मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येत असू
कृषी प्रक्रिया
बीटपासून बनवा पराठा, पावडर, सूप
बीट ही भाजी तशी फार लोकांना आवडत नाही. मात्र, बीटचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी बीटचे सेवन केलेच पाहिजे. रक्तवाढीसाठी बीट हा उत्तम पर्याय आहे.
बीट ही भाजी तशी फार लोकांना आवडत नाही. मात्र, बीटचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी बीटचे सेवन केलेच पाहिजे. रक्तवाढीसाठी बीट हा उत्तम पर्याय आहे. बीटमध्ये ऊर्जा ४० कॅलरी, प्रथिने १ ग्रॅम, कार्बोहायड्रेट ६.४ ग्रॅम आणि तंतुमय ३.३ ग्रॅम असतात.
आरोग्यदायी फायदे
- बीट कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.
- काही लोकांना मधुमेहाचा आजार असल्यामुळे ते गोड पदार्थ खाऊ शकत नाहीत. मधुमेहाच्या रुग्णांसाठी बीट एक उत्तम पर्याय आहे. बीट खाल्याने रक्तातील साखरेचे पातळी वाढत नाही.
- गर्भवती महिला आणि बाळासाठी बीट अत्यंत फायदेशीर असते. यामध्ये फॉलिक आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बाळाच्या पाठीचा कणा मजबूत होण्यास मदत होते. तसेच महिलांना अतिरिक्त ऊर्जा मिळते.
- थकवा दूर करण्यासाठी बीटचा रस अत्यंत प्रभावी मानला जातो.
- उच्च रक्तदाबावर बीट रस गुणकारी असतो. दररोज किमान ५०० ग्रॅम बीट खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
- नियमित बीट रसाचे सेवन केल्यास मूत्र विसर्जनावेळी होणारी जळजळ कमी होते.
- केस गळतीवरही बीट रस फायदेशीर मानला जातो. मेहंदीमध्ये बीट रस मिसळून त्याचा वापर केल्यास केस गळती कमी होते.
- बद्धकोष्ठता आणि त्वचेच्या समस्येवर बीट उपयुक्त आहे. बीट रक्तशुद्धीकरण करते.
- बीटामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. यातील ॲंटीऑक्सिडंटमुळे शरीरात अनेक रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता तयार होते.
बीटपासून विविध पदार्थ
रस
साहित्य
बीट २, लिंबू १, मीठ अर्धा चमचा, काळे मीठ अर्धा चमचा, अर्धा चमचा भाजलेली जिरे पावडर, आवश्यकतेनुसार बर्फ, सजावटीसाठी लिंबू काप.
कृती
प्रथम बीट स्वच्छ धुवून सोलून घ्यावे. त्याचे बारीक तुकडे करावेत. गरजेनुसार पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. बारीक केलेले मिश्रण एका पातेल्यात काढून घ्यावे. त्यामध्ये लिंबू पिळून काळे मीठ, मीठ आणि भाजलेली जिरे पूड घालावी. तयार बीट रसामध्ये आवश्यकतेनुसार बर्फ घालावा.
पराठा
साहित्य
मध्यम आकाराचे १ बीट, चमचाभर तीळ, ३ ते ४ हिरव्या मिरच्या (भरड वाटून), बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, पाणी, चिमूटभर साखर, चवीप्रमाणे मीठ, हळद, हिंग.
कृती
बीट लहान आकाराच्या किसणीने किसून घ्यावे. त्यामध्ये तीळ, हळद, हिंग, मीठ, साखर, तेल, मिरची, कोथिंबीर आणि पाणी घालून मिश्रण चांगले एकत्रित करावे. आवश्यक तेवढी कणीक भिजवून १५ मिनिटे झाकून ठेवावी. कणीक भिजल्यानंतर त्याचे पातळ पराठे लाटावेत. पराठे मध्यम आचेवर भाजून त्यावर तूप सोडावे.
