कंत्राटी शेती कायदा मंजूर कराः उमेशचंद्र सरंगी

कृषी शिफारस
कृषी शिफारस

पुणे : ‘‘शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी जमीन सुधारणेच्या मुद्याला हात घालावा लागेल. लहान तुकड्यावरील शेती किफायतशीर ठरत नाही. त्यामुळे जमिनी शेतीसाठी भाडेपट्ट्याने देण्याचा कायदा करावा. कंत्राटी शेतीसाठीच्या कायद्याला मंजुरी द्यावी. तसेच शेतकऱ्यांचा जमिनीवरील मालकी हक्क कायम ठेवून सहकारी आणि कॉर्पोरेट शेतीला परवानगी द्यावी,’’ असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष आणि निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी यांनी केले.  पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने तयार केलेल्या ‘महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या वृद्धीला गती देण्यासाठी संस्थात्मक आणि धोरणात्मक सुधारणा’ या कृषी धोरण अहवालाचे प्रकाशन मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चर येथे शनिवारी झाले. या वेळी ‘सकाळ’चे अध्यक्ष आणि पीआयसीचे विश्वस्त प्रतापराव पवार अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने, विश्वस्त अनिल सुपनेकर उपस्थित होते.  सरंगी म्हणाले, राज्यात जनुकीय बदल (जी.एम.) केलेल्या पिकांच्या चाचण्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी सरंगी यांनी केली. शेतमाल बाजारसुधारणांच्या बाबतीत राज्यात काही निर्णय झाले असले तरी, आणखी खूप सुधारणा होणे शिल्लक आहे. राज्यात ऊस शेतीवर बंदी घालू नये; परंतु शंभर टक्के ऊसक्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे. मराठवडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील शेती एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे त्या त्या विभागाप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवून या क्षेत्रातील सुधारणा कराव्यात.  केळकर म्हणाले, ‘शेती क्षेत्रातील समस्यांना तोंड देण्यासाठी धोरणात्मक सुधारणांची गरज आहे. पीआयसीने दरवर्षी विविध क्षेत्रांचे दहा धोरण अहवाल तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषी क्षेत्राचा धोरण अहवाल तयार केला आहे.’ प्रतापराव पवार म्हणाले, शेती क्षेत्रातील समस्या गहन असल्या तरी, आव्हाने जितकी मोठी, तितक्‍याच संधीही मोठ्या असतात; या आव्हानांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून उपाय शोधण्याची गरज आहे. शेतकरी या तळाच्या घटकापर्यंत ज्ञान पोचविण्याची गरज आहे. ‘सकाळ’च्या माध्यमातून साडेचार लाख शेतकऱ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले आहे.  गोखले अर्थशास्त्र संस्थेतील संशोधक विशाल गायकवाड यांनी अहवालातील शिफारशींचे सादरीकरण केले. प्रशांत गिरबने यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. या सहा मुद्द्यांवर शिफारशी 

  •   शेती क्षेत्रातील जमीन सुधारणा
  •   बियाणे
  •   जल व्यवस्थापन व पीकबदल  
  •   देशातंर्गत व आंतरराष्ट्रीय धोरणे
  •   कृषीची आकडेवारी              
  •   प्रादेशिक असमतोल
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com