कोरडवाहू शेतीसाठी विविध पीकपद्धती

कोरडवाहू शेतीमध्ये कोणत्याही एका पिकाचा विचार करण्यापेक्षा कौटुंबिक गरज आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या शाश्वत पीकपद्धतीचा विचार केला पाहिजे. सर्वसाधारणपणे दुबार किंवा बहुविध पीक पद्धत, मिश्र पीक पद्धत, पट्टापेर, साखळी आणि आंतरपीक या पद्धती प्रचलित आहेत.
Intercropping method is beneficial  in dryland
Intercropping method is beneficial in dryland

कोरडवाहू शेतीमध्ये कोणत्याही एका पिकाचा विचार करण्यापेक्षा कौटुंबिक गरज आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या शाश्वत पीकपद्धतीचा विचार केला पाहिजे. सर्वसाधारणपणे दुबार किंवा बहुविध पीक पद्धत, मिश्र पीक पद्धत, पट्टापेर, साखळी आणि आंतरपीक या पद्धती प्रचलित आहेत.

जमीन, हवामान विशेषतः पर्जन्यमान आणि सिंचन सुविधांच्या उपलब्धतेनुसार पिकांची रचना आणि त्यानुसार शेती व पीक पद्धत ठरवली जाते. अलीकडे बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी, हंगामानुसार मिळणारा दर, साठवण, वाहतूक, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनास वाव या बाबीही पीकपद्धती ठरविण्यास कारणीभूत ठरतात. मात्र, कोरडवाहू शेती संपूर्णतः निसर्गावर अवलंबून असते. तिथे पीकपद्धती आणि पीक रचना बदलण्यास खूप मर्यादा येतात. अशा ठिकाणी शाश्वत ठरतील, अशा पीक पद्धतींचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांच्या कौटुंबिक गरजा आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल. दुबार किंवा बहुविध पीक पद्धती या पद्धतीत एक वर्षात पहिले पीक निघाल्यानंतर त्याच शेतात दुसरे आणि शक्य असेल तर दुसऱ्यानंतर तिसरे पीक घेतले जाते. खोल कसदार जमीन आणि हमखास पाऊस पडणाऱ्या विभागात किंवा सिंचन सुविधा असल्यास या पीक पद्धतीचा अवलंब केला जातो. उदा. मुग, उडीद, घेवडा, तीळ, सोयाबीन यासारख्या कमी कालावधीच्या खरीप पिकानंतर रब्बी हंगामात रब्बी ज्वारी, करडई, हरभरा, सूर्यफूल, रब्बी मका, गहू इ. पिके घेतली जातात. मिश्र पीक पद्धती या पीक पद्धतीत दोन किंवा अधिक पिकाचे बियाणे ठरावीक प्रमाणात एकत्र करून पेरणी केली जाते. त्यामुळे प्रत्येक ओळीत कमी-अधिक प्रमाणात मिश्रण केलेली सर्व पिके वाढतात. या पद्धतीचे काही फायदे असले तरी तण नियंत्रण, पीक संरक्षण, आंतरमशागत, पीक काढणी यामध्ये अडचणी येतात. परिणामी ही पद्धत सध्या शेतकरी फारशी वापरत नाहीत. मात्र, हलक्या-उथळ आणि कमी उत्पादकता असणाऱ्या जिरायत शेतीत तिचा अवलंब केला जातो. पट्टापेर पद्धत या पीक पद्धतीत हलक्या आणि चढ-उताराच्या जमिनीत बाजरी, नाचणी, राळा, वरई, कोद्रा, तृणधान्ये, मटकी, कुलथी, चवळी यासारख्या पिकामध्ये जमीन झाकणाऱ्या कडधान्याचे पट्टे पेरले जातात. उतारास आडवे तृणधान्यानंतर कडधान्याचा पट्टा असे एक आड एक पट्टे पेरल्याने जमिनीची धूप कमी होते. जमिनीचा ओलावा अधिक काळ टिकून राहतो. तृणधान्य -कडधान्याच्या एकत्रित येण्याने जमिनीची सुपीकता टिकून राहते. एकूण उत्पादनात वाढ होते. साखळी पीक पद्धत पहिले पीक काढणीस तयार होण्यापूर्वीच पिकाच्या दोन ओळीत दुसऱ्या पिकाच्या बियाण्याची टोकण केली जाते किंवा रोपे लावली जातात. पहिले पीक तयार होत असताना शेवटच्या दोन तीन आठवड्यात त्याला ओलाव्याची गरज नसते. अशा वेळी जमिनीतील ओलाव्याचा बाष्पीभवनाद्वारे अपव्यय होत असतो. शिवाय पहिले पीक निघाल्यानंतर दुसऱ्या पिकासाठी मशागत करत असताना आणि दुसऱ्या पिकाची उगवण आणि वाढ होऊन जमीन झाकली जाईपर्यंत सूर्यप्रकाशामुळे जमिनीतील ओलावा फारच कमी होतो त्याची झळ पुढील पिकास बसते. शिवाय एकानंतर दुसरे पीक घेण्याने एकूण कालावधी वाढतो. आंतर पीक पद्धत

  • भारतातील शेतीमध्ये कोरडवाहू शेतीचे क्षेत्र सुमारे ६८ टक्के आहेत, तर हे प्रमाण राज्यात ८५ टक्क्याच्या आसपास आहे. बहुतांश शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही. त्याकरिता खालील बाबीचा विचार करावा. कमी पाऊसमानाच्या प्रदेशात / परिस्थितीत कमी कालावधीत तयार होणारे पिकांचे वाण, पिके ( मुग, उडीद) यांची आंतरपीक पद्धतीत निवड करावी.
  • अधिक पाऊसमानाच्या प्रदेशात जमिनीवर पसरून वाढणारी व कमी उंचीचे पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास जमिनीची धूप कमी होते. आंतरपिकाच्या पसरणाऱ्या मुळामुळे पाण्याचा निचरा देखील लवकर होऊन जमीन लवकर वापशावर येते.
  • हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणारी पिके उदा. भुईमूग, मुग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आंतरपिकात असावा. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जमिनीतील सूक्ष्मजिवांवर अनुकूल परिणाम होतो.
  • मुख्य पीक आणि आंतरपीक यांच्या मुळसंस्था जमिनीच्या वेगवेगळ्या थरांमध्ये पसरणाऱ्या असाव्यात. उदा. कपाशीची सोटमूळ हे जमिनीच्या खालच्या थरातून अन्नद्रव्य पाणी शोषून घेते, तर आंतरपीक मुग, उडीद यांची तंतुमय मूळे जमिनीच्या वरच्या थरातून अन्नद्रव्ये आणि पाणी शोषून घेते.
  • मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांशी जमीन, हवा, सूर्यप्रकाश, पाणी, अन्नद्रव्य इ. विविध नैसर्गिक घटकांसाठी स्पर्धा करणारे नसावेत. मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांना पूरक असे निवडल्यास जास्त उत्पादन आणि नफा देणारे ठरते.
  • आंतरपीक म्हणून खादाड पिके उदा. सूर्यफूल, मका यांचा समावेश टाळावा.
  • आंतर पीक फायदेशीर

  • सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यास कमी कालावधीत येणारी आंतरपिके निश्चित उत्पादन देतात.
  • सरासरी पेक्षा जास्त किंवा अतिवृष्टी झाल्यास धूपरोधक आंतरपिके जमिनीची धूप कमी करतात. पाण्याचा निचरा लवकर होतो.
  • सरासरी पेक्षा जास्त किंवा कमी पाऊस झाला तरी आंतरपीक पद्धतीमुळे शेतकऱ्यास काहीतरी हमखास उत्पादन हाती येऊ शकते.
  • जमिनीची जैविक, भौतिक व रासायनिक सुपीकता टिकून ठेवण्यास मदत होते.
  • बदलत्या हवामानाच्या दुष्परिणामाची तीव्रता कमी करून जमीन, पाणी, सूर्यप्रकाश यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन होते.
  • जमिनीचा प्रकार आणि सरासरी पाऊसमान यानुसार ठरवा आंतरपिके

  • मध्यम तसेच भारी जमिनीत-  कापूस, तूर, खरीप ज्वारी व सोयबीन यासारखी पिके घ्यावीत.
  • मध्यम जमिनीत  - सूर्यफूल , तूर,बाजरी,सोयबीन व खरीप ज्वारी यासारखी पिके घ्यावीत.
  • लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. बियाण्याचे योग्य प्रमाण ठेऊन बीज प्रक्रिया करावी.
  • दोन ओळीमध्ये योग्य अंतर ठेऊन, एकरी रोपांची संख्या प्रमाणात ठेवावी.
  • मुख्य पिकासाठी शिफारस केलेली रासायनिक खताची पूर्ण मात्रा अधिक क्षेत्रानुसार आंतरपिकासाठी शिफारस केलेली रासायनिक खताची मात्रा द्यावी. उदा. सोयबीन + तूर (४:२ या प्रमाणात) आंतरपीक पद्धती असल्यास ३३ टक्के क्षेत्रावर तुरीचे पीक येते. तुरीसाठी शिफारशीत केलेली ३३ टक्के रासायनिक खताची मात्रा द्यावी.
  • एकात्मिक अन्नद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापन वेळेवर आंतरमशागत करून तण नियंत्रण करावे.
  • आंतरपीक पद्धतीमध्ये मुख्य पीक तसेच आंतरपीक यांच्या सुधारित, जास्त प्रतिसाद देणाऱ्या रोग प्रतिकारक्षम आणि लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी.
  • संपर्क- डॉ. एस. एस. विटनोर, ९५२७६७५१०३ डॉ. डी. जी. इंगोले, ८९५६८३३८८९ व्ही. एम. भराडे, ९०९६९५८२३३ (सहायक प्राध्यापक, छत्रपती शाहू महाराज, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, औरंगाबाद.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com