कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी सामाजिक माध्यमांचा वापर

छोट्या उद्योगापासून बहुराष्ट्रीय कंपन्यापर्यंत सर्वजण सामाजिक माध्यमांचा (सोशल मिडिया) वापर आपल्या उत्पादनांच्या जाहिरात, विक्री, वितरण आणि पुरवठा या साऱ्या टप्प्यावर करत असतात. आपण शेतकऱ्यांनीही याचा जागरुकपणे वापर केल्यास उत्पन्नामध्ये चांगली भर पडू शकेल.
use of social media platform for selling the agricultural produce
use of social media platform for selling the agricultural produce

छोट्या उद्योगापासून बहुराष्ट्रीय कंपन्यापर्यंत सर्वजण सामाजिक माध्यमांचा (सोशल मिडिया) वापर आपल्या उत्पादनांच्या जाहिरात, विक्री, वितरण आणि पुरवठा या साऱ्या टप्प्यावर करत असतात. आपण शेतकऱ्यांनीही याचा जागरुकपणे वापर केल्यास उत्पन्नामध्ये चांगली भर पडू शकेल. बहुतांश सर्व शेतकऱ्यांकडे आज स्मार्ट फोन आहेत. त्यामध्ये अनेक सामाजिक माध्यमे तो नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी वापरतही असतो. या सामाजिक माध्यमांचा वापर अनेक शेतकऱ्यांनी या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामध्ये शेतीमालाच्या विक्रीसाठी चांगल्या प्रकारे केला. शहरातील सोसायट्या, ग्राहकांना मेसेज, फोटो, व्हिडिओ याद्वारे त्याच्याकडे असलेल्या विक्रीयोग्य मालाची जाहिरात केली. त्यातून तयार झालेली मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन केले. यात दोघांचाही फायदा होता. शहरी ग्राहकांनाही थेट शेतातील ताजा माल उपलब्ध झाला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करता आली. यातून शेतकरी ते प्रत्यक्ष ग्राहक यात पहिल्यांदाच बंध जुळले, ही बाब चांगली घडली. मध्यस्थांची वाढत गेलेली अकारण साखळी कमी होण्यास यातून मदत होईल. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य ते दाम मिळू शकेल. या साऱ्या प्रक्रियेमध्ये उत्साही, तरुण शेतकऱ्यांचा व शेतकरी उत्पादक कंपन्यांचा पुढाकार होता. मात्र, जुन्या विचारांच्या, वयस्कर आणि तुलनेने फोन वापरता न येणाऱ्या लोकांना अडचणी आल्या. या शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यातून त्यांच्या उत्पादनांना स्थानिक ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवणे शक्य आहे. सर्वत्र वापरात असलेल्या डिजिटल माध्यमांचा शेतकऱ्याला कसा फायदा होऊ शकतो, हे आपण पाहू.

व्हाट्सअॅप :

  • हे बहुतांश सर्वांच्या फोन असणारे संदेश वाहक अॅप आहे. त्यातून शब्द, छायाचित्रे, ऑडिओ आणि व्हीडिओ संदेश पाठविता येतात. यातून शेतीमालाचे अधिक तपशील शहरी ग्राहकांपर्यंत पोचवता येतात. त्यासाठी शहरातील रहिवासी वसाहती, सोसायटी, टॉवर्स यांच्या समितीतील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपला उद्देश स्पष्ट केल्यास विश्वासार्हता मिळू शकते. कोणती उत्पादने आपण पुरवू शकतो, याची संपर्क क्रमांकासह असलेली माहितीपत्रके द्यावीत. असा मेसेज किंवा डिजिटल लीफलेट सोसायटीच्या ग्रुपमध्ये प्रसारित करण्याची विनंती करावी.  
  • त्यावर बुकींग घेऊन आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा नियमितपणे शहरी ग्राहकापर्यंत शेतीमाल पोचवता येईल. शेताच्या बांधावरून योग्य स्वच्छता पाळून आलेल्या ताज्या मालाला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळू शकतो. नियमित माल घेणाऱ्या ग्राहकांचा ग्रुप तयार करून नव्या संधी व मागणीही तयार होईल. असे अनेक प्रयत्न शेतकरी गटांनी या लॉकडाऊनमध्ये केले व त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
  • फेसबुक

