agriculture news in marathi Valuation of agricultural commodities from the domestic processing industry | Agrowon

घरगुती प्रक्रिया उद्योगातून केले शेतीमालाचे मूल्यवर्धन

माणिक रासवे
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

परभणी जिल्ह्यातील माखणी (ता. पूर्णा) येथील जनार्दन बालासाहेब आवरगंड यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत झाले असले तरी आपली शेती, प्रक्रिया गृहउद्योगातून प्रगतीची वाट चोखाळली आहे.

परभणी जिल्ह्यातील माखणी (ता. पूर्णा) येथील जनार्दन बालासाहेब आवरगंड यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत झाले असले तरी आपली शेती, प्रक्रिया गृहउद्योगातून प्रगतीची वाट चोखाळली आहे. स्वतःच्या शेतातील आंब्यांचे गावरान लोणचे, कडधान्यापासून डाळी, तिळापासून उटणे, लाडू अशी उत्पादने ओंकार या नावाने शहर परिसरात थेट विकतात. प्रक्रिया उद्योगामुळे शेतमालाचे मूल्यवर्धन होत असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या अर्थकारणाला बळकटी मिळाली आहे.

परभणी शहरापासून २५ किलोमीटरवरील माखणी (ता. पूर्णा) हे गाव आहे. येथील जनार्दन बालासाहेब आवरगंड यांची वडिलांसोबत ८ एकर शेती आहे. सिंचनासाठी विहीर आणि बोअरवेल असल्याने त्यांच्याकडे दरवर्षी ३ एकर ऊस, एक एकर हळद यासोबत एक एकर आंबा, एक एकर क्षेत्रावर सीताफळ लागवड आहे. तीन एकर क्षेत्र कोरडवाहू असून त्यात खरिपात सोयाबीन, तीळ, कारळे, तूर तर रब्बी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभऱ्याचे उत्पादन घेतात.

शेतकरी गटामुळे प्रक्रिया उद्योगाला दिशा....
पाच वर्षांपूर्वीपर्यंत पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या जनार्दन आवरगंड यांनी तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी आणि शेतकरी गटांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शेती सेवा शेतकरी गटामध्ये सहभागी झाली. तेथील अनुभवी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचे विचार, चर्चा व अनुभवातून भरपूर काही शिकायला मिळाले. ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ॲड. गंगाधरदादा पवार यांनी प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन केले. या सर्वांच्या आग्रहातून परभणी येथील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ आणि निर्भय नारी फौंडेशन येथून जनार्दनराव आणि त्यांच्या पत्नी मीरा यांनी प्रक्रियेची प्रशिक्षणे घेतली. दरम्यान २०१४ मध्ये त्यांनी आंब्याच्या केशर जातीची १० झाडे, मल्लिका जातीची ४० झाडे, गावरान वाणांची ४० अशी एकूण ९० झाडांची लागवड केली. या आंब्याचे उत्पादन सुरू झाल्यानंतर फळे पिकवून विक्री करत. मात्र, त्यातून जेमतेम नफा मिळतो, असे लक्षात आल्यानंतर दोन वर्षापूर्वी त्यांनी पत्नी मीरा यांच्यासह परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित प्रक्रियेबाबतचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला. त्यांनी १५ शेतकरी सदस्यांना सोबत घेत आत्मा अंतर्गत ओंकार शेतकरी गटाची स्थापना केली. तर मीरा या महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत बळीराजा स्वयंसहाय्यता गट चालवतात. या दांपत्याने ओंकार नावाने गृह उद्योगाची नोंदणी केली असून, प्रक्रियेसाठी आवश्यक एफएसएसआयचा परवानाही मिळवला. ओंकार ब्रॅण्ड अंतर्गत गावरान पद्धतीने बनवलेले आंब्याचे लोणचे, विविध कडधान्यांच्या डाळी, तीळ, कारळे यांची पॅकिंग करून विक्री करतात.

गावरान लोणच्याला शहरवासीयांची पसंती...

 • कारळे, हळद, मीठ, मोहरी, मिरची पावडर, धने, जिरे, मिरे, लवंग, लसूण, हिंग, बडीशेप इ. घटकांचा वापर करत गाडग्यामध्ये लोणचे घातले जाते. अर्धा किलो वजनाची पॅकिंग केले जाते.
 • पहिल्याच वर्षी तब्बल साडेतीन क्विंटल आंबा लोणचे बनवून त्याची २०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली.
 • दुसऱ्या वर्षी आंब्याचे उत्पादन कमी आले. परिणामी एक क्विंटल आंबा लोणचे तयार करून, त्याची २५० रुपये किलो प्रमाणे विक्री केली.
 • या वर्षी लॉकडाऊनमुळे विक्री होईल, की नाही, याबाबत शंका वाटत होती. म्हणून केवळ ५० किलो लोणचे बनवले. मागणीनुसार हे लोणचे परभणी शहरामध्ये घरपोच दिले जाते.
 • केशर आणि मल्लिका जातीचे आंबे उसाच्या पाचटामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकविले जातात. यंदा दोन्ही जातीच्या मिळून १ क्विंटल आंब्याची १५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली.

जात्यावर तयार केलेल्या डाळींना मागणी...

