संजीवकांचा वापर संतुलितपणेच व्हावा
संजीवकांचा वापर संतुलितपणेच व्हावा

संजीवकांचा वापर संतुलितपणेच व्हावा

नाशिक : द्राक्षबागेत आवश्यकतेनुसार रासायनिक फवारण्या कराव्या लागतात. मात्र, शिफारशीत मात्रेमध्ये केल्या पाहिजेत. अनेक द्राक्ष उत्पादक तांत्रिक सल्ला लक्षात न घेता वेगवेगळी रासायनिक बुरशीनाशके, कीटकनाशके एकत्र करून फवारण्या करत राहतात. अशा प्रकारची फवारणी तयार होणारे मणी व द्राक्ष वेली या दोहोंसाठी घातक आहे. जिब्रेलीक आम्लचा वापर मण्याचा आकार वाढवण्यासाठी केला जातो. मात्र, कोणत्याही संजीवकाचा अधिक वापर संयुक्तिक नाही. द्राक्ष उत्पादकांनी संजीवकांचा योग्य तितकाच संतुलित वापर करून चांगल्या दर्जाचे द्राक्ष उत्पादन घ्यावे, असा सल्ला राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. रामटेके यांनी केले. 

मंगळवार (ता. १७) रोजी नाशिक येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे- नाशिक विभागाद्वारे आयोजित ‘ऑक्टोबर द्राक्ष छाटणी’ या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. द्राक्ष शेतीतील उत्पादन ते विक्री यामध्ये येणाऱ्या समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. 

गेल्या काही वर्षांत द्राक्ष शेती संक्रमणातून जात आहे. त्यात चालू वर्षी होत असलेला अधिक पाऊस, अळीचा वाढत असलेला प्रादुर्भाव या सर्व अडचणीतून पुढे जाताना व हंगामाच्या अनुषंगाने पुढील नियोजन व उपाययोजनांवर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन, पुणे येथील तज्ज्ञांनी द्राक्ष बागायतदारांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक रवींद्र बोराडे यांनी केले. 

डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी यशस्वी कलमीकरणाचे तंत्र या विषयावर द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन करताना कलम करण्यासाठी आवश्यक सायन, रूटस्टॉक यांच्या काड्या, त्यांची परिपक्वता व त्यासाठी लागणारे कौशल्य याबाबतीत सविस्तर माहिती दिली. 

जास्त पावसाच्या स्थितीमध्ये वेलीच्या पोषणासंदर्भात डॉ. ए. के. उपाध्याय यांनी मार्गदशन केले. ते म्हणाले, की अधिक पाऊस झालेल्या स्थितीमध्ये बागेतील पाण्याचा निचरा करण्याकडे लक्ष द्यावे. बागेमध्ये पाणी साचू देऊ नये. द्राक्ष मुळांना कार्यान्वित करण्यासाठी वापसा स्थिती तयार करावी. पाणी साचून राहिल्यास नत्राची उपलब्धता कमी होते. यासाठी पावसाळ्यात पीक पोषणासाठी योग्य नियोजन करावे. पुढील महिन्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर गरजेप्रमाणे पाणी द्यावे. तसेच पाणी, माती परीक्षणासह देठ परीक्षण करून वेलीची पोषण स्थितीचा अंदाज घ्यावा. त्यानुसार पुढील अन्नद्रव्यांच्या मात्रा देण्याचे नियोजन करावे. 

डॉ. दीपेंद्रसिंह यादव यांनी द्राक्षबागेतील किडी व त्याच्यावरील उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. त्यामध्ये नव्याने उद्भवणाऱ्या किडींची माहिती दिली.  

या चर्चासत्रामध्ये छाटणी ते फळधारणा, थंडीमध्ये द्राक्षाचे आकारमान वाढण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, यशस्वी कलम करण्याचे तंत्र, द्राक्षबागेतील नवीन कीड व त्याचे नियंत्रण, द्राक्षबागेतील नवीन बुरशीजन्य रोग व त्यांचे नियंत्रण, जास्त पर्जन्यमानामध्ये द्राक्षवेली पोषणावर होणारे परिणाम, संजीवकांचा अतिवापर व त्याचे परिणाम तसेच येणाऱ्या द्राक्ष हंगामाचा द्राक्ष आढावा अशा अनेक विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. 

याशिवाय हवामान तज्ज्ञ योगेश पाटील, विजय जाधव, कांतिलाल पाटील यांनीही मार्गदर्शन केले. द्राक्ष बागायतदारांसाठी संघाने जिब्रेलीक आम्लाचा पुरवठा करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यात यश मिळवले असून, ते स्वस्तामध्ये उपलब्ध करणार असल्याची माहिती संघाचे कोषाध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली.

या चर्चसत्राला सह्याद्री फार्मस चे चेअरमन विलास शिंदे, बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे, मानद सचिव अरुण मोरे, माजी विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील, सोलापूर विभागीय अध्यक्ष श्री. काळे यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक मोठ्या संख्येने चर्चासत्राला उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान  या वेळी द्राक्ष शेतीत उल्लेखनीय काम करणाऱ्या ज्योत्स्ना दौंड, रूपाली बोरगुडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यासह संघाचे सभासद सुरेश कमानकर व हेमंत पिंगळे यांना राज्य शासनाच्या कृषी विभागाचा कृषिभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

शासन दरबारी दखल नाही द्राक्ष शेतीवर अनेक घटक अवलंबून असून, अर्थकारणाला गती मिळत आहे. उच्च उत्पन्न गटातील या पिकाला सध्या अनेक अडचणी भेडसावत आहेत. मात्र, द्राक्ष उत्पादकांना अनेक योजनांपासून दूर ठेवले जात आहे. द्राक्षाच्या निर्यातक्षम उत्पादन घेणाऱ्या उत्पादकांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष नाही. प्रश्न मांडल्यावरही दखल घेतली जात नसल्याची खंत विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com