विद्यापीठे भरती मंडळ पुन्हा रद्द पदोन्नतींमुळे चर्चेत

विद्यापीठे भरती मंडळ पुन्हा रद्द पदोन्नतींमुळे चर्चेत
विद्यापीठे भरती मंडळ पुन्हा रद्द पदोन्नतींमुळे चर्चेत

पुणे : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये उच्च पदावर करण्यात आलेल्या काही नियुक्त्या रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठांच्या कुलसचिवांवर आली आहे. “या प्रकरणांशी आमचा नव्हे; तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठे भरती मंडळाचा संबंध येतो,” असा दावा विद्यापीठे करीत आहेत. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांनी विद्यापीठे भरती मंडळामार्फत यापूर्वी वादग्रस्त निवडी केल्या होत्या. यानंतर मंडळाची सर्व सूत्रे उपाध्यक्षांकडून काढून घेण्यात आली. माजी कुलगुरू दर्जाच्या व्यक्तीला आता मंडळाचे प्रमुखपद देण्यात आले आहे. तरीही शास्त्रज्ञांच्या नियुक्त्या किंवा पदोन्नतीमध्ये सावळागोंधळ मिटत नसल्याने शास्त्रज्ञ हबकले आहेत. मंडळाने अकोला विद्यापीठात केलेल्या अधिष्ठाता निवडीवरून वादंग तयार झाले आहे. “सहयोगी प्राध्यापकांमधून प्राध्यापक व पुढे विभाग प्रमुख आणि सहयोगी अधिष्ठातापदी पदोन्नतीच्या शिफारशीचे अधिकार विद्यापीठे भरती मंडळाला आहेत. सहयोगी अधिष्ठातापदासाठी प्राध्यापकपदी किमान पाच वर्षे किंवा विभागप्रमुखपदी तीन वर्षे सेवेचा अनुभव बंधनकारक असतो. अकोला विद्यापीठात नेमके काय घडले आहे याची कोणालाही माहिती नाही,” असे इतर विद्यापीठांचे म्हणणे आहे.   अकोला विद्यापीठाच्या सहयोगी अधिष्ठातापदासाठी आलेल्या अर्जात केवळ एक प्राध्यापक व चार विभागप्रमुख होते. वस्तूतः विभागप्रमुख हे पद मोठे असताना भरती मंडळाने चारही विभागप्रमुखांना डावलले व डॉ. डी. एम. मानकर यांच्या नियुक्तीची शिफारस केली. त्यात भर म्हणजे त्यांना विस्तार शिक्षण संचालकपदीदेखील नियुक्त केले गेले, असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.  विभागप्रमुखांची सेवा ज्येष्ठता डावलून डॉ. मानकर यांची निवड कोणाच्या सांगण्यावरून झाली, अशी चर्चा विद्यापीठांमध्ये रंगात आली होती. दुसऱ्या बाजूला परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात एका विभाग प्रमुखाला केवळ सहा महिन्यांचा अनुभव असतानाही सहयोगी अधिष्ठाता नियुक्त केले होते. त्यामुळे एकच पद आणि नियुक्तीचे नियम भिन्न कसे, असा सवाल मंडळाविषयी उपस्थित झाला होता. अकोला विद्यापीठात सहयोगी अधिष्ठाता म्हणून डॉ. डी. बी. उंदीरवाडे हे तात्पुरते कामकाज पहात होते. त्यांना या पदासाठी लायक ठरविण्यात आले नाही. “विद्यापीठाने आलेल्या अर्जाची छाननी करताच भरती मंडळाकडे अर्ज पाठवून दिले. मंडळानेही सरधोपट नियुक्ती करून इतर शास्त्रज्ञांना वाऱ्यावर सोडले. या प्रकरणाचा बोभाटा झाल्यामुळे आधीचा निर्णय मागे घेण्याशिवाय मंडळाकडे पर्याय नव्हता,” अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी डॉ. मानकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर १२ एप्रिल रोजी सुनावणी होणार असून तोपर्यंत त्यांना पदावरून न हलविण्याचे अंतरिम आदेश देण्यात आले आहेत. तर न्यायालयीन प्रकरणाबाबत काहीही माहिती आलेली नाही, असे मंडळाचे म्हणणे आहे.  मला काहीही माहीत नाही : डॉ. मेहता अकोला विद्यापीठाच्या अधिष्ठातांची नियुक्ती रद्द केल्यामुळे राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये खळबळ माजली. मात्र, याबाबत महाराष्ट्र कृषी विद्यापीठे भरती मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय मेहता यांच्याशी संपर्क साधला असता, “मला काहीही माहिती नाही. यापूर्वीची कागदपत्रे कोणाच्या ताब्यात आहेत हेदेखील मला सांगता येणार नाही,” असे उत्तर त्यांनी दिले. मुळात मंडळाच्या अध्यक्षांचा संदर्भ देऊनच विद्यापीठाने ही नियुक्ती रद्द केली आहे. त्यामुळे डॉ. मेहता यांना विश्वासात न घेता या प्रकरणात खरा उचापतखोर कोण, याबाबत विद्यापीठात चर्चेला उधाण आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com