जमीन सुधारणेसाठी भूसुधारकांचा वापर

जमीन वारंवार लागवडीखाली असल्याने किंवा चुकीच्या मशागत पद्धतीमुळे जमिनीचा वरील थर कडक होतो. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. अशा जमिनीत भूसुधारकांचा वापर केल्यास जमीन सच्छिद्र होऊन हवा खेळती राहण्यास मदत होते.
Use of soil amendments for land improvement
Use of soil amendments for land improvement

जमीन वारंवार लागवडीखाली असल्याने किंवा चुकीच्या मशागत पद्धतीमुळे जमिनीचा वरील थर कडक होतो. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. अशा जमिनीत भूसुधारकांचा वापर केल्यास जमीन सच्छिद्र होऊन हवा खेळती राहण्यास मदत होते. जमिनीची गुणवत्ता ही मुख्यत्वेकरून जमिनीची खोली, सच्छिद्रता, पाणी झिरपण्याचा वेग, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, घनता आणि अन्नद्रव्ये इत्यादींवर अवलंबून असते. परंतु, एकल पीकपद्धती, सेंद्रिय निविष्ठांचा कमी वापर, सुधारके नसलेली रासायनिक खते आणि पीक फेरपालट यांच्या अभावामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादनातील सातत्य ढासळत चालले आहे. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता मिळविण्यासाठी भूसुधारके आणि जैविक खतांचा शास्त्रोक्त आणि किफायतशीर वापर करणे आवश्‍यक आहे. जमिनीचा पोत आणि अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच जमिनीची सुधारणा घडवून आणण्यासाठी उपयोगी येणाऱ्या निविष्ठांना भूसुधारके म्हणतात. सेंद्रिय भूसुधारके आणि रासायनिक किंवा नैसर्गिक भूसुधारके असे प्रकार आहेत.

सेंद्रिय भूसुधारके 

  • भरखतांमध्ये शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, सोनखत आणि सांडपाणी यांचा समावेश होतो. भरखते जास्त प्रमाणात वापरावी लागतात.
  • जोरखतांमध्ये निंबोळी पेंड, मासळी खत, हाडांचे खत, प्रेसमड, स्पेंट वॉश आणि मळी यांचा समावेश होतो. जोरखते भरखताच्या तुलनेत कमी प्रमाणात लागतात. मात्र, रासायनिक भूसुधारकांपेक्षा यांचे जास्त प्रमाण वापरावे लागते.
  • उसाच्या शेतातील जमीन सच्छिद्र होण्यासाठी प्रेसमड केक खूप फायदेशीर आहे.
  • उसाची मळी आणि आसवनीमधून मिळणारा स्पेंट वॉश गुणधर्माने आम्लारी आहे. यामध्ये मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे चांगले प्रमाण असते. यामध्ये कर्बाचे प्रमाण भरपूर असल्याने सिंचनाचा जास्त वापर होणाऱ्या शेतीमध्ये सामू संतुलित करण्यासाठी उपयोग होतो. यामुळे जमिनीतील क्षार कमी होऊन ऊस उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • पीक अवशेषांचा वापर करावा.
  • नैसर्गिकरीत्या आढळणारे जिप्सम, चुनखडी, गंधक तसेच आयर्न पायराइट यांचा रासायनिक किंवा नैसर्गिक भूसुधारकांमध्ये समावेश होतो.
  • भूसुधारकांचे जमीन व्यवस्थापनामध्ये महत्त्व 

  • जमीन वारंवार लागवडीखाली असल्याने किंवा चुकीच्या मशागत पद्धतीमुळे जमिनीचा वरील थर कडक होतो. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. अशा जमिनीत भूसुधारकांचा वापर केल्यास सच्छिद्र होऊन हवा खेळती राहण्यास मदत होते.
  • जमीन सच्छिद्र झाल्याने हवा, पाणी आणि तापमान यांचे गुणोत्तर संतुलित राहते.
  • जमिनीची घनता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, पाणी मुरण्याची क्षमता आणि पाणीवहनाची क्षमता वाढते.
  • जमिनीत असणारे विविध जिवाणू आणि फायदेशीर बुरशी यांची संख्या वाढल्याने सेंद्रिय कर्ब संतुलित राहण्यास मदत होते.
  • जमिनीमध्ये पाणी वहनाची तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढल्याने पावसामध्ये खंड पडल्यास पिकांना ताण बसत नाही.
  • पाण्याची उपलब्धता वाढल्याने जमिनीतील अन्नद्रव्यांचे वहन सुधारते. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
  • जमीन सच्छिद्र झाल्याने पिकांच्या मुळांची वाढ चांगली होते. यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उचल चांगल्या प्रमाणात होऊन पीक उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • जमिनीच्या विविध घटकांमध्ये सुधारणा होऊन मातीची आणि पाण्याची होणारी धूप कमी होण्यास मदत होते.
  • समस्यायुक्त जमिनीमध्ये भूसुधारकांचे महत्त्व 

