शेतीसाठी आवश्‍यक ते सर्वकाही करणार : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

बारामती येथे कृषिक प्रदर्शनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बारामती येथे कृषिक प्रदर्शनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माळेगाव, जि. पुणे ः कमी पाणी व कमी जागेत अधिक दर्जेदार उत्पादन घेता येऊ शकते, हे कोणीही सांगू शकते. परंतु, प्रात्यक्षिकाद्वारे आधुनिक तंत्राच्या आधारे बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या शिवारात नवनवे शेतीतील चमत्कार पहायला मिळाले. त्यामुळे महाराष्ट्राची सत्ता योग्यवेळी हाती आली आहे. या सत्तेच्या माध्यमातून शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी जे काही करणे आवश्यक आहे, ते सर्वकाही करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या ‘कृषिक-२०२०’ प्रात्यक्षिकेयुक्त कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रसिद्ध अभिनेते अमीर खान, कृषिमंत्री दादाजी भुसे, दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते (इस्राईलचे सल्लागार दूत) डॅन अलुफ, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, धिरज देशमुख, बबनराव शिदे यांच्यासह विद्यापीठांचे कुलगुरू, शास्त्रज्ञ उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की मी अनेक शेतीशी निगडित प्रदर्शने पाहिली. मात्र, प्रात्यक्षिकासह शेती काय असते, याचे तत्त्वज्ञान सांगणारे भारतातील एकमेव प्रदर्शन म्हणजे ‘कृषिक २०२०’ आहे. हवी हवीशी वाटणारी शेती जर हवेतच झाली तर किती आनंद होईल, असा आनंद बारामतीच्या कृषी प्रदर्शनात प्रत्यक्ष हवेतील शेती पाहून अनुभवयास मिळाला. राजकारणात मतभेद असतात पण एखाद्याचे काम चांगले असले, तर त्याचे कौतुक झाले पाहिजे. जर या कामाचे कौतुक झाले नाही, तर हा करंटेपणा ठरेल. पवार कुटुंबीयांनी बारामतीच्या माळरानावर हे नंदनवन उभे केले हे सोपे नाही.  शरद पवार म्हणाले, ‘‘शेतीमध्ये ठिबकचे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. जेवढ्या पाण्यात पाठाने एक एकर भिजतो, तेवढ्या पाण्यात ठिबकने तीन एकर शेती ओलिताखाली येते. यासाठी मात्र भांडवली गुंतवणूक आवश्यक आहे. येथे शेतकरी कमी पडतो. या कामी सरकारने पुढाकार घेऊन अनुदान देणे आवश्यक आहे. सध्या संशोधक शेती क्षेत्रात संशोधन करीत आहेत. मात्र, यामध्ये अनेकवेळा विनाकारण न्यायालय काम थांबविण्याचे आदेश देत आहे. वास्तविक शेती अथवा आरोग्यास हानिकारक असेल तर थांबवणे आवश्यक आहे. मात्र, काही फायद्याच्या संशोधनाला सुद्धा न्यायालय संशोधन थांबविण्याचे आदेश देत असल्याने संशोधकांच्या कामावर मर्यादा येते,’’ अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.  ‘‘महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सात ते आठ लाख शेतकरी हे कृषिक प्रदर्शन पाहण्यासाठी पुढील चार दिवसांत येतील, याचा उपयोग उत्पादन वाढीस होईल. या प्रदर्शनातील नवीन संकल्पना राज्याच्या इतर भागांत राबविण्यासाठी राज्यकर्त्यांनी राज्याची शेती निती तयार करावी,’’ अशी सूचना श्री. पवार यांनी केली. अमीरला आवरला नाही मोह...! अभिनेते अमीर खान म्हणाले, ‘‘बारामतीच्या कृषिक प्रदर्शनात मी बोलण्यासाठी नव्हे, तर पाहून शिकण्यासाठी आलो आहे. यामुळे मी येथे तीनचार दिवस थांबलो तर मला शेती, पाणी, खतांसह विविध नावीन्यपूर्ण प्रयोगाची सर्वकाही माहिती मिळेल. पाणी फाउंडेशनपासून आम्ही कामास सुरुवात केली. हे काम गावातील लोकच करत असतात. त्यांना आम्ही फक्त शिकवीत आहोत. यापुढे आम्ही पाण्याच्या नियोजनाबरोबर मृदासंधारण, वनांचे पुनर्जिवीकरण, गवतांचे क्षेत्र वाढविणे व पीक या पाच नव्या गोष्टी गावातील लोकांना शिकविणार आहोत.’’ मला निवृत्त करायचे ठरविले आहे काय... सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शरद पवार यांना भाषणापूर्वी पुष्पगुच्छ देण्यात आला. याचा धागा पकडत शरद पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच पुष्पगुच्छ देऊन मला निवृत्त व्हावे, असा तुमचा विचार आहे का? तसेच अनेकांनाही असेच वाटत होते. मात्र, जनतेने विशेषतः युवकांनी ते काही घडू दिले नाही, असा टोला लगावताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com