भात शेतीमध्ये निळे-हिरवे शेवाळाचा वापर

हवेतील मुक्त नत्र स्थिर करणाऱ्या निळ्या-हिरव्या शेवाळाचा वापर भात शेतीमध्ये फायदेशीर ठरतो. रोपांच्या पुनर्लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी प्रती हेक्टरी २० किलो निळे-हिरवे शेवाळ संपूर्ण शेतावर सारखे पडेल या पद्धतीने फेकून द्यावे.
Use of blue-green algae in paddy cultivation
Use of blue-green algae in paddy cultivation

हवेतील मुक्त नत्र स्थिर करणाऱ्या निळ्या-हिरव्या शेवाळाचा वापर भात शेतीमध्ये फायदेशीर ठरतो. रोपांच्या पुनर्लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी प्रती हेक्टरी २० किलो निळे-हिरवे शेवाळ संपूर्ण शेतावर सारखे पडेल या पद्धतीने फेकून द्यावे.

निळे- हिरवे शेवाळ ही तंतूमय असणारी ही एकपेशीय पाण वनस्पती आहे. हे शेवाळ सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करते, तसेच हवेतील नत्र स्थिर करून मुक्त नत्र पिकांना उपलब्ध करून देऊ शकते. निळ्या-हिरव्या शेवाळाच्या वाढीसाठी व नत्र स्थिर करण्यासाठी योग्य परिस्थिती उपलब्ध असेल, तर सर्वसाधारणतः (निळे-हिरवे शेवाळ ) ३० किलो नत्र एका हंगामात दर हेक्टरी स्थिर करू शकते. यामुळे जमिनीत सेंद्रिय द्रव्यांची भर पडते. जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची धूप कमी होते, न विरघळणारा स्फुरद जास्तीत जास्त प्रमाणात विरघळविला जातो. पिकाच्या वाढीस उपयुक्त अशा वृध्दीसंप्रेरकांचा पुरवठाही केला जातो.  ज्या ठिकाणी भात हे सलग पीक घेतले जाते, त्या ठिकाणी अशा उपयुक्त शेवाळाचा सतत वापर केल्यास उपयुक्त नसणाऱ्या शेवाळांची वाढ कमी होऊन वापरलेल्या शेवाळाची वाढ भरपूर होते. नत्र स्थिरीकरणाचे कार्य कार्यक्षमरीत्या होते. निळे- हिरवे शेवाळ पिकाला अन्नद्रव्यांचा नियमित पुरवठा करते. त्याचप्रमाणे जी घटकद्रव्ये पिकांना उपलब्ध होत नाहीत, ती सुध्दा थोड्या प्रमाणात उपलब्ध करून देऊन पिकांची अन्नद्रव्यांची भूक भागविली जाते. 

निळे- हिरवे शेवाळ वापरण्याची पद्धत

  • शेतीची चिखलणी करून नत्र खताचा पहिला हप्ता देऊन झाल्यावर सुदृढ व जोमदार रोपांची पुनर्लागवड करावी. 
  • भात रोपांच्या पुनर्लागणीच्यावेळी खाचरातील पाणी माती मिश्रित गढूळ झालेले असते. ते पाणी स्वच्छ झाल्यावर व मातीचे कण खाली बसल्यावर म्हणजे पुनर्लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी प्रती हेक्टरी २० किलो निळे-हिरवे शेवाळ संपूर्ण शेतावर सारखे पडेल या पद्धतीने फेकून टाकावे. नंतर पाणी ढवळू नये. म्हणजे टाकलेल्या निळ्या हिरव्या शेवाळावर मातीचे कण बसणार नाहीत. शेवाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश पाण्यामधून जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचेल व शेवाळाची वाढ स्वच्छ पाण्यात सूर्यप्रकाशात भरपूर होईल. 
  • साधारणतः तीन आठवड्यात शेवाळाची वाढ जमिनीच्या पृष्ठभागावर झालेली दिसेल, तसेच ही वाढ पाण्यावरसुध्दा तरंगताना दिसून येईल. अशा पद्धतीने तयार झालेले शेवाळ पेशीमध्ये स्थिर केलेला नत्र रोपाला पुरविला जातो. त्यामुळे भात रोपांची वाढ जोमदार होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच २५ टक्के नत्र खताची बचत होते.
  • भात पिकासाठी नत्र खताच्या प्रमाणित मात्रेबरोबरच २० किलो शेवाळ प्रती हेक्टरी वापरणे आवश्यक आहे. यामुळे भात उत्पादनात २ ते ३ क्विंटलची वाढ होते. 
  • शेवाळामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब ०.२ ते ०.३ टक्के वाढतो. तसेच एकूण नत्र ०.०१ ते ०.०२ टक्के वाढतो. यामुळे जमिनीचा पेात सुधारतो. त्याचा फायदा पुढील पिकाला मिळून उत्पादनात वाढ होते.
  • निळे- हिरवे शेवाळ वाढवण्याची पध्दत  