  • समस्यायुक्त जमिनीमध्ये खारवट, आम्ल आणि चुनखडीयुक्त जमिनीचा समावेश होतो. खारवट जमिनीमध्ये पाण्याचा अयोग्य निचरा, मातीतील घट्टपणा, अन्नद्रव्यांची अनुपलब्धता, मातीची होणारी धूप आणि जमिनीत पडणाऱ्या भेगा या प्रमुख समस्या आहेत.
  • आम्ल जमिनींचा सामू कमी असल्याने हायड्रोजन आयन आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असल्याने अन्नद्रव्यांचे वहन व्यवस्थित होत नाही. परिणामी, उत्पादनावर परिणाम होतो.
  • चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने पाण्याचा निचरा, अन्नद्रव्यांचे वहन तसेच इतर जैविक घटकांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अशा जमिनीमध्ये भूसुधारकांचा वापर खूप फायदेशीर ठरतो.
  • खारवट, चोपण जमिनीमध्ये जिप्सम, गंधक किवा आयर्न पायराइट यांचा वापर फायदेशीर आढळून आला आहे. अशा जमिनीमध्ये जिप्सम आवश्यकतेच्या ५० टक्के वापराची शिफारस करण्यात आली आहे.
  • समस्यायुक्त चोपण जमीन सुधारणेकरिता २.५ टन जिप्सम वापराची शिफारस आहे. रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर करून शिफारशीत खतमात्रेसोबत सरीमध्ये १.२५ टन जिप्सम आणि २.५ टन शेणखत वापराची शिफारस आहे.
  • आम्ल जमिनीमध्ये चुना (लाइम) वापरल्याने जमिनीचा सामू संतुलित होऊन पाण्याचा निचरा आणि अन्नद्रव्यांचे वहन सुधारल्याचे आढळून आले आहे.
  • पीक अवशेष

  • पिकांचे अवशेष हे सेंद्रियकरणाच्या प्रक्रियेनंतर जमीन सच्छिद्र करण्यास मदत करतात. ज्यामुळे जमिनीचा निचरा सुधारतो.
  • सेंद्रिय कर्ब तसेच सुपीकता वाढविण्यास मोलाची मदत करतात.
  • सेंद्रिय पदार्थांचे तसेच गांडुळाची संख्या वाढविण्यास मदत.
  • धूप होण्यास अडथळा निर्माण करतात.
  • बाष्पीभवनाचा वेग कमी करून जलधारणा क्षमता वाढवितात.
  • संतुलित पोषणास चालना मिळते.
  • अवशेषांमुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता सुधारते.
  • विविध पिकांद्वारे मिळणारे अवशेष  

    पीक पिकांचे अवशेष (क्विं./हे)
    ज्वारी, मका १ ते १.५
    कापूस ४ ते १०
    सोयाबीन १२ ते १४
    मूग २ ते २.५
    उडीद १.८ ते २.४
    गहू ८ ते १०
    हरभरा ३ ते ४
    तूर २० ते २३

    सेंद्रिय खते या प्रकारच्या खतामध्ये शेणखत, गांडूळखत, जैविक खत, हिरवळीचे खत, फॉस्फो कंपोस्ट आणि पीक अवशेष यांचा समावेश होतो. ही खते जमिनीस सच्छिद्र करण्यास मदत करतात. सेंद्रिय आम्ले तयार करतात. सेंद्रिय खतांमुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. तक्त्यामध्ये निर्देशित खत एक टन प्रति एकर वापरल्यास खालीलप्रमाणे नत्र, स्फुरद आणि पालाश उपलब्ध होतात.  

    खत (१ टन) अन्नद्रव्यांची मात्रा (किलो/टन)
    -- सेंद्रिय खत
    -- नत्र (किलो) स्फुरद (किलो) पालाश (किलो)
    शेणखत ५ ते १० २ ते ४ ५ ते १०
    गांडूळखत १२ ते १५ २.५ ते ५ ७.५ ते १०  
    कंपोस्ट (ग्रामीण) ४ ते ८ ३ ते १० ७ ते १०
    कंपोस्ट (शहरी) ९ ते १९ १० ते १५ ७ ते १२.५
    फॉस्फो कंपोस्ट १० ते १२ १९ ते २० ९ ते १०

    हिरवळीची खते हिरवळीची खते मुख्यतः नत्राचा पुरवठा करतात. मुख्य पीक उभे असताना हिरवळीचे खत जमिनीत गाडले जाते.

    हिरवळीचे खत (१ टन) नत्र (किलो)/प्रति टन
    धैंचा ४.२
    ताग किंवा बोरू ४.३
    मूग ५.३
    उडीद ८.५
    गिरिपुष्प (वाळलेले) २७.४

    टीप-  हिरवळीच्या खतांमधून स्फुरद आणि पालाश उपलब्ध होते. परंतु, नत्रापेक्षा त्याची मात्रा कमी असते. विविध प्रकारच्या ढेप वापरल्यास अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो.

    सेंद्रिय खत अन्नद्रव्यांची मात्रा (कि/टन)
    -- ढेप
    -- नत्र स्फुरद पालाश
    निंबोळी ढेप ५० १० १५
    करंज ढेप ४० १० १०
    भुईमूग ढेप १२ ९.५

    संपर्क - डॉ. नितीन कोंडे, ९८२२८७५३७५ (मृद विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com