उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

ऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी त्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे आवश्‍यक आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास पिकावर कमतरतेची लक्षणे दिसतात. याचा वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
Use of micro nutrients for sugarcane
Use of micro nutrients for sugarcane

ऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी त्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे आवश्‍यक आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास पिकावर कमतरतेची लक्षणे दिसतात. याचा वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. ऊस पिकाच्या वाढीसाठी सोळा अन्नद्रव्यांची गरज असते. त्यापैकी नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये तर गंधक, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम ही दुय्यम अन्नद्रव्ये आहेत. लोह, जस्त, मँगेनीज, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम ही सूक्ष्म अन्नद्रव्येदेखील ऊस पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाची आहेत. एक किंवा एकापेक्षा जास्त अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे किंवा मुळांच्या माध्यमातून अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात पिकापर्यंत न पोहोचल्यामुळे उसाची वाढ कमी झालेली दिसते. अधिक उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचा अत्यल्प व अनियमित वापर, माती परीक्षणावर आधारित रासायनिक खतांचे नियोजन न करणे, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा कमी प्रमाणात वापर, मुक्त चुन्याचे जास्त प्रमाण इत्यादी कारणांमुळे जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते. मृद्‍सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्रातील साधारण ३८.६० टक्के जमिनीत जस्त, २३.१२ टक्के जमिनीत लोह, २०.६९ टक्के जमिनीत बोरॉन, ३.०२ टक्के जमिनीत मॅगेनीज तर ०.१४ टक्का जमिनीत तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून आली आहे. पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी त्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे आवश्‍यक आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास पिकावर कमतरतेची लक्षणे दिसतात. याचा वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य, कमतरतेची लक्षणे आणि उपाय  लोह 

  • प्रकाश संश्‍लेषण क्रियेमध्ये महत्त्वाचे कार्य.
  • पानांतील हरितद्रव्यांच्या निर्मितीसाठी आवश्‍यक.
  • कमतरतेची लक्षणे 

  • हरितद्रव्यांची निर्मिती कमी प्रमाणात होते. त्यामुळे पाने पिवळसर हिरवी किंवा पिवळी दिसतात.
  • पानाच्या शिरा हिरव्या तर दोन शिरांच्या मधला भाग पिवळा दिसतो.
  • योग्यवेळी उपाययोजना न केल्यास आणि अतितीव्र कमतरता भासल्यास पाने पांढरी पडून जळपटून जातात.
  • मुख्यत्वेकरून पांढऱ्या जमिनीत, सपाटीकरण केलेल्या चुनखडीच्या किंवा क्षारयुक्त व चोपण जमिनीत लोहाची उपलब्धता कमी होत असल्यामुळे ही लक्षणे दिसतात.
  • लोहाच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणाऱ्या लक्षणांस ‘केवडा रोग’ म्हटले जाते.
  • जमिनीचा प्रकार, सामू, क्षारता, जमिनीतील तीव्र चुनखडीचे प्रमाण, स्फुरदयुक्त खतांचा अधिक वापर, हवामान इत्यादींचा लोहाची उपलब्धता आणि वापरावर परिणाम होतो. त्यामुळे केवड्याची लक्षणे पीक उगवणीपासून पुढील कोणत्याही अवस्थेत दिसून येतात.
  • उपाययोजना 