 • ग्राहकांकडून हातसडीच्या डाळींची मागणीही येऊ लागली. मीरा या पूर्वीपासून घरगुती वापरापुरत्या मूग, तूर, हरभरा आदी कडधान्याच्या डाळी नेहमीच करत. यंदा विक्रीसाठी डाळी तयार करण्याचे नियोजन केले. प्रसंगी मागणी वाढल्यास मोबदला देत गावातील महिलांची मदत घेतली. या वर्षी ५ क्विंटल तूर, २ क्विंटल मूग डाळींची एक किलो
 • पॅकिंग केले. त्याची अनुक्रमे १४० रु व १५० रुपये या प्रमाणे विक्री केली. डाळीची वाढती मागणी लक्षात घेऊन नुकतीच त्यांनी घरगुती डाळ निर्मिती गिरणी खरेदी केली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार हातसडीची किंवा गिरणीवरील डाळ देणे शक्य होत आहे.

लाडू, उटणे यांची निर्मिती

 • मकर संक्रांती सणाला तिळाची मागणी असते. पूर्वी आवरंड हे तिळाची विक्री करत. मात्र, या वर्षी मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे लाडू बनवून त्याची विक्री केली. या उद्योगातून त्यांना ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. नुसतेच तीळ विकले असते तर केवळ १० हजार रुपये मिळाले असते.
 • आवरगंड यांच्याकडे बैलजोडी व गाय आहे. नागपूर येथील गोविज्ञान केंद्रामध्ये गो आधारीत उत्पादन निर्मितीचेही प्रशिक्षण घेतले. त्या आधारे त्यांनी उटणे बनवून त्याची विक्री केली. मुंबईतून आलेल्या मागणीनुसार होमासाठी गाईंच्या गोवऱ्यांची प्रत्येकी ५ रुपये या प्रमाणे विक्री केली.

सामाजिक माध्यमाद्वारे विक्री
परभणी जिल्ह्यातील विविध शेती पूरक उद्योग करणारे शेतकरी, शासकीय अधिकारी, डॉक्टर्स, प्राध्यापक व अन्य सरकारी कर्मचारी असलेल्या सामाजिक माध्यमातील गटामध्ये आपल्या शेती उत्पादनाची जाहिरात करत राहतात. त्यातून त्यांच्या सेंद्रिय पद्धतीने जोपासलेला आंबा, घरगुती व गावरान पद्धतीची चव यामुळे लोणच्याची मागणी वाढत आहे. सोबतच डाळी, कारळे व अन्य मागणीही घरपोच माल देऊन पुरवली जाते.

तीन एकर सेंद्रिय शेती
जनार्दन आवरगंड हे आत्मा अंतर्गत सेंद्रिय शेतकरी गटामध्ये सहभागी आहे. एकूण शेतीपैकी फळबाग आणि अन्य मिळून सुमारे ३ एकर क्षेत्र सेंद्रिय पद्धतीने जोपासतात. प्रक्रियेसाठी आवश्यक मूग, तूर, तीळ, कारळे, ज्वारी, गहू आदी अन्नधान्ये पिके सेंद्रिय पद्धतीने घेण्यावर त्यांचा भर असतो. गेल्या चार वर्षापासून सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक जीवामृत, दशपर्णी अर्क, आदी निविष्ठा शेतामध्ये तयार करतात. या वर्षी तांदळापासून ह्युमिक ॲसिड तयार करून वापरले.

शेतीकामे, विक्रीचा ताळमेळ
जनार्दन आवरगंड यांच्यासह त्यांच्या आई, वडील बालासाहेब, पत्नी मीरा या शेतामध्ये राबतात. पूर्वी ते गावात राहत मात्र, गावापासून शेत दूर असल्याने शेतामध्ये पक्के घर बांधले आहे. स्वतः जनार्दनराव सकाळी ६ ते १० पर्यंत शेतामध्ये काम केल्यानंतर ग्राहकांच्या मागणीनुसार दररोज किंवा एकदिवसाआड प्रक्रिया उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचवतात. मुलगा ओंकार बारावीला तर मुलगी शिवानी दहावीला आहे. या मुलांनीही लॉकडाऊनच्या काळात शेती व प्रक्रियेतील प्रत्येक कामात मदत केली. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे मीरा आवरगंड यांना सोयाबीन सेपरेटर यंत्र मिळाले आहे.त्यामुळे सोयाबीनच्या ४५ क्विंटल बियाण्याची विक्री शक्य झाली.

प्रक्रिया गृहउद्योगामुळे उत्पन्नाचा पर्याय

 • ३ एकर ऊस असून, एकरी ६० ते ६५ टन उत्पादन घेतात.
 • गेल्या ७ वर्षापासून हळदीचे एकरी १४ ते १५ क्विंटल उत्पादन घेत आहेत. यंदा हळदीमध्ये आंतरपीक म्हणून टरबूज घेतले होते. त्यातून १५ हजार रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळाले.
 • गतवर्षी आंबा लोणच्याचे ८० हजार रुपये तर या वर्षी २० हजार रुपये उत्पन्न मिळाले.
 • घरून तसेच घरपोच विक्री ः ४५ क्विंटल ज्वारीची विक्री २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल आणि ५ क्विंटल गव्हाची विक्री २ हजार २०० रुपये दराने केली.

संपर्क- जनार्दन आवरगंड, ९६५७२४०२६३
 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
औरंगाबाद जिल्ह्यात करटोलीची व्यावसायिक...कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील...
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कादे...योग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
भात शेतीला मिळाली कुक्कटपालनाची जोडनिवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) येथील मारुती सहदेव...
शेळी, कोंबडीपालनातून बसवली शेतीची घडीनेमके काय करायचे याची स्पष्टता असली की शेती किंवा...
गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना...कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक...
शाश्वत ग्राम, शेती अन कौशल्य विकासावर भरशाश्वत ग्रामविकास, शेती, आरोग्य, शिक्षण आणि...
एका वर्षात दुबार द्राक्ष काढणीचा ‘आरा...द्राक्षशेतीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जोखीम वाढत...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...