हापूसच्या वाहतुकीसाठी एसटीचा वापर करा : जनता दल

कोरोनाच्या साथीमुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला असताना आंब्याच्या वाहतुकीसाठी गाड्या उपलब्ध होत नसल्याने अडचणीत भरच पडली आहे.
hapus
hapus

मुंबई: कोरोनाच्या साथीमुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला असताना आंब्याच्या वाहतुकीसाठी गाड्या उपलब्ध होत नसल्याने अडचणीत भरच पडली आहे. त्यामुळे सध्या प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसचा वापर हापूस आंब्याच्या वाहतुकीसाठी करावा, अशी मागणी जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे केली आहे. कोरोना साथीचा मोठा फटका कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा तयार व्हायला लागतो. नेमक्या याच काळात कोरोना साथीमुळे देशात संचारबंदी लागू झाली. अनपेक्षितपणे संपूर्ण वाहतुकच बंद झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा झाडावरच राहू दिला होता. मात्र, आता संचारबंदी ३ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर आंबा तयार असून त्याचे करायचे काय?  असा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. आंबा वाहतुकीला सरकारने परवानगी दिली असली तरी एकूणच अडचणीमुळे दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने ट्रक उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे एकीकडे फळे झाडावर तयार होऊन गळायला लागली आहेत, दुसरीकडे दरात मोठी घसरण झाली आहे. मुंबईत साधारण डझनाला ६०० ते ८०० रुपये मोजावे लागत असताना कोकणातील शेतकऱ्याला जागेवर चार ते साडेचार डझन आंब्याच्या पेटीला अवघे ८०० ते १००० रुपये मिळत आहेत. वाहतुकीची व्यवस्था न झाल्यास शेतकऱ्यांच्या हातात हेही पैसे पडणार नाहीत. त्यामुळे सरकारने सध्या प्रवासी वाहतूक बंद असल्याने आगारातच उभ्या असलेल्या एसटी बसचा यासाठी वापर करावा, अशी मागणी जनता दलाचे उपाध्यक्ष सुहास बने, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलीम भाटी यांनी केली आहे. आंबा वाहतूक सुरू केल्यास सद्य स्थितीत एसटीला उत्पन्नाचा एक मार्गही उपलब्ध होईल तर दुसरीकडे तयार आंबा मुंबई, पुणे वा अन्य शहरांपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे पडतील आणि ग्राहकांनाही योग्य किमतीत तो मिळू शकणार आहे, असे जनता दलाने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com