राजकारण न आणता खंबीरपणे पूरस्थितीचा सामना करावा : उध्दव ठाकरे

उध्दव ठाकरे
उध्दव ठाकरे

मुंबई  : कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिक आणि जनावरांसाठी डॉक्टरांची टीम पाठविण्यात येत आहे. तसेच, औषधांचा साठाही उपलब्ध करून दिला जाणार आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये राजकारण न आणता, खंबीर मनाने सर्वांनीच या स्थितीचा सामना केला पाहिजे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

मुंबईत रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. ठाकरे बोलत होते. श्री. ठाकरे म्हणाले, की राष्ट्रीय आपत्ती या शब्दात अडकण्याची मला आवश्यकता वाटत नाही. सध्या पूरग्रस्त भागात तत्काळ मदत मिळाली पाहिजे, हेच मला वाटते. तेथील लोकांच्या मदतीसाठी काय गरजेचे आहे, हे ओळखून आपण काम केले पाहिजे, बाकी मला कशात अडकायचे नाही. आलमट्टी धरणातील पाण्याबद्दल बोलताना, सत्य असेल ते उघड होईल, कर्नाटक सरकार काही पाप करत असेल तर तेही उघड होईल, असे श्री. ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, तुम्ही पूरग्रस्त भागात पाहणीसाठी का गेला नाहीत या प्रश्नावरही श्री. ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, की तिथे जाऊन कोरडी सहानुभूती दाखविण्याचे काम मी करणार नाही. इथं राहून जे शक्य आहे ते आणि शिवेसना काय करायचे ते मदतकार्य करत आहे. 

मुसळधार पावसामुळे राज्यातील १० जिल्हे आणि ६४ तालुक्यांत पूरस्थिती असून तिथे शिवसेना मदतकार्यासाठी पोचत आहे. शिवसेनेला राज्यभरातून मदत येत आहे. त्यामध्ये, कपडे, अन्नधान्य, पिण्याचे पाणी, जीवनावश्यक वस्तू आणि किराणा साहित्याचा समावेश आहे. या सर्व वस्तू कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिकांसाठी पोचविण्यात येणार आहेत. शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि सर्वच पदाधिकारी याकामी उतरले आहेत, असे शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.    ‘निवडणुकांचा विषय कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो’ राज ठाकरे यांच्या मागणीवरील प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला. हे संकट एवढे भीषण आहे, की निवडणुकांचा विषय कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो हेच मला कळत नाही, अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com