, होय घेतला, मी ताकाला जाऊन भांडे लपवणारा माणूस नाही, राममंदिराचा मुद्दा यासाठी घेतला की, २८ ते ३० वर्षे झाली, तुम्ही काहीच करत नाही, केवळ निवडणुका आल्या की, तुमच्या अंगात देव घुमायला लागतो, पण आम्ही मात्र भोळे आहोत, पण बावळट नाही, हे लक्षात घ्या, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. तसेच रामविलास पासवान, नितीशकुमारांना भाजपाप्रती उपरती झाली आहे, असेही ते म्हणाले.     पाच राज्यांनी धूळ चारली पाच राज्यांत निवडणुका झाल्या. देशभरात गावापासून काश्मिरपर्यंत समज पसरला होता, की आम्हीच. पण हा समज या निवडणुकांनी खोडून काढला आहे. मिझोराम आणि तेलंगणा या राज्यांनी तर प्रादेशिक पक्षांना सत्तास्थानी बसवून राष्ट्रीय पक्षाला चांगलीच धूळ चारली आहे. छत्तीसगडने तर घाण साफ केली. ही ताकद आता महाराष्ट्रातील शिवसैनिकही दाखवून देतील. 

श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शन श्री. ठाकरे, पत्नी सौ. रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरेंसह सहकुटुंब पंढरपूर दौऱ्यावर आले होते. पंढरपुरात दुपारी आगमन झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी थेट श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज ओसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com