राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपये

नगर : नगर येथील दादा पाटील राजळे कृषी उत्पन्न बाजार समितीत उडदाची आवक सुरु झाली आहे. येथे दररोज दहा ते तीस क्विंटलपर्यत आवक होत आहे. उडदाला प्रती क्विंटल साडेचार ते पाच हजार रुपये व सरासरी ४७५० रुपयांचा दर मिळत आहे.
Urad in the state is 2500 to 8000 rupees
Urad in the state is 2500 to 8000 rupees

नगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये

नगर  : नगर येथील दादा पाटील राजळे कृषी उत्पन्न बाजार समितीत उडदाची आवक सुरु झाली आहे. येथे दररोज दहा ते तीस क्विंटलपर्यत आवक होत आहे. उडदाला प्रती क्विंटल साडेचार ते पाच हजार रुपये व सरासरी ४७५० रुपयांचा दर मिळत आहे. 

मुगाप्रमाणेच उडदाचीही हमी दराने खरेदी करण्याला टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये यंदा उडदाची सरासरीच्या तिप्पट म्हणजे ४८ हजार २७१ हेक्टरवर लागवड झाली आहे. उडादाची बाजारात आवक सुरु झाली असून नगर येथील बाजार समितीत सध्या दररोज दहा ते तीस क्विंटलपर्यत आवक होत आहे.

मंगळवारी (ता.८) बारा क्विंटलची आवक झाली. ४२०० ते ५००० हजार रुपयांचा दर मिळाला. शुक्रवारी (ता.४) सहा क्विंटलची आवक झाली आणि प्रती क्विंटलला चार हजार पाचशे ते पाच हजार दोनशे रुपयांचा दर मिळाला. गुरुवारी (ता.३) आठ क्विंटलची आवक होऊन पाच हजार-पाच हजार ५० रुपयांचा दर मिळाला.

औरंगाबादमध्ये ३२०० ते ४२२५ रुपये 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता १०) उडदाची ४ क्विंटल आवक झाली. या उडदाला ३२०० ते ४२२५ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ४ सप्टेंबरला उडदाची २ क्‍विंटल आवक झाली. या उडदाला ३४०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. ५ सप्टेंबरला २ क्विंटल आवक झालेल्या उडदाचे दर ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ७ सप्टेंबरला ८ क्विंटल आवक झालेल्या उडदाला ३००० ते ३७०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.

८ सप्टेंबरला ५ क्विंटल आवक झालेल्या उडदाचे दर ४ हजार ते ४४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ९ सप्टेंबरला १३ क्विंटल आवक झालेल्या उडदाला ३३५८ ते ४२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

हिंगोलीत ५००० ते ५९०० रूपये दर

हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गंत धान्य बाजारात गुरुवारी (ता.१०) उडदाची १५ क्विंटल आवक होती. उडदाला प्रतिक्विंटलला कमाल ५००० ते किमान ५९०० रुपये रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील उडदाच्या आवकेस नुकतीच सुरुवात झाली आहे. सध्या आवक कमी आहे. दररोज १० ते १५ क्विंटल र्यंत आवक होत आहे. मंगळवारी (ता.८) उडदाची १० क्विंटल आवक आहे. त्यास प्रतिक्विंटलला किमान ५००० रुपये ते कमाल ५९०० रुपये सरासरी ५४५० रुपये दर मिळाले.

जिल्ह्यातील सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.८) उडदाची २७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४५०० ते ५००० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता.७) २ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला सरासरी ५४०० रुपये दर मिळाले, अशी माहिती समितीतील सूत्रांनी दिली.

अकोल्यात सरासरी ५७०० रुपये दर

अकोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाला गुरुवारी (ता.१०) सरासरी ५७०० रुपये दर मिळाला. ८३ क्विंटलची आवक बाजारात झाली होती.

उडदाचा हंगाम लवकरच जोमाने सुरु होत आहे. यंदा गेल्या महिन्यातील सततच्या पावसामुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणामी उडीद काही अंशी डागाळला सुद्धा आहे. नव्या उडदाची अद्याप अत्यल्प आवक होत आहे. गुरुवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आलेल्या मालाला कमीत कमी ३३०० रुपयांपासून तर जास्तीत जास्त ६४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. सरासरी ५७०० रुपये क्विंटलची विक्री होती. 

उडदाच्या दरात गेल्या काही दिवसांत वाढ होत आहे. याच आठवड्यात दरात दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ दिसून येत आहे. पुढील आठवड्यापासून उडदाची आवक वाढणार असून चांगल्या दर्जाच्या मालाला भाव चांगला मिळेल, असे व्यापारी सुत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापुरात सर्वाधिक ५९०० रुपये

सोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात उडदाला चांगला उठाव मिळाला. त्यामुळे त्याचे दरही तेजीत राहिले. उडदाला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ५९०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात उडदाची आवक एक-दोन दिवसाआड १०० ते २०० क्विंटल आवक आहे. उडदाची संपूर्ण आवक ही स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक तुलनेने कमीच आहे. या सप्ताहात उडादाला किमान ४५०० रुपये, सरासरी ५५०० रुपये आणि सर्वाधिक ५९०० रुपये असा दर मिळाला. 