  • सध्या फेसबुकचा वापर केवळ मित्रमंडळींपुरताच केला जातो. मात्र, फेसबुकमध्ये स्वतःच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी वेगळे खाते किंवा पेज तयार करण्याची सुविधा आहे. या पेजच्या माध्यमातून अनेक फॉलोवर्स जोडून संभाव्य ग्राहक तयार करता येतात. यात आपण वर्षभर घेत असलेल्या पिकांचे, त्यात राबवत असलेल्या योग्य व्यवस्थापनाचे, काढणी व त्यानंतर स्वच्छता पाळून करत असलेल्या वितरणाचे फोटो, शिवारातील व्हिडियो अशी माहिती सातत्याने टाकत राहावी. त्यातून येणाऱ्या ग्राहकांच्या मागण्यानुसार योग्य ते बदल करावेत.  
  • आठवड्यातील काही दिवस ठरवून सर्वांना एकदाच माल पोचवणे, आधी बुकिंग घेणे सोयीचे ठरते. याच पेजवर आपल्या ग्राहकांचा प्रतिसाद, त्यांचे चांगले अभिप्राय टाकल्यास तीच आपली उत्तम जाहिरात ठरते. त्यातून विश्वासार्हता वाढते. शेतीसोबतच कृषी पर्यटनासारखा जोड व्यवसायासाठी तर हे तंत्र अत्यंत फायद्याचे ठरते. फेसबुकवर आपल्या जाहिरातीही करता येतात. अर्थात, त्यासाठी अल्पसा खर्च करावा लागतो. मात्र, यासाऱ्यातून आपले शेत व त्यातील उत्पादनांचा ब्रँड तयार करता येतो.
  • फेसबुकवर आपल्या उत्पादनाची जाहिरात कशी करावी, ते पाहू. कमी खर्चामध्ये आपण हजारो ग्राहकांपर्यंत पोहचू शकतो. तसेच जाहिरातीची पूर्ण प्रक्रिया व होणारा खर्च, बजेट आपण स्वतःच ठरवू शकतो. कोणत्या ग्राहकापर्यंत पोचायचे, हेही आपल्याला निवडता येते. म्हणजे फेसबूक जाहिरात आपल्या नियंत्रणात असते. अर्थात, यासाठी फेसबुकला काही रक्कम क्रेडिट कार्ड व अन्य पद्धतीने अदा करावी लागते.

  • सर्वप्रथम आपल्या उत्पादनाची संपूर्ण माहिती, वैशिष्ट्ये व दर्जा याविषयीची माहिती ठरवावी. यामध्ये आपल्या उत्पादनाचा रंगीत, आकर्षक छायाचित्रे जरूर असावीत. संपर्क क्रमांक द्यावा. उत्पादनाची किंमत टाकणे हे ऐच्छिक आहे. दरासाठी ग्राहकाने संपर्क करण्याची विनंती करू शकतो.
  • पोस्ट यशस्वीरीत्या पेजवर प्रकाशित झाल्यावर, पोस्टचा उजव्या खालील बाजूला असलेल्या Boost post बटणावर क्लिक केल्यानंतर काही पर्याय दिसतील ते पुढील प्रमाणे :
  • पोस्ट रिजल्ट-  तुम्हाला तुमच्या पोस्टचा अंतिम निकाल इथे काय असावे हे ठरविता येते. म्हणजे तुम्हाला तुमच्या पोस्टवर लाइक , शेअर व कमेंट करण्याइतपत जाहिरात करायची आहे की ग्राहकाशी मेसेंजर वापरून बोलायचे आहे ते ठरवू शकतो. त्यापैकी एका पर्यायावर क्लिक करावे.
  • प्रिविव्ह -  आपली जाहिरात ग्राहकाला कशी दिसते, ते येथे पाहता येते. ती ग्राहकाला न्यूज फीडमध्ये दिसावी किंवा व्हिडीओमध्ये दिसावी, हे आपण ठरवू शकतो.
  • पोस्ट बटन-  आपल्या ग्राहकाला जाहिरातीत कोणते बटन दिसावे, क्लिक करून आपल्या पर्यंत पोहचू शकतो हे ठरवता येते. यात आपल्याला सोयिस्कर एक पर्याय द्यावा. उदा. संपर्क क्रमांक, मेल पत्ता, व्हॉटसॲप क्रमांक इ.
  • ऑडियन्स-  आपल्याला हवा असलेला ग्राहक हा किती वर्ष वयाचा असावा, स्त्री की पुरुष, कुठल्या भागातील असावा, त्याचा आवडी काय असाव्यात इ. मुद्देही आपल्याला ठरवता येतात. तसेच नकाशाचा वापर करून भौगोलिक अंतर ठरवता येते. create new audience हा पर्याय वापरून, त्यात आपल्या उत्पादनाच्या संभाव्य ग्राहकांचे वय, लिंग, आवड, ठिकाण इ. अधिक तपशिल भरावा.
  • ड्युरेशन आणि बजेट-  जाहिरात किती दिवस फेसबुक ग्राहकांपर्यंत पोहचावी, हे त्यातील कॅलेंडरमध्ये सुरुवात व अंतिम तारिख निवडून ठरवू शकतो. हे आपले उत्पादन किती काळ उपलब्ध आहे, आपले बजेट यानुसार ठरवावे. प्रत्येक कालावधीकरिता किती खर्च येईल, हे फेसबुकद्वारे सुचवले जाते.
  • पोस्ट रिझल्ट-  आपल्या जाहिरातीचा निकाल काय असेल, हे आपल्याला एस्टीमेटेड या पर्यायात पाहता येते.
  • ही सोपी प्रक्रिया आहे. आपल्या बजेटनुसार पुन्हा वेगळे पर्याय (कालावधी इ.) निवडता येतात.
  • पेमेंट   -  निर्धारित बजेट आणि वेळेप्रमाणे भरावयाची रक्कम योग्य त्या करासह दिसते. पेमेंट करण्याचे विविध डिजिटल पर्याय उदा. क्रेडिट कार्ड व अन्य. आपण पेमेंट सेटिंगमध्ये सेव्ह केल्यावर जाहिरातीत आपल्याला ते तपशील दिसतात. हे पेज अथवा मेलवरही दिसू शकतात.
  •  Ads manager या पर्यायावर जाऊन हे पेमेंटचे तपशील बघू शकतो. ते व्यवस्थित पाहून कन्फर्म केल्यानंतर फेसबुकच्या जाहिरातीसंबंधीच्या अटी मान्य केल्यावर आपली जाहिरात कशी दिसेल, हे पुन्हा पाहता येते. त्यानंतर आपली जाहिरात प्रकाशित होते. ही प्रकाशित झालेली जाहिरात, पोस्ट आपल्याला पेजला दिसते. पेजच्या वरील बाजूला असलेल्या Ad Centre मध्ये जाऊन आपली जाहिरात काय पद्धतीने कार्य करते, ते तपासता येते.  
  • इंस्टाग्राम  हे माध्यम प्रामुख्याने फोटो आणि व्हिडियो प्रसारित करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. फेसबुकप्रमाणे आपले अकाउंट बनवता येते. त्यानंतर शेतीमालाचे तपशील टाकून आपण पोस्ट आणि मेसेज द्वारे हजारो लोकांपर्यंत पोचता येते.

