राजकीय पक्षांची उमेदवार जाहीर करण्याची लगीनघाई

राजकीय पक्षांची उमेदवार जाहीर करण्याची लगीनघाई
राजकीय पक्षांची उमेदवार जाहीर करण्याची लगीनघाई

मुंबई ः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवार (ता. ४) हा एकच दिवस उरल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या एकामागोमाग उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ भाजपने सुद्धा बुधवारी उशिरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. 

विधानसभा निवडणूक २०१९ साठी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर बुधवारी आपली पहिली यादी जाहीर केली. इतर पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीने पहिली यादी काहिशी उशिरा जाहीर केली. राष्ट्रवादीने पहिल्या यादीत एकूण ७७ जणांच्या नावांची घोषणा केली. ज्यामध्ये अपक्षेप्रमाणे अजित पवार, जयंत पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह रोहित पवार, आदिती तटकरे यांसारख्या नव्या उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. 

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. अशावेळी राष्ट्रवादीने आणखी बंडखोरी होऊ नये आणि भाजप-सेनेतील काही बंडखोर आपल्या गळाला लागतात का याची चाचपणी करत अगदी शेवटच्या क्षणी ही यादी जाहीर केली आहे. पाठोपाठ बुधवारी रात्री उशिरा जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत धर्मरावबाबा आत्राम, पंकज भुजबळ, उत्तमराव जानकर यांच्या नावाचा समावेश आहे. जळगाव, अकोला, अमरावती, गडचिरोली, औरंगाबाद, नाशिक, पुणे, रायगड, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतल्या उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. 

दुसरीकडे भाजपने आतापर्यंत एकूण १३९ जणांच्या नावांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने बुधवारी उशिरा दुसरी यादी जाहीर केली. या यादीत फक्त १४ जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत बारामतीसाठी गोपीचंद पडळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीतही भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, मंत्री विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज पुरोहित यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे आता या नेत्यांचा पत्ता भाजपने कट केला का? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण, भाजपचे आता काही मोजक्याच जागांवरील उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. तर काँग्रेसने पहिल्या दोन यादीत १०३ तर बुधवारी उशिरा पुन्हा २० उमेदवारांची तिसरी यादीही जाहीर केली आहे. 

शिवसेनेने ७०, मनसेने ७२ जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी आदित्य ठाकरेंनी रोड शो देखील केला. या वेळी त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com