  • सर्वसाधारणपणे २ x १ x ०.२ मी. आकाराचे वाफे तयार करून त्यावर २०० मायक्रॉन जाडीचा पॉलिथिन पेपर पसरावा.
  • पॉलिथिन पेपरवर साधारणतः ८ ते १० किलो बारीक माती पसरावी. ७ ते १० सें.मी. पाण्याची पातळी ठेवून त्यामध्ये २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट, २ ग्रॅम सोडिअम मॉलीब्डेट, ४० ग्रॅम फेरस सल्फेट, ५० ग्रॅम पोटॅशिअम क्लोराईड यांचे मिश्रण टाकून आतील माती ढवळावी. 
  • माती तळाशी बसल्यावर शांत पाण्यात निळे हिरवे शेवाळाचे परीक्षा नळीतील किंवा प्रयोगशाळा/मध्यवर्ती केंद्राने पुरविलेले मूलभूत बियाणे पसरावे. 
  • साधारणपणे ८ ते १० दिवसात शेवाळाची भरपूर वाढ होते. त्याचा पाण्यावर चांगला थर जमतो. भरपूर वाढ झाल्यावर पाणी आटू द्यावे. सुकलेली माती गोळा करून ती सावलीत वाळवावी. 
  • सुकलेली शेवाळ मिश्रित माती प्लॅस्टिक पिशवी किंवा कापडी पिशव्यांमध्ये गोळा करावी. याचा  पुढील पिकासाठी शेवाळाचे बियाणे म्हणून उपयोग करता येतो. हे बियाणे भात रोपांच्या पुनर्लागवडीनंतर ८ ते १० दिवसांनी भात खाचरामध्ये २० किलो या प्रमाणात दर हेक्टरी वापरावे.
  • वरील पद्धती व्यतिरिक्त सोयीनुसार चौकोनी पत्र्याच्या ट्रेमध्ये किंवा सिमेंटच्या स्लॅबवर वरील पद्धत वापरून शेवाळाचे बियाणे तयार करता येते. शेवाळ वाढविताना डासांचा किंवा कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • निळे- हिरवे शेवाळ वापरताना 

  • रासायनिक खतांची उणीव संपूर्णपणे भरुन काढता येत नाही, परंतू हे  शेवाळ रासायनिक खतांना पूरक खत म्हणून वापरावे.
  • भाताच्या चांगल्या उत्पादनासाठी रासायनिक नत्र खतांची प्रमाणित मात्रा आणि २० किलो शेवाळाचे बियाणे प्रती हेक्टर वापरावे.
  • रासायनिक खते, कीडनाशके व शेवाळ एकत्र मिसळून वापरू नये, त्यांचा स्वतंत्रपणे उपयोग करावा.
  • रासायनिक खतांच्या संपर्कात किंवा रिकाम्या झालेल्या रासायनिक खतांच्या पिशव्यांमध्ये शेवाळाचे बियाणे साठवू नये.
  • शेवाळाची मात्रा भाताच्या पुनर्लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी पाणी स्वच्छ झाल्यानंतर शेतात फेकून किंवा पसरवून द्यावी. त्यानंतर पाणी ढवळू नये.
  • शेवाळाच्या वाढीसाठी भात शेतात पाणी साठवून ठेवणे आवश्यक आहे.
  • संपर्क- गणेश शेंडगे,९९२१०९००७९ (कृषी विद्या विभाग, कृषी महाविद्यालय,बारामती,जि.पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com