बटाट्यापासून वेफर्स, पावडर, फ्रेंच फ्राईज

बटाट्यापासून पापड, चकली, वेफर्स, फ्रेंच फ्राईज, बटाटा साबुदाणा मिक्स पापड असे विविध पदार्थ केले जातात. तसेच बटाट्यातील स्टार्चचा वापर वस्त्रोद्योगात केला जातो.
value added products of potato
value added products of potato

मानवी आहारामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. लवकर पचणारे अन्न म्हणून बटाटा ओळखला जातो. बटाट्यामध्ये ७५ टक्के पाणी आणि २० टक्के स्टार्च असते. बटाट्यापासून पापड, चकली, वेफर्स, फ्रेंच फ्राईज, बटाटा साबुदाणा मिक्स पापड असे विविध पदार्थ केले जातात. तसेच बटाट्यातील स्टार्चचा वापर वस्त्रोद्योगात केला जातो. बटाट्याची साठवण कालावधी सर्वात जास्त असतो. बटाट्याची साठवण शीतगृहात ४ अंश सेल्सिअस तापमान आणि ९० टक्के आर्द्रतेला केल्यास ६ ते ८ महिने चांगल्या स्थितीत राहतात. त्यामुळे यावर आधारित लघु उद्योग करण्यासाठी कच्चा माल दीर्घकाळ उपलब्ध राहू शकतो. प्रक्रिया करण्यासाठी बटाटे शक्यतो ताजे, टणक आणि आतील बाजूने पांढरे असावेत. पृष्ठभागावर सुरकुत्या पडलेले, आत पिवळसर आणि पृष्ठभागावर हिरवट रंग असलेले किंवा फुटलेले बटाटे प्रक्रिया करण्यासाठी वापरू नयेत. शीतगृहातील बटाट्यांचा प्रक्रियेसाठी वापर करण्यापूर्वी त्यांना सामान्य तापमानात ८ ते १० दिवस ठेवावे. म्हणजे त्यामधील साखरेचे प्रमाण कमी होऊन पदार्थ काळपट लाल पडणार नाहीत. प्रक्रियायुक्त पदार्थ  वेफर्स  वेफर्स तयार करण्यासाठी मानेला गोल आकाराचे ताजे पांढरे टणक बटाटे घ्यावेत. बटाट्यात साखरेचे प्रमाण कमी असल्यास उत्तम प्रतीचे वेफर्स तयार होतात. कृती  प्रथम बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. यंत्राच्या साह्याने बटाट्यावरील संपूर्ण साल काढून टाकावी. साल काढलेल्या बटाट्यांचे १ मिमी जाडीचे काप करावेत. तयार काप ५ टक्के मिठाच्या द्रावणात टाकावेत. काप तळण्यास घेण्यापूर्वी पुन्हा पाण्यात धुवून घ्यावेत. धुतल्यानंतर लगेच उकळत्या तेलात सोनेरी तांबूस होईपर्यंत तळून घ्यावेत. तयार वेफर्सवर मिठाच्या पाण्याचा फवारा मारल्यास उत्तम प्रतीचे वेफर्स तयार होतात. याशिवाय विविध मसाल्यांच्या मिश्रणाचा अर्क काढून फवारल्यास चव आणि रंग असलेले वेफर्स तयार होतात. तयार वेफर्स थंड झाल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये हवाबंद करून ठेवावे. पिशवीत बंद करताना सीलिंग यंत्राचा वापर करावा. वेफर्सबरोबर नायट्रोजन वायू भरून पिशव्या हवाबंद कराव्यात. पापड  बटाटे पापड तयार करण्यासाठी कोणत्याही आकाराचे बटाटे वापरता येतात. यामध्ये चवीसाठी मीठ, मसाले व कुरकूरीतपणासाठी मक्याचे पीठ मिसळावे. त्याचा यंत्राच्या साह्याने चांगला एकजीव लगदा करून घ्यावा. लगद्याचे गोळे तयार करून ठरावीक जाडीचे पापड लाटून घ्यावेत. लाटलेल्या चकत्या तेलात तळून घ्याव्यात. पावडर  पावडर तयार करण्यासाठी कोणत्याही आकाराचे ताजे बटाटे निवडावेत. बटाटे शिजवून त्यावरील सर्व साल काढून घ्यावी. साल काढल्यानंतर त्याचा लगदा करून घ्यावा. लगदा ड्रम ड्रायर किंवा कॅबिनेट ड्रायर यंत्राचा वापर करून पूर्ण वाळवून घ्यावा. वाळवल्यानंतर दळण यंत्रातून चांगले बारीक करून घ्यावे. तयार पावडर हवाबंद पिशवीत किंवा डब्यात साठवून ठेवावी. पावडरचा वापर बेकरी तसेच विविध प्रकारच्या कुरकूरे सारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. फ्रेंच फ्राईज  फ्रेंच फ्राईज हा बटाटा प्रक्रिया उद्योगातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. फ्रेंच फ्राईजला हॉटेलमध्ये मोठी मागणी असते. कृती  फ्रेंच फ्राईज करण्यासाठी मोठ्या व लांबट आकाराचे ताजे बटाटे निवडावेत. बटाटे पाण्याने स्वच्छ धुवून त्यावरील साल काढावी. सुरी किंवा विशिष्ट आकाराच्या यंत्राने त्याचे १ सेंमी जाड व ५-१० सेंमी लांब काप करावेत. तयार काप मीठ व कॅल्शिअम क्लोराइडच्या द्रावणात पाच मिनिटे बुडवून ठेवावेत. नंतर त्यामधील पाणी निथळून घ्यावे. काप तेलामध्ये तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यावेत. व्यापारी तत्त्वावर फ्रेंच फ्राईज करताना द्रावणातून काढून त्यावर पाच मिनिटे उकळत्या पाण्याची किंवा वाफेची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर अतिथंड वातावरणात ठेवून मागणीप्रमाणे तेलात तळून ग्राहकास दिले जाते. संपर्क- चंद्रकला सोनवणे, ८४०८९७०९३७ (के.एस.के. अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com