स्वच्छ दूध उत्पादनासाठी उपयुक्त यंत्रणा...

दुधामध्ये स्निग्धांश, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे आणि पाणी यांचे प्रमाण मुबलक असल्याने सूक्ष्मजीवांची वाढ लगेच होते. पर्यायाने दूध लवकर नासते किंवा खराब होते. नुसते दूध विकण्यापेक्षा दुग्धजन्य पदार्थांतून अधिक नफा मिळतो.
Useful machines for clean milk production
Useful machines for clean milk production

दुधामध्ये स्निग्धांश, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे आणि पाणी यांचे प्रमाण मुबलक असल्याने सूक्ष्मजीवांची वाढ लगेच होते. पर्यायाने दूध लवकर नासते किंवा खराब होते. नुसते दूध विकण्यापेक्षा दुग्धजन्य पदार्थांतून अधिक नफा मिळतो. सध्या बाजारपेठेत प्रामुख्याने तूप, लोणी, दूध पावडर, दही, लस्सी, पनीर, खवा हे दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध आहेत. दूध काढण्यापासून ते दुग्धप्रक्रियेपर्यंत विविध यंत्रणांचा वापर वाढला आहे. दूध काढण्याचे यंत्र 

  • यंत्राला पेल्यासारखे चार भाग असतात. त्यांच्या तळाशी दूध वाहून नेणारी नळी जोडलेली असते. पेल्याच्या आतील भागास अस्तरासारखा रबराचा पडदा असून पेल्याची बाजू व हा पडदा यांमध्ये हवा सोडण्यासाठी व काढून घेण्यासाठी एका नळीची जोडणी केलेली असते. 
  • हे पेले दुधाळ जनावरांच्या चार आचळांना लावण्यात येतात. या नळीवाटे निर्वात पंपाच्या साहाय्याने आळीपाळीने निर्वात अवस्था व हवेचा दाब निर्माण होऊन एका मिनिटाला ४५ ते ५५ इतक्या स्पंदन क्रिया होतात. या क्रियांमुळे कासेतील दूध पेल्यामध्ये उतरते. पेल्यातील दूध नळीवाटे टाकीत नेले जाते.
  • गाळणी यंत्र 

  • दुग्धप्रक्रियालयामध्ये दुधावर होणारी ही पहिली प्रक्रिया आहे. गाळणी यंत्राची घडण व कार्य केंद्रोत्सारक यंत्राप्रमाणे असते.
  • एका बंद भांड्यामध्ये एकावर एक छिद्र असलेल्या तीन पट्ट्या जवळजवळ बसविलेल्या असतात. भांड्यांच्या तळाशी जोडलेल्या नळावाटे दूध आत आणले जाते. ते पट्ट्यांना असलेल्या छिद्रांमधून वर चढत जात असताना या पट्ट्या मिनिटाला ६,००० ते १०,००० फेऱ्या होतील अशा वेगाने फिरत असतात. यावेळी दुधातील केरकचरा मध्यापासून लांबवर फेकला जातो. स्वच्छ झालेले दूध भांड्यांच्या वरच्या बाजूस असलेल्या नळीवाटे बाहेर पडते.
  • दूध थंड करण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र  दूध अधिक काळापर्यंत टिकवताना दुधाच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात बदल होण्याची शक्यता असते. त्यामध्ये दुधातील सूक्ष्मजीवांची वाढ आणि संख्या मर्यादित ठेवणे आवश्‍यक असते. यासाठी दुधास थंड तापमानास ठेवून दूध अधिक काळापर्यंत टिकवणे सोयीचे व किफायतशीर ठरते. दुधाची चांगली गुणवत्ता राखण्यासाठी विविध यंत्रणांचा वापर केला जातो. फ्रिज  फ्रीजमध्ये दूध एक लिटरपासून ते २० लिटरपर्यंत ५ ते १० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवता येते. बाजारात १५० लिटर ते ५०० लिटर क्षमतेचे फ्रिज उपलब्ध आहेत. बल्क कुलर 

  • बल्क कुलर हे चौकोनी, आयताकृती आणि अंडाकृती आकारात उपलब्ध आहेत. हे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असते. बल्क कुलरमधील दूध थंड करण्यासाठी कॉम्प्रेसरची जोडणी केलेली असते.
  • बल्क कुलरच्या वरील बाजूस एक झाकणी असून, एक ढवळणीसुद्धा जोडलेली असते. या ढवळणीमुळे दुधाचे तापमान सर्व ठिकाणी समान राखले जाते. दुधावर साय येत नाही. बल्क कुलर हे दुहेरी पत्र्याचे बनवतात, आतील-बाहेरील पत्र्यांमध्ये थर्माकोल, ग्लासवुल किंवा इतर उष्णतारोधक पदार्थाचा लेप दिलेला असतो, त्यामुळे बल्क कुलरमधील दुधाच्या तापमानावर बाहेरील वातावरणातील तापमानाचा परिणाम होत नाही.
  • बल्क कुलर मध्ये दुधाचे तापमान ५ ते १० अंश सेल्सिअस राखता येत असल्याने दुधाची टिकवण क्षमता वाढते. दूध उत्पादकांकडे १०० ते १००० लिटरपर्यंतचे दूध संकलन आहे, अशांसाठी बल्क कुलर फायदेशीर आहे.
  • डीप फ्रिजर 

  • डीप फ्रिजरचा वापर आइस्क्रीम, पनीर, श्रीखंड व इतर दुग्धजन्य पदार्थ अधिक काळास साठवण्यासाठी व विक्रीसाठी केला जातो. यामध्ये ० अंश सेल्सिअस ते -२८ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान राखले जाते.
  • याची क्षमता १०० ते १००० लिटर किंवा अधिक असते. हे विजेवर चालते.डीप फ्रिजर हे स्टेनलेस स्टील किंवा फायबरमध्ये तयार केलेले असतात.
  • मिल्क प्लेट चिलर: चांगली गुणवत्ता राखण्यासाठी ४ अंश सेल्सिअस तापमानामध्ये दूध थंड करण्याचे काम मिल्क चिलरद्वारे केले जाते. त्यामध्ये स्टेनलेस स्टीलच्या प्लेट्स असून एका बाजूने थंड पाणी व दुसऱ्या बाजूने दूध प्रवाहित करून थंड करण्याचे कार्य केले जाते. संपर्क ः डॉ.अनिता चप्पलवार, ९५२०२४०५०९ (पशुजन्य पदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, पशुवैद्यक व पशूविज्ञान महाविद्यालय,परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com