वाहत्या वाऱ्यामुळे तापमानात चढ-उतार

temperature
temperature

पुणे: पूर्व मोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला असल्याने विदर्भात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. अरबी समुद्रावरून वाहणारे जोरदार वारे, ढगाळ हवामान यामुळे कमाल व किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. पावसाला पोषक हवामान असल्याने पूर्व विदर्भात धुळीच्या वावटळी, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  पश्चिमी चक्रावातामुळे राजस्थान आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहत आहेत. या वाऱ्याबरोबरच बाष्पाचा पुरवठा होत आहे. मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत असलेल्या खंडित वाऱ्यांच्या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे आणि अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांचा मध्य आणि पूर्व भारतात संगम होत आहे. यामुळे पोषक स्थिती निर्माण होऊन विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवसात पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, जिल्ह्यात वादळी तर नागपूर चंद्रपूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.  कमाल तापमान कमी अधिक होत असून, बुधवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूरसह परभणी, नगरमध्ये तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले आहे. उत्तर कोकणातील डहाणू, मध्य महाराष्ट्रातील, नाशिक, निफाड, महाबळेश्वर, विदर्भातील गोंदिया येथे कमाल तापमान ३० अंशांच्या खाली आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. किमान तापमानात वाढ झाली असून, धुळे आणि निफाड येथे नीचांकी १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.   बुधवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.६(१७.८), नगर ३६.२(१४.९), धुळे ३३.० (१४.०), जळगाव ३३.६(१७.०), कोल्हापूर ३४.०(१८.९), महाबळेश्‍वर २६.६(१४.०), मालेगाव ३४.४ (१६.८), नाशिक २७.४(१५.८), निफाड २७.०(१४.०), सांगली ३४.५(१९.०), सातारा ३२.८(१७.९), सोलापूर ३६.८(२२.०), अलिबाग - (२१.५), डहाणू २९.१ (२१.४), सांताक्रूझ ३०.५(२१.३), रत्नागिरी ३०.९(२२.१), औरंगाबाद ३२.६(१७.४), परभणी ३६.१(२१.७), नांदेड ३४.०(२१.६), अकोला ३५.६(२२.१), अमरावती ३४.४(२१.०), बुलडाणा ३०.८(१७.८), चंद्रपूर ३२.५(२१.०), गोंदिया २७.०(१७.०), नागपूर ३३.५(१९.४), वर्धा ३३.०(२०.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com