नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
कृषी प्रक्रिया
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थ
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला मोठा वाव आहे. यातून ग्रामीण गृह उद्योगापासून निर्यातक्षम उद्योग उभा राहू शकतो.
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला मोठा वाव आहे. यातून ग्रामीण गृह उद्योगापासून निर्यातक्षम उद्योग उभा राहू शकतो.
चिंचेचा (शा. नाव - टॅमॅरिंडस इंडिका) वापर विविध पदार्थांना चव आणण्यासाठी केला जातो. भारतीय स्वयंपाकांमध्ये पिकलेली चिंच किंवा चिंचेचा कोळ त्यासाठी प्राधान्याने वापरला जातो. विशेषतः दक्षिण भारतामध्ये सांबार, रसम, चटणी आणि वेगवेगळ्या आमट्यामध्ये चिंचेचा कोळ वापरला जातो. चिंच उत्पादनामध्ये मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, व कर्नाटक राज्ये अग्रेसर आहेत. भारताबाहेरही पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिकेमध्ये चिंचेला चांगली मागणी आहे. चिंचेपासून तयार केल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित पदार्थांची माहिती घेऊ.
गर
चिंच पिकल्यानंतर त्याच्या बिया काढून, चिंच वेगळी केली जाते. त्या लगद्याला गरम पाण्यामध्ये १ तासांसाठी ठेवले जाते. त्यानंतर त्या लगदा पल्परमध्ये (गर काढण्याचे यंत्र) टाकून त्यातील तंतूमय पदार्थ वेगळे केले जातात. त्या नंतर चिंचेचा पल्प तयार होतो. या पल्पाची साठवणूक आपण ५ अंश तापमानाला १ वर्षापर्यंत करता येते. लगद्यामध्ये साधारणपणे १२ टक्के तंतुमय पदार्थ फायबर असतात. यामध्ये असणारे पेक्टिन (जेली सारखा पदार्थ) उत्तम दर्जाचे असून याचा उपयोग चांगल्या प्रतीची जेली बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. चिंचेचा पल्पमध्ये कार्बोहायड्रेटस, प्रथिने मोठ्या प्रमाणात आहेत. तर जीवनसत्त्व, कॅराटिन, जीवनसत्त्व ब १, आणि निकोटिनिक ॲसिड थोड्या प्रमाणात असते.
अर्क
चिंचेचा एकाग्र किंवा तीव्र रस (ज्यूस कॉन्सट्रेट) बनविण्याची पद्धत केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था (सी.एफ.टी.आर.आय.) ने विकसित केली आहे. चिंचेचा गर घेऊन त्याला निर्वात बाष्पपात्राच्या (व्हॅक्यूम इव्हापोरेटर्स) साह्याने टीएसएस ६५ ते ६८ अंश सेल्सिअस ब्रिक्स येईपर्यंत आटवावे. अशा रसास अर्क म्हटले जाते. हा अर्क पुढे सिरप, सरबत तयार करण्यासाठी वापरला जातो. वापरताना हा अर्क गरम पाण्यामध्ये विरघळून घेतला जातो. या अर्काला परदेशात चांगली मागणी आहे.
बिया भुकटी
चिंच बियांची भुकटी बनविण्यासाठी चिंच बिया ड्रायरमध्ये ८ तासासाठी किंवा सूर्याच्या प्रकाशात ७ ते १० दिवस वाळवून घ्यावे. त्यानंतर हॅमर मिल (गिरणी) मध्ये बारीक केले जाते. चाळणीने चाळून ही भुकटी पुन्हा १ दिवस सूर्य प्रकाशामध्ये वाळवून हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवली जाते. कापड उद्योगामध्ये या भुकटीला मागणी असते. याचा क्रिमिंग एजंट म्हणून रबर चीक, माती स्थिरीकरणासाठी वापर होतो. त्याच प्रमाणे पेक्टिन घटकांना पर्यायी म्हणूनही वापर होतो.