  • खोडवा पिकात केवड्याचे प्रमाण अधिक दिसून येते.
  • केवडा सतत आढळणाऱ्या जमिनीत एकरी १० किलो फेरस सल्फेट (हिराकस) शेणखतात मिसळून चांगले महिनाभर मुरवावे. त्यानंतरच चळी घेऊन मातीआड करावे.
  • फेरस सल्फेट (हिराकस) या रसायनाचे ०.५ टक्का द्रावण तयार करावे. हे द्रावण ८ ते १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा पिकावर फवारावे.
  • केवडाग्रस्त भागांत लोहासोबत जस्ताची कमतरता दिसून येते. त्यासाठी फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेटची ०.५ टक्का प्रमाणात एकत्रित फवारणी करावी. द्रावण केल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत फवारणी करणे आवश्यक आहे. अन्यथा, द्रावण निरुपयोगी ठरते.
  • जस्त  प्रथिने आणि आरएनए निर्मितीमध्ये जस्त महत्त्वाचे कार्य पार पाडते. या अन्नद्रव्यामुळे संप्रेरक द्रव्यांची (हार्मोनस) निर्मितीसाठी मदत होते. पिकाच्या प्रजनन प्रक्रियेत या अन्नद्रव्याची आवश्यकता असते. कमतरतेची लक्षणे 

  • पानांच्या शिरांजवळ पिवळे पट्टे दिसतात. तसेच पाने पिवळी पडून त्यावर तपकिरी ठिपके दिसतात.
  • पाने अरुंद होऊन शिरा हिरव्या दिसतात. पानांवर जळके ठिपके येतात.
  • उसाच्या कांड्याही आखूड होतात.
  • उपाययोजना 

  • चुनखडीच्या जमिनीत जस्ताची कमतरता जास्त दिसते. अशा जमिनीत एकरी ८ किलो झिंक सल्फेट शेणखतात मिसळून चांगले महिनाभर मुरवावे. आणि नंतरच चळी घेऊन मातीआड करावे किंवा
  • झिंक सल्फेट या रसायनाचे ०.५ टक्का द्रावण ८ ते १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा पिकावर फवारावे.
  • मँगेनीज  कार्य 

  • प्रकाश संश्‍लेषण, प्रथिने निर्मिती, संजीवके प्रक्रियेत सहभाग. संप्रेरक म्हणून रासायनिक प्रक्रियेत सहभाग असतो.
  • हरितद्रव्य तयार करण्यात महत्त्वाचे कार्य.
  • लक्षणे 

  • चुनखडीयुक्त किंवा विम्लयुक्त जमिनीत कमतरतेमुळे पानाच्या मध्य भागात समांतर पिवळे पट्टे दिसतात.
  • आंतरशिरातील भाग वगळून फक्त शिरांचा भाग हिरवा राहतो.
  • पानांवर तांबूस काळे ठिपके दिसतात. प्रथम लक्षणे शेंड्याकडील नवीन पानांवर दिसतात.
  • उपाययोजना  मँगेनीज सल्फेट एकरी १० किलो शेणखतात मिसळून द्यावे. तांबे  कार्य 

  • श्‍वसनक्रियेत नियमन करण्यात महत्त्वाचे कार्य. साखर आणि प्रथिने निर्मितीमध्ये सहभाग.
  • लोहाचा योग्य उपयोग होण्यासाठी तांबे महत्वाचे असते. हरितद्रव्याच्या निर्मितीमध्ये याचा सहभाग असतो.
  • लक्षणे 

  • पिकाची तांब्याची गरज फार कमी प्रमाणात असते. तांब्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाल्यास पिकास अपायकारक ठरते.
  • तांब्याच्या कमतरतेमुळे ऊस पिकाचा वाढीचा वेग कमी होतो.
  • पानांच्या कडा गुंडाळल्या जातात आणि पाने वाळतात.
  • जुन्या पानात गर्द तपकिरी काळ्या रंगाचे ठिपके दिसतात. पाने पिवळी पडून काही दिवसांनी पांढरी होतात. पाने कोमजून मरतात.
  • उपाययोजना  महाराष्ट्रातील जमिनीत तांबे पुरेशा प्रमाणात असल्यामुळे तांबेयुक्त खतांचा वापर करणे गरजेचे नाही. परंतु माती परीक्षणानुसार तांब्याची कमतरता आढळल्यास, कॉपर सल्फेट एकरी ५ किलो या प्रमाणात वापर करावा. संपर्क : ०२०-२६९०२२७८ (वसंतदादा शुगर इन्टिट्यूट, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com