    गुगल बिजनेस अकाउंट इंटरनेटवर विशेषतः गुगलवर शहरी ग्राहक त्यांच्या आवश्यकतेच्या उत्पादनांचा शोध घेतात. त्यांत अन्नधान्यांसह फळे, भाज्या यांचाही समावेश असतो. अशा वेळी गुगल सर्चमध्ये आपल्या उत्पादनांचा समावेश करण्यासाठी गुगल बिजनेस अकाऊंट असणे गरजेचे असते. त्यासाठी गुगल बिजनेस मध्ये इमेल ऍड्रेस बनवून आपला संपर्क क्रमांक, शिवारचा पत्ता, नकाशा आदी तपशील भरायचे असतात. आपल्या शेती उत्पादनांचे फोटो आणि व्हिडीओ वगैरे आपण त्यात प्रदर्शित करू शकतो. हे अर्थात मोफत असते. शेतकऱ्याला आपली उत्पादन अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यापर्यंत पोचवणे शक्य होते. यात आपल्या जवळच्या ग्राहकांनाही वैयक्तिकरित्याही विक्री करता येते.

    युट्यूब

  • हे एक व्हिडिओ प्रसारित करण्याचे माध्यम असून, आपल्या उत्पादनांचे व्हिडिओ अपलोड करता येतात. त्यासाठी आपले एक चॅनेल बनवू शकतो. आपल्या कृषी उत्पादनाची माहिती, उपयुक्तता, अन्य वैशिष्ट्ये, आरोग्यासाठीचे उपयोग वगैरेचे व्हिडीओ व जाहिराती अपलोड कराव्यात. अलिकडे प्रत्येक मोबाईलमध्येही उत्तम दर्जाचे व्हिडिओ तयार करता येतात. त्यांच्या सुधारणांसाठीही अनेक अॅप आहेत. या माध्यमातूनही जगभरातील मोठ्या ग्राहकापर्यंत पोहचू शकतो.
  • अर्थात, या साऱ्या सामाजिक माध्यमामध्ये उत्पादनांचा ताजेपणा, स्वच्छता आणि पॅकेजिंगचे महत्त्व वाढत जाते. त्याकडे आपल्या शेतकऱ्यांना हळूहळू लक्ष द्यावे लागणार आहे. त्याच प्रमाणे पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी डिजिटल पेमेंटसोबत रोख आणि आगावू रकमेबाबत आग्रही राहावे लागेल. यातून फसवणूक टाळता येईल.
  • संपर्क- चेतन नलावडे, ८३०८३९९१०० (संस्थापक - भागीदार, पीएन सेफ्टी इंडस्ट्रीज, मुंबई.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com