पावडर
साहित्य
मध्यम आकाराचे २ बीट
कृती
बीट धुवून सोलून घ्यावे. स्लाइसरच्या साह्याने त्याचे पातळ काप
करून बेकिंग ट्रे वर एक थर पसरून घ्यावा. थर वाळवण्यासाठी ओव्हनमध्ये कमी तापमानावर ठेवावे (कमी ऊन असलेल्या ठिकाणी किंवा फॅनखाली वाळवता येते). बीट चांगले सुकल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. तयार झालेली बीट पावडर हवाबंद डब्यात भरून कोरड्या ठिकाणी ठेवावा.
सुप
साहित्य
पाण्यात अर्धे कच्चे उकडलेले २ बीट, मोठ्या गाजराचे मध्यम आकाराचे तुकडे, आले, लसूण पाकळ्या ६ ते ७, उभा चिरलेला कांदा, बिया काढलेली एक हिरवी मिरची, ऑलिव्ह ऑइल, लिंबाची पाने २ (शिरेवर दुमडून अर्धा भाग करून शीर काढून टाकावी), हिरव्या लिंबाची किसलेली साल १ छोटा चमचा, व्हाइट व्हिनेगार २ चमचे, पांढरी मिरे पावडर, आवडीनुसार नारळाचे दूध, सजावटीसाठी कोथिंबीर.
कृती
ऑलिव्ह ऑईलमध्ये लसूण, आले, कांदा, बीट, गाजर, मिरची घालून परतून घ्यावे. भाज्या मऊ झाल्यानंतर त्यामध्ये व्हिनेगर, लिंबाची पाने आणि किसलेली साल घालावी. मिरेपूड, मीठ आणि आवडीनुसार इतर भाज्या घालाव्यात. मंद आचेवर भाज्या शिजण्यासाठी झाकण लावून ठेवाव्यात. भाज्या शिजवल्यानंतर थंड होण्यास ठेवाव्यात. तयार मिश्रण गाळून घ्यावे. गाळून घेतलेल्या भाज्या मिक्सरमधून फिरवून घ्याव्यात. गरजेनुसार थोडे पाणी टाकून त्यास उकळी द्यावी. मिश्रण मंद आचेवर ठेवून आवडीनुसार नारळाचे दूध घालावे. तयार गरम सूप कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
हलवा
साहित्य
मध्यम आकाराचे २ बीट, साखर १ वाटी, सायीसह दूध १ कप, वेलची पावडर, सुकामेवा, तूप १ चमचा.
कृती
बीटची साल काढून किसून घ्यावे. किस हाताने दाबून त्यातील रस पिळून काढावा. मंद आचेवर तव्यामध्ये तूप आणि किस टाकून परतून घ्यावे. किस मऊ झाल्यावर त्यामध्ये दूध घालून आटेपर्यंत शिजवावे. मिश्रणामध्ये साखर टाकावी. साखर विरघळेपर्यंत मिश्रण सतत हलवावे. तयार हलव्यामध्ये वेलची पूड, सुकामेवा घालावा.
टिक्की
साहित्य
बीट १, उकडलेले २ बटाटे, लाल मिरची पावडर २ चमचे, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला पावडर २ चमचे, रवा पाव वाटी, मैदा २ चमचे, चवीनुसार मीठ, लिंबू रस २ चमचा.
कृती
उकडलेल्या बीटावरील साल काढून किसून घ्यावे. त्यात बटाटे कुस्करून घालावे. तिखट, मीठ, आले-लसूण पेस्ट, मैदा, रवा, गरम मसाला पावडर घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. गोल चपट्या टिक्की रव्यात घोळवून घ्याव्यात. मंद आचेवर तव्यामध्ये तेल टाकून टिक्की दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावी. पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत टिक्की सर्व्ह करावी.
संपर्क- पल्लवी कांबळे, ८३२९३७५३९०
(आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड.