परभणीतील तीन बंधाऱ्यांमध्ये उपयुक्त पाणीसाठा

परभणीतील तीन बंधाऱ्यांमध्ये उपयुक्त पाणीसाठा
परभणीतील तीन बंधाऱ्यांमध्ये उपयुक्त पाणीसाठा

परभणी : जायकवाडी प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील ढालेगाव, मुद्दगल, मुळी येथील उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

रविवारी (ता. २५) सकाळी सहा वाजता गंगाखेड येथील गोदावरी नदीपात्रात पाणी पोचले होते. तेथून हे पाणी डिग्रस बंधाऱ्याकडे झेपावणार आहे. बंधाऱ्यांतील पाण्यामुळे नदीकाठच्या तर कालव्याच्या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र येलदरी, सिद्धेश्‍वर, निम्न दुधना या प्रकल्पांमध्ये अद्याप उणे पाणीसाठा आहे.

जायकवाडी धरणातील पाण्याची आवक बंद झाली आहे. डाव्या कालव्याद्वारे १६००, उजव्या कालव्याद्वारे ९००, जलविद्युत केंद्रातून १५८९, दरवाज्याद्वारे नदीपात्रात ४१९२ असा एकूण ८ हजार २८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे रविवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत जायकवाडीतील पाणीसाठ्यात ८८.३९ टक्क्यांपर्यंत घट झाली होती.

जायकवाडी धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे ढालेगाव (ता. पाथरी) येथील उच्च पातळी बंधाऱ्यात ०.०८ टीएमसी (१७.६४ टक्के), मुद्दगल (ता. पाथरी) येथील बंधाऱ्यात ०.०९ टीएमसी (२२.६७ टक्के), मुळी बंधाऱ्यात (९.४४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता.

डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे झरी (ता. पाथरी) येथील लघू तलावामध्ये ०.०५ टीएमसी (८८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा जमा झाला होता. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे डिग्रस (ता. पालम) येथील बंधाऱ्यामध्ये २.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. यामुळे नदी काठच्या गावांचा पाण्याचा तसेच जनावरांचा पाणीप्रश्‍न तूर्त निकाली निघाला आहे.

तीन मोठे, दोन मध्यम प्रकल्पांत उणे पाणीसाठा

येलदरी धरणातील एकूण पाणीसाठ्यात ३.९२ टीएमसीपर्यंत वाढ झाली असली, तरी अजून या धरणात उणे १.७१ टक्के पाणीसाठा आहे. सिद्धेश्‍वर धरणात ३.९८ टीएमसी (उणे ५८ टक्के), निम्न दुधना प्रकल्पांत १.९४ टीएमसी (उणे १९.७३ टक्के) पाणीसाठा होता. करपरा (ता. जिंतूर) आणि मासोळी (ता. गंगाखेड) या दोन मध्यम प्रकल्पांत अजून उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध नाही. पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे पाण्याची आवक नाही. तापमानात वाढ झाल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. उपसा सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे या धरणांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमधील पाणीप्रश्‍न गंभीर झाला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com