राष्ट्रवादीतील घडामोडींमुळे बारामतीत अस्वस्थता

राष्ट्रवादीतील घडामोडींमुळे बारामतीत अस्वस्थता
राष्ट्रवादीतील घडामोडींमुळे बारामतीत अस्वस्थता

बारामती शहर, जि. पुणे  :  राज्यात शनिवारी (ता. २३) घडलेल्या राजकीय भूकंपानंतर रविवारी बारामतीत वातावरणात काहीशी तणावपूर्ण शांतता होती. राष्ट्रवादीतून बंड करून बाहेर पडलेले अजित पवार व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेते पदावरून केलेली हकालपट्टी या पार्श्वभूमीवर बारामतीत अस्वस्थता आहे. 

दरम्यान, अजित पवार राष्ट्रवादीतून बंड करून बाहेर पडून भाजपबरोबर जातील याची कार्यकर्त्यांना स्वप्नातही कल्पना नव्हती. ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेली भूमिका पाहिल्यानंतर मात्र अजित पवार यांनी बंडाचे निशाण हाती घेतल्याची सर्वांचीच खात्री पटली. शनिवारी बारामतीत याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अजित पवार यांनी हा निर्णय घ्यायला नको होता, त्यांना महाविकास आघाडीतही उपमुख्यमंत्रिपद मिळणारच होते. मग, त्यांनी भाजपबरोबर वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न का केला ? याचे कोडे कार्यकर्त्यांना उलगडत नव्हते. 

ज्येष्ठ पदाधिकारी व नेते यांनाही अजित पवार इतका मोठा निर्णय इतक्या अचानक घेतील याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. साहेब आणि ताई यांच्यासोबतच दादांनी राहून पुढील वाटचाल करायला हवी होती, असे म्हणणारा मोठा वर्ग बारामतीत आहे.  सत्ता असो वा नसो; पण पवार कुटुंबीयांत फूट पडण्याचेच शल्य बारामतीकरांना अधिक जाणवले.

रविवारी सकाळपासूनच बहुसंख्य बारामतीकर टीव्हीसमोर बसून होते. रविवारी न्यायालयात काय होणार, अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीसोबत जाणार का, शरद पवार त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेणार का, यांसारख्या अनेक शक्यतांवर घराघरांतून चर्चा सुरू होती. 

‘दादांनी साहेबांसोबतच राहावे’  मी काय म्हातारा झालो आहे का? अजून खूप जणांना कामाला लावायचं आहे, असे प्रचारादरम्यान शरद पवार यांनी वारंवार सांगत, एखाद्या युवकाला लाजवेल असा झंझावात करत राज्यात भाजपला जेरीला आणले. सत्तास्थापनेच्या क्षणी अजित पवार भाजपात गेल्याने पुन्हा एकदा शरद पवार यांना अडचणींना सामोरे जावे लागले. जे उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांना तसेही मिळणारच होते, त्याच पदासाठी अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी का केली? साहेबांच्या सोबत या काळात अजितदादांनी खंबीरपणे उभे राहायला हवे होते, अशीच भावना अनेक बारामतीकरांची आहे.    अनेक प्रश्‍न अनुत्तरितच  अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय या क्षणी का घेतला? राष्ट्रवादीतील सर्वोच्च पद त्यांच्याकडे असताना अचानकच त्यांचे मतपरिवर्तन का झाले? त्यांनी इतका मोठा निर्णय घेताना कोणालाच विश्वासात का घेतले नाही? पवारसाहेबांशी त्यांनी याबाबत चर्चा का केली नाही, हे व यांसारखे अनेक प्रश्न बारामतीकरांना पडले आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार माध्यमांसमोर आलेच नाहीत, त्यामुळे त्यांची या सर्व घडामोडींमागील नेमकी भूमिका काय हेही स्पष्ट झालेले नाही. मात्र, जे घडते आहे ते काही बरे नाही, ही बारामतीकरांची प्रातिनिधिक भावना आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com