चिंचेपासून अल्कोहोल (टार्टारेट पेक्टिन)
चिंचेच्या लगद्यापासून अल्कोहोल टार्टारेट आणि पेक्टिन तयार करण्याची एकात्मिक पद्धत आहे. चिंचेचा लगदा पुन्हा पुन्हा गरम पाण्यामधून वेगळा करून गाळून घ्यावा. त्यातून पोटॅशिअम बाय टार्टारेट वेगळे करता येते. फिल्टर केलेल्या लिक्विडला ‘सुपरटन्ट’ असे म्हणतात. हे सुपर टन्टपासून निर्वात स्थितीमध्ये तीव्र अर्क तयार केला जातो. अल्कोहोल मिसळून पेक्टिन वेगळे केले जाते. पेक्टिन वेगळे केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या फिल्ट्रेट मध्ये लिंबाचा रस (किंवा सायट्रिक ॲसिड) मिसळून कॅल्शिअम टार्टारेटचा साका तयार करता येतो. उरलेल्या फिल्ट्रेट शुगरमध्ये यीस्ट टाकून त्याचे किण्वन केल्यानंतर अल्कोहोल तयार होते.
सिरप
चिंचेचा सिरप बनविताना कच्च्या चिंचेचा वापर केला जातो. कच्च्या चिंचेचा लगदा गरम पाण्यामध्ये उकळवून तो सुती कपड्याने गाळून घ्यावा . त्यानंतर १०० मिली रसासाठी १ ग्रॅम बेकिंग सोडा घालावा. हा
रस निम्मा होईपर्यंत उकळवून घ्यावा. उकळलेला रस थंड झाल्यानंतर त्यावर तयार झालेला साका काढून टाकावा. रस पुन्हा गाळून घेऊन त्यामध्ये २० ग्रॅम साखर घालून परत २० मिनिटे उकळवून घ्यावे. नंतर थंड करून तो निर्जंतूक केलेल्या जारमध्ये भरून पॅक करून हवाबंद करावा.
लोणचे
लोणचे बनविण्यासाठी १ किलो चिंचा १२ तास पाण्यामध्ये भिजवून त्याचा लगदा वेगळा केला जातो. त्यांच्या बिया व तंतूमय भाग वेगळे करून घ्यावेत. त्यानंतर त्यामध्ये १ किलो साखर घालून हे मिश्रण ३५ ते ४० अंश तापमानाला ५ मिनिटे उकळले जाते. मिश्रणाला शिजवत असताना ढवळत राहावे. आपल्या चवीनुसार योग्य प्रमाणात (साधारण ३० ते ४० ग्रॅम) मसाले बारीक करून या मिश्रणामध्ये मिसळून घ्यावेत. हे मिश्रण परत एकदा ३० अंश तापमानाला १५ मिनिटे उकळून घ्यावे. त्यानंतर थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये पॅक करून हवाबंद केले जाते.
कॅण्डी
बिया वेगळ्या केल्यानंतर तयार झालेला १ किलो चिंचेचा लगदा घ्यावा. त्यात एक लिटर पाण्यामध्ये एक साखर मिसळून त्यापासून तयार केलेला पाक ओतावा. ३ दिवसांपर्यंत हा लगदा मुरू द्यावा. शेवटी उरलेला पाक वेगळा केला जातो. हा लगद्यापासून छोट्या छोट्या आकाराच्या गोळ्या बनवून घ्याव्यात. त्या एका बांबूच्या रॅकवर उन्हामध्ये १८ तासासाठी वाळवाव्यात. थंड झाल्यानंतर सेलोफेनमध्ये कॅण्डी पॅक केली जाते.
जॅम
जॅम बनविण्यासाठी १ किलो चिंचेचा लगदा १० मिनिटांसाठी उकळवून घ्यावा. २ किलो साखर व १ किलो चिंच पल्प या प्रमाणात ठेवून जाडसर मिश्रण तयार होईपर्यंत १० मिनिटे शिजवावे. शिजवताना हे मिश्रण तळाला लागू नये, यासाठी सतत ढवळत राहावे. या मिश्रणाला जॅमची एकजिवता मिळाल्यानंतर थंड होऊ द्यावा. हे मिश्रण निर्जंतूक केलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून हवाबंद करावे.
संपर्क- सचिन शेळके, ८८८८९९२५२२
(आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सॅम हिग्निनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश.