आंबा मोहोरासाठी संजीवके योग्यपणे वापरा : डॉ. पाटील

Use marijuana properly for mango peppers: Dr. Patil
Use marijuana properly for mango peppers: Dr. Patil

सोलापूर  : "आंबा उत्पादनामध्ये मोहोराला फार महत्वाचे स्थान आहे. योग्य पद्धतीने आणि भरपूर मोहोर येण्यासाठी अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापनासह संजीवकांचा योग्य वापर महत्वाचा आहे, शेतकऱ्यांनी त्यावर लक्ष देण्याची गरज आहे,'' असे मत हिमायतबाग (औरंगाबाद) येथील फळबाग संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एम. बी. पाटील यांनी गुरुवारी (ता. १६) येथे व्यक्त केले. 

सोलापुरातील कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने ‘सघन आंबा लागवड, छाटणी, काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, निर्यात संधी आणि आव्हाने' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्याल आले होते. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रवींद्र माने, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे, उपविभागीय कृषि अधिकारी रवींद्र कांबळे, फलोत्पादन अधिकारी सचिन माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अन्न तंत्रज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. भगवान साखळे, रेनबो कंपनीचे व्यवस्थापक सुभाष पवार, निवृत्त प्रकल्प उपसंचालक विजयकुमार बरबडे, सिद्धेश्‍वर यात्रा कृषि प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे यावेळी उपस्थित होते. 

डॉ. पाटील म्हणाले, "आंब्यामध्ये कडक थंडीनंतरच मोहोर येतो. मोहोरासाठी आंब्यामध्ये वाढ उत्तेजक व वाढ निरोधक यांचा समन्वय योग्य असल्यास मोहाराची प्रक्रिया व्यवस्थित होऊ शकते. त्यादृष्टीने त्याचा विचार करावा. पण योग्य वेळी, योग्य वेळेत संजीवकांचा वापर महत्वाचा आहे. मोहोर आल्यानंतर फळे वाटाणा अथवा गोटीच्या आकाराची असताना फळगळती थांबण्यासाठी फवारणी करावी, कल्टार हे संजीवक बहर येण्याच्या आधी चार महिने जमिनीतून दिल्यास आंब्यामध्ये संयुक्त फुलांचे प्रमाण वाढते. नियमित मोहोर प्रक्रिया चालू राहते.’’ 

‘‘मोहराच्या कालावधीत तुडतुडे, भुरी व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी वेळेत किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी. तसेच सेंद्रिय खतांचा वापर करावा. त्यात शेणखत, कंपोस्ट खत ५० किलो प्रति झाड द्यावे, गांडूळखत पाच किलो द्यावे, निंबोळी पेंड प्रतिझाड एक किलो आणि स्टेरामिल अर्धा किलो प्रतिझाड या प्रमाणात द्यावे. उत्पादनवाढीसाठी त्याचा उपयोग चांगला होता.’’ 

माने यांनी जिल्ह्यात केशर आंब्याला असलेला वाव आणि त्याची गरज, तसेच फळबाग योजनेतून आंबा उत्पादकांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. तांत्रिक सत्रात डॉ. भगवान साखळे यांनी ‘आंबा प्रक्रिया उद्योग व संधी’ यावर मार्गदर्शन केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com