या आधीच्या सप्ताहातही आवक काहिशी कमीच राहिली. एक-दोन दिवसाला ५० ते ८० क्विंटल आवक होती. दर किमान ४००० रुपये, सरासरी ५००० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये असा मिळाला. त्या आधी पंधरवड्यापूर्वीही आवक आणि दराची स्थिती अशीच राहिली. येत्या आठवड्यात उडादाची आवक आणखी वाढेल, पण मागणी असल्याने दर तेजीत राहतील, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नांदेडमध्ये ३८०० ते ६४०० रूपये दर  

नांदेड  : जिल्ह्यात यंदा बाजार समितीमध्ये उडदाची आवक कमी आहे. जिल्ह्यातील देगलूर, बिलोली, धर्माबाद व नायगाव या बाजार समितीमध्ये शेतकरी उडीद विक्रीसाठी आणतात. सध्या देगलूर बाजार समितीमध्ये उडदाची सर्वसाधारण आवक आहे. या उडादाला ३८०० ते ६४०० रुपये दर मिळत आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव मरगेवार यांनी दिली.

जिल्ह्यात ठराविक भागामध्ये उडीद तसेच मूग पीक घेतले जाते. यात तेलंगणा तसेच कर्नाटक सीमा भागाला लागून असलेल्या देगलूर, मुखेड, बिलोली, धर्माबाद व नायगाव या तालुक्यात मूग, उडीद पीक घेतले जाते. यंदा पाऊस समाधानकारक असला तरी उडदाची आवक मात्र बाजार समितीमध्ये मंदावली आहे. शासनाने बाजार समितीमध्ये धान्य विक्री करण्याचे निर्बंध कमी केल्यामुळे खेडा विक्रीचे प्रमाण वाढल्याची माहिती बाजार समितीकडून मिळाली. 

देगलूर बाजार समितीमध्ये तीन सप्टेंबर रोजी उडदाची आवक सूरु झाली. यावेळी २३० क्विंटल उडदाची आवक झाली. यास ४१०० ते  ६११२ रुपये दर मिळाला. चार सप्टेंबर रोजी १५३ क्विंटल उडीद बाजारात आला. यास चार हजार सहाशे ते पाच हजार ९५० रुपये भाव मिळाला. पाच सप्टेंबर रोजी ११८ क्विंटल आवक झाली. यास तीन हजार आठसे ते सहा हजार दोनशे रुपये दर मिळाला.

यासोबतच सात सप्टेंबर रोजी दोनशे क्विंटल उडीद बाजारात आला. यास चार हजार २५० ते सहा हजार तीनशे रुपये दर मिळाला. आठ सप्टेंबर रोजी १८३ क्विंटल उडीद बाजारात आला. यास चार हजार आठशे ते सहा हजार चारशे रुपये दर मिळाला. 

नऊ सप्टेंबर रोजी २३७  क्विंटल आवक झाली. यास चार हजार ४२८ ते सहा हजार दोनशे दर मिळाला. तर दहा सप्टेंबर रोजी रोजी ३६३ क्विंटल आवक झाली. यावेळी चार हजार दोनशे ते सहा हजार शंभर रुपये दर मिळाल्याची माहिती देगलूर बाजार समितीचे सचिव मार्गेवार यांनी दिली.

वाशिममध्ये ३९०० ते ५००० रुपये दर

नागपूर  :  यावर्षी उडदावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन जेमतेम झाले. त्यामुळे बाजारात आवकही घटली असून त्याचा परिणाम दरातील तेजीच्या माध्यमातून अनुभवला जात आहे. नागपूरच्या कळमना बाजार समितीत उडदाची एक क्विंटल ही आवक नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.  

२०१८ १९ या वर्षात कळमना बाजार समितीत उडदाची रोज केवळ तीन क्विंटल आवक होती. त्यावेळी बाजारात ४१०० ते ४३०० रुपये असा दर होता. यंदाच्या हंगामात विदर्भातील काही बाजार समित्यांमध्ये मात्र उडदाची १०० ते ४०० क्विंटल आवक नोंदविली जात आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत गुरुवारी ४५० क्विंटल उडदाची आवक झाली.

या ठिकाणी उडदाचे व्यवहार ३९०० ते ५००० रुपये या दराने झाले. अमरावती बाजार समितीत उडदाची आवक २५० क्विंटल होती. या ठिकाणी उडीदाला ४००० ते ५००० रुपयांचा दर मिळाला.

जळगावात २५०० ते ८००० रुपये दर

जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीत या पंधरवड्यात उडदाची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता.१०) १८० क्विंटल आवक झाली. दर २५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. 

आवक गेल्या हंगामाच्या तुलनेत निम्मीही नाही. पुढे आवक वाढू शकते. कमी दर्जाच्या उडदाचे दर कमी आहेत. यंदा अतिपावसात उडदाचा दर्जा खालावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आवक जळगाव, जामनेर, भुसावळ या तालुक्यांमधून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com