agriculture news in Marathi, use of water resources | Page 2 ||| Agrowon

मांडा जलसंधारणाच्या कामाचे गणित
डॉ. उमेश मुंडल्ये
मंगळवार, 2 जुलै 2019

मागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील पर्जन्य जलसंधारणाबद्दल माहिती घेतली. प्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचे बळकटीकरण करणे किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. आजच्या भागात आपण पर्जन्य जलसंधारण करताना पाण्याचे गणित कसं मांडायचे ते पाहूयात. 

मागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील पर्जन्य जलसंधारणाबद्दल माहिती घेतली. प्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचे बळकटीकरण करणे किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. आजच्या भागात आपण पर्जन्य जलसंधारण करताना पाण्याचे गणित कसं मांडायचे ते पाहूयात. 

कोणत्याही ठिकाणी जलसंधारण उपाय करायचा असेल तर पहिली पायरी आहे त्या ठिकाणच्या पाण्याचे गणित मांडणे. सर्वसाधारणपणे जिथे पाण्याची टंचाई असते, तिथे आपण जलसंधारण उपाय योजना ठरवतो. पण असे एक निरीक्षण आहे की बहुसंख्य वेळा हे काम भावनेच्या प्रभावाखाली करण्याचे प्रमाण जास्त असल्याने अभ्यासाचे प्रमाण कमी असते. केवळ पाण्याची टंचाई आहे म्हणून आम्ही जलसंधारणाचे काम करतो हे विधान निव्वळ भावनेच्या भरात केलेले विधान असते. त्यामुळे अशा प्रयत्नांचा परिणाम अपुरा, चुकीचा आणि मनस्ताप देणारा असू शकतो.

जलसंधारण कामांमध्ये लोकसहभाग याचाही अर्थ अनेकदा चुकीचा काढला जातो आणि शेवटी त्याचे परिणाम अपयशाच्या रुपात पाहायला मिळतात. लोकसहभाग हा केवळ गावातील स्रोत आणि एकूणच गावाबद्दल माहिती योग्य आणि अनुभवी तज्ज्ञाला देणे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कामात सहभाग घेणे असा आहे. हे आजही फार कमी लोकांना कळते. त्यामुळे सध्या चाललेल्या प्रचंड कामानंतरही पाण्याची टंचाई कमी न होता वाढत आहे. हे प्रमाण किती आहे हे त्या त्या ठिकाणच्या पाणी टॅंकरच्या मागणीवरून सहज कळू शकेल.

लोकसहभागाचे टप्पे 

 •  सर्वात पहिली पायरी म्हणजे गावातील सर्व लोकांची सभा. त्यात गावातील स्रोतांविषयी माहिती घेणे आणि लोकांशी बोलून नक्की समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
 •  गावाची माहिती घेताना पाण्याच्या एकूण मागणीविषयी माहिती घेणे आवश्यक आहे. गावाची पाण्याची वार्षिक मागणी किती आहे आणि गावातील सर्व उपलब्ध स्रोतांची पाणी पुरवण्याची क्षमता किती आहे, या दोन गोष्टींबद्दल आपण जेवढी अचूक माहिती मिळवू, तेवढं निरुपयोगी श्रम न घेता, योग्य उपाय योजून त्यात यश मिळण्याचे प्रमाण जास्त असते.
 •     पाण्याच्या गरजेविषयी नोंद घेताना केवळ लोकांना पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा विचार न करता, वापरासाठी, जनावरांसाठी आणि दुसऱ्या पिकासाठी लागणारं पाणी याचे गणित मांडावे. फक्त पिण्याचे पाणी देऊन गावाचे स्थलांतर थांबत नाही. त्यामुळे योजना आखताना या सर्व गोष्टींचा विचार करून मग त्यानुसार काम करावे, म्हणजे यश मिळवणे सोपे जाते.  
 •     गावाबद्दल पुरेशी माहिती मिळाल्याची खात्री झाली की त्यानंतर दुसरी पायरी येते ती म्हणजे मिळालेली माहिती किती अचूक आहे याची खात्री गावकऱ्यांना सोबत घेऊन सर्व स्रोतांची पाहणी आणि अभ्यास करून नक्की करणे. 
 •  यानंतरचा टप्पा येतो स्थलानुरूप जलसंधारण योजनेची आखणी. प्रत्येक स्रोताचा स्वतंत्र विचार करून त्याची ताकद वाढवण्यासाठी उपाय योजणे आणि सर्व स्रोतांचा एकत्रित विचार करून त्या गावाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी गरजेपुरते अडवून, जिरवून, साठवून, बाकी पाणी पुढे जाऊ देणे या विचाराने पूर्ण योजना आखली जाते. हे करताना योग्य आणि अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन दूरगामी यशासाठी अनिवार्य आहे.
 • योजनेच्या आखणीनंतर स्थानिक लोकांच्या सहभागातून ती योजना योग्य प्रकारे राबवली जाणे आवश्यक आहे. काय काम करायचं, कुठे करायचं, किती प्रमाणात करायचं इत्यादी तांत्रिक बाबींमध्ये तज्ज्ञांचा सल्ला आणि मत हे सर्वात महत्त्वाचे असणे आवश्यक असते. 
 • प्रत्यक्ष कामात गावकऱ्यांचा सहभाग असेल तर त्याचा कामाच्या दर्जावर सकारात्मक परिणाम होतो. श्रमदान झाले तर गावकऱ्यांना त्या कामाबद्दल आपलेपणाचा अधिकार वाटतो. त्या कामावर आधी आणि पूर्ण झाल्यावरही लक्ष राहाते. यामुळे कमी खर्चात, कमी वेळात चांगल्या प्रतीचे काम उभे राहाते.
 • जोपर्यंत कामामध्ये रोजच्या वापरासाठी पाणी मिळवताना कोणत्याही प्रकारची ऊर्जा वापरावी लागत नाही, तोपर्यंत ती सर्व कामे सुरळीत चालतात असा अनेक ठिकाणचा अनुभव आहे. 

