शेवडीत १२ एकरवर द्राक्षे लागवडीचा प्रयोग
शेवडीत १२ एकरवर द्राक्षे लागवडीचा प्रयोग

शेवडीत पहिल्यांदाच १२ एकरवर द्राक्षे लागवडीचा प्रयोग

परभणी ः शेवडी (ता. जिंतूर) येथील आठ शेतकऱ्यांनी १२ एकरवर द्राक्षे लागवड केली आहे. कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या शेततळ्यांच्या माध्यमातून पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे संरक्षित सिंचनाची सोय झाली. त्यामुळे या शेतकऱ्यांनी द्राक्षे लागवडीचा प्रयोग केला आहे. यामुळे या गावातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे.

शेवडी (ता. जिंतूर) शिवारात जलयुक्त शिवार अभियानच्या पहिल्या वर्षी २०१५-१६ मध्ये आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे विहिरी, बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी भाजीपाला, फुलशेतीकडे वळले आहेत. पारंपरिक पिकांपासून खात्रीशीर उत्पादन मिळत नसल्यामुळे गतवर्षी या गावातील काही शेतकऱ्यांनी द्राक्षे लागवड करण्याचा निर्णय घेतला.

कडवंची (जि. जालना) येथील द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्षे बागांना भेट देऊन द्राक्षे लागवड, व्यवस्थापन तंत्रज्ञान जाणून घेतले. यंदाच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये द्राक्षे लागवडीसाठी खुंट तयार करण्यासाठी डॅागरिजची रोपे तयार केली. मार्च महिन्यात त्यांची लागवड केली. सप्टेंबर महिन्यात डॅागरिजच्या खुंटावर द्राक्षांच्या सोनाका, शरद सीडलेस, माणिक चमन आदी वाणांच्या कलमांची ग्राफ्टींग करण्यात आली आहे.

शेवडी येथील खुशाल काळे, शंकर काळे, सुधारकर काळे, विश्वनाथ काळे, पंढरीनाथ काळे, आत्माराम नागरे, माऊली मुंडे, राधेशाम सानप या शेतकऱ्यांनी द्राक्षे लागवड केली आहे.

सध्या शेततळ्यामध्ये पाणी उपलब्ध आहे. ठिबक सिंचन पद्धतीने त्याचा सिंचनासाठी उपयोग करत आहोत. यंदा दुष्काळी स्थितीमुळे विहिरी, बोअरमध्ये पाणी कमी आहे. त्यामुळे गरज पडली तर द्राक्षबागेस टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी आहे.  - खुशाल काळे, शेतकरी, शेवडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com