पीकविमा भरपाईच्या रकमेमध्ये तफावत
पीकविमा भरपाईच्या रकमेमध्ये तफावत

बुलडाणा : पीकविमा भरपाईच्या रकमेमध्ये तफावत

बुलडाणा  ः जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळू लागली आहे. मात्र, ही भरपाई असमान असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे. याबाबत शेतकऱ्यांकडून जिल्हा कृषी अधीक्षकांपासून तर थेट कृषिमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या जाऊ लागल्या आहेत. २०१९ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. अतिपावसामुळे जिल्ह्यात साडे चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला तडाखा बसलेला आहे. याबाबत शासकीय यंत्रणांचाही वस्तुनिष्ठ अहवाल होता. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांचे पूर शेतांमधून वाहल्याने सोयाबीन, मूग, उडदाच्या सुडी वाहून गेल्या होत्या. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मदत दिली जात आहे. परंतु, दोन लगतच्या महसूल मंडळात वेगवेगळा पीकविमा मिळाल्याने शेतकरी नाराज आहेत.  संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा महसूल मंडळातील  शेतकऱ्यांनी तर थेट कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे तक्रार केली. जोपर्यंत तफावत दूर होत नाही तोवर तालुक्यात पीकविमा रकमेचे वितरण करू नये अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली. 

कृषी अधीक्षकांचे कंपनीला पत्र पीकविमा वाटपात असलेल्या तफावतीबाबत शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेत त्यांनी विमा कंपनीला या तफावतीबाबत पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले की, सोनाळा महसूल मंडळातील सोयाबीन या पिकाचा ८२८ शेतकऱ्यांनी ८९५.५७ हेक्टरचा पीकविमा काढला होता. परंतु, मंजूर पीक विम्यानुसार त्यांना प्रतिहेक्टरी ६७६६ रुपये एवढी नुकसानभरपाई मिळाली आहे.  सोयाबीन पिकाचे १०० टक्के नुकसान झालेले असताना व याच तालुक्यातील इतर महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मंजूर झालेली असताना सोनाळामध्ये कमी रक्कम कशी मंजूर केली याची विचारणा केली आहे. या तक्रारीवर तत्काळ कार्यवाही करून सविस्तर अहवाल सादर करावा. शेतकरी योग्य नुकसानभरपाईपासून वंचित राहिल्यास, भविष्यात अडचणी उद्‌भवल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com