पावसाच्या पाण्याचे गणित कसे मांडायचे? 
आपण शहरातील एका इमारतीच्या परिसराचे उदाहरण घेऊ. मुंबईमध्ये ५०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर असलेल्या २०० चौरस मीटर छत असलेल्या इमारतीमध्ये दरवर्षी किती पाणी पर्जन्य जलसंधारणासाठी उपलब्ध होईल, याचे गणित मांडूयात. 
परिसराचे क्षेत्रफळ        =  ५०० चौरस मीटर 
इमारतीच्या छताचे क्षेत्रफळ    =  २०० चौरस मीटर 
एकूण वार्षिक पाऊस    =  २.२ मीटर
पाण्याचे एकूण प्रमाण       =  परिसराचे क्षेत्रफळ x एकूण पाऊस 
५०० चौरस मीटरसाठी      =  ५००  x २.२ 
                               =  ११०० घनमीटर (११,००,००० लिटर्स)
आपण गृहीत धरले की फक्त ६० टक्के पाणी आपण घेणार आहोत, बाकीचे पाणी जमिनीत मुरणार आहे आणि वाहून जाणार आहे.
 पाण्याचे प्रमाण       =  ११,००,०००  x ०.६ 
                           =  ६,६०,००० लिटर्स 
इमारतीच्या छतावरील पाणी    =  २००  x २.२ 
                                    =  ४४० घनमीटर (४,४०,००० लिटर्स)
यापैकी ८० टक्के पाणी घेतले तर, पाण्याचे प्रमाण   
            =  ४,४०,००० x ०.८ 
                                =  ३,५२,००० लिटर्स 
निष्कर्ष ः  

 • साधारणपणे एका माणसाला एका दिवसाला १० लिटर पाणी पुरते. त्यामुळे वरील गणिताप्रमाणे विचार केला तर फक्त इमारतीच्या छतावर पडणाऱ्या पावसाचे पाणी साधारण १०० लोकांना फक्त पिण्यासाठी वर्षभर पुरेल. पण हे झाले मुंबईसारख्या ठिकाणी, जिथे पाऊस जवळपास सव्वादोन मीटर पडतो. आपण एवढंच काम पुण्यासारख्या ठिकाणी केले तर आपल्याला एवढा फायदा होताना दिसणार नाही. कारण पुण्याचं पर्जन्यमान आहे ७५० मिमी म्हणजेच पाऊण मीटर.
 •  याचा अर्थ असा, की जे काम मुंबईत करून आपल्याला पावसाचं ३,५०,००० लिटर पाणी दरवर्षी पर्जन्य जलसंधारणासाठी उपलब्ध होते, तेच काम पुण्यात करून फक्त १,२०,००० लिटर पाणी उपलब्ध होईल. म्हणजेच ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की प्रत्येक ठिकाणी भौगोलिक परिस्थितीनुसार पावसाचं प्रमाण बदलते. त्यानुसार प्रत्येक ठिकाणचे उपलब्ध पाण्याचे प्रमाण बदलत राहील.
 • आपण जिथे काम करणार आहोत, तेथील पर्जन्यमान, भौगोलिक परिस्थिती, जमिनीचा पृष्ठभाग (माती, फरशी, कॉंक्रीट इत्यादी) किंवा छताचा पृष्ठभाग कसा आहे (सपाट, उतरता इत्यादी), छत कशाचे बनवले आहे (कॉंक्रीट, पत्रा, कौलं इत्यादी), जमिनीचे चढउतार, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता इत्यादी गोष्टींचा नीट अभ्यास करून जलसंधारण योजना आखणे आणि राबवणे हे यश मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या बाबी लक्षात घेऊन जर काम योग्य सल्ला आणि मार्गदर्शनाखाली केले तर वर्षभर पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करणे शक्य होते.

- डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०, 
(लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)

 

 

 

इतर ग्रामविकास
कन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...
लोकसहभागातून कुरण विकासाची गरजगवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत,...
मांडा जलसंधारणाच्या कामाचे गणितमागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील...
बहुवीध पीक पद्धतीतून चांडोलीच्या...चांडोली खुर्द (जि. पुणे) हे गाव १९८५ पर्यंत...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...
जीविधेची जाणीव करून देणारी आनंदशाळाशिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण...
योग्य पद्धतीने करा कूपनलिका पुनर्भरणमागच्या भागात आपण विहीर आणि कूपनलिका यांमधील फरक...
गटशेतीच्या सुलभ व्यवस्थापनासाठीशेतकरी गट स्थापन होऊन गटशेतीस सुरवात करताना पुढील...
गोष्ट तलावांचा श्वास मोकळा करण्याची...तलावांमध्ये बेशरम वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक...
भाजीपाला पिकातून कळवंडे झाले...रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव...
कोरडवाहूमध्ये कमी खर्चात उत्पादनासह...अवर्षण स्थितीमध्ये सर्वांत अधिक फटका हा कोरडवाहू...
विहीर अन्‌ कूपनलिका नेमकी कोठे खोदावी?आपल्या जागेमध्ये विहीर करायची की कूपनलिका करायची...
गटशेतीतील जबाबदाऱ्यांचे वाटपशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
सुधारित शेती, ग्रामविकासाच्या...लहान (ता.अर्धापूर, जि. नांदेड) गावातील...
भूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी...सध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर...
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...