विद्यापीठाने तंत्रज्ञानाला समाजाशी जोडावे

विद्यापीठाने तंत्रज्ञानाला समाजाशी जोडावे
विद्यापीठाने तंत्रज्ञानाला समाजाशी जोडावे

औरंगाबाद : डिजिटल क्रांतीपर्यंत पोचलेल्या तंत्रज्ञानाला समाजाशी जोडण्याचे काम विद्यापीठाने करावे. यात सामाजिक बांधिलकीला तितकेच महत्त्व द्यावे. तसेच, परदेशी विद्यापीठांप्रमाणे शैक्षणिक बदल स्विकारण्याची आपल्या विद्यापीठांचीही तयारी असली पाहिजे, असा सूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे देण्यात आलेल्या जीवनगौरव सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्‍त केला.

विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात गुरुवारी (ता. २३) हीरकमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त हा सोहळा झाला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते  डॉ. बिंदेश्‍वर पाठक, राधेश्‍याम चांडक, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे, भास्करराव पेरे, तुकाराम जनपदकर, नामदेव कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्यावतीने ‘सकाळ’मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. प्रास्ताविक प्र. कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी केले. या वेळी तुकाराम जनपदकर गुरुजींनी बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास मिळाल्याबद्दल समाधान व्यक्‍त केले. कार्यक्रमाला विद्यापीठातील विभाग प्रमुखांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

उच्च दर्जाचेच हवे शिक्षण... शिक्षण पद्धती, औद्योगिक धोरणे, आधुनिक तंत्रज्ञान, सरकारी धोरणे याचा परिणाम नोकऱ्यांच्या उपलब्धेवर होत आहे. विविध देशांतील उत्तम विद्यापीठे, प्राध्यापक, शिक्षण पद्धतींपासून आपल्याही विद्यापीठांनी शिकावे. नोकरीच नव्हे तर व्यवसायक्षम विद्यार्थी घडवावीत. कौशल्य शिक्षणासोबत विषय निवडण्याचे स्वातंत्र्य हवे. जिथे मुलांना गरज आहे, तिथे तज्ज्ञांची मदत घेऊन विद्यार्थ्यांना सक्षम बनविले पाहिजे, असे प्रतापराव पवार यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.

शौचालय साफ करणारे त्याच घरातील लोकांसोबत जेवण करू शकतात. इथपर्यंत परिवर्तन करू शकलो, याचे समाधान वाटते. - डॉ. बिंदेश्‍वर पाठक

डिजिटल तंत्रज्ञान समाजाच्या लाभाचे आहे. शाश्‍वत विकासासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले पाहिजे, हे एक आव्हानच समजावे. - डॉ. राजेंद्र शेंडे

दहा भुकेले अन्‌ एकासमोरच ताट असे बेकारीचे रूप आहे. ताट ओढायचे की, उपाययोजना करायच्या, हे सरकारसमोर आव्हान आहे. - रा. रं. बोराडे

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक परिवर्तन आणण्यात सहकाराचा वाटा आहे. त्याला सध्या कुणाची तरी नजर लागली आहे. - राधेश्‍याम चांडक

नशिबाला आलेले काम केल्यास तिथेच परमेश्‍वर भेटतो. तेच काम मी गावासाठी केले. दुसऱ्याचे हिसकावण्यापेक्षा साथीने चाललो. - भास्करराव पेरे

नशिबाने मी साहित्यिक झालो आहे. आमदारकी हवी होती, मात्र साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यामुळेच समाधानी आहे. - नामदेव कांबळे

आधी सर्टिफिकेटवर नोकरी मिळायची, आता गुणवत्तेच्या शिक्षणाला महत्त्व आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी त्यादृष्टीने पाऊले टाकावीत. - हरिभाऊ बागडे

देशाला सर्वोत्तम बनविण्याचे काम हे विद्यापीठांचे आहे. इनोव्हेशन, इन्क्‍युबेशन सेंटर हा एक विद्यापीठांचा उद्योगच असेल. - डॉ. बी. ए. चोपडे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com