नाशिकला उणे पाच अंश तापमान, तळेगावला ७२ मिलिमीटर पाऊस !

हवामान
हवामान

पुणे: भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) नाशिक येथील स्वयंचलित हवामान केंद्राकडून उपलब्ध आकडेवारीनुसार नाशिक येथे गुरुवारी (ता. २७) उणे पाच अंश (-५) किमान तापमानाची, तर तळेगाव (जि. पुणे) येथे ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली अाहे. हवामानविषयक बाबींच्या नोंदींची विश्‍वासार्हता वाढविण्यासाठी अत्याधुनिक सेन्सरच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीने नोंदी घेण्यात येतात. मात्र या नोंदी चुकीच्या येणार असतील तर यावर विश्‍वास ठेवायचा कसा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. हवामान विभागाकडून देशाच्या विविध ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे (AWS) बसविण्यात आली अाहेत. महाराष्ट्रातही या केंद्रांच्या माध्यमातून दररोज २४ तासातील कमाल, किमान तापमान, पाऊस, सापेक्ष आर्द्रता, हवेचा दाब आदी नोंदी घेतल्या जातात. aws.imd.g०v.in या संकेतस्थळावर या नोंदींची माहिती उपलब्ध होते. गेले काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून या संकेतस्थळावर चुकीच्या नोंदी येत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत अाहे. १८ डिसेंबर रोजी राहुरी (जि. नगर) येथे १.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदल्याचे संकेतस्थळावर नमूद करण्यात आले होते. याच दिवशी राहुरी येथील कृषी विद्यापीठामध्ये १२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली हाेती. गुरुवारी (ता. २७) उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट आली. निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे यंदाच्या हंगामातील निचांकी १.८ तापमानाची नोंद झाली. तर नाशिकमध्ये ५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र हवामान विभागाच्या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या संकेतस्थळावर अजब नाेंदी पहायला मिळाल्या. इतिहासात प्रथमच नाशिक येथे उणे पाच अंश सेल्सिअसची नोंद दाखविण्यात आली. विशेष म्हणजे राज्यात मुख्यत: निरर्भ व कोरडे हवामान असताना पुण्यातील तळेगाव येथे ७२ मिलिमीटर पावसाची नोंद दाखविण्यात आली. हवामान विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच असलेल्या आकडेवारीने स्वयंचलित हवामान केंद्रांच्या नोंदीवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले अाहे. सेन्सरमध्ये बिघाड झाल्याने नोंदीत तफावत स्वयंचलित हवामान केंद्रांच्या नाेंदीबाबत हवामान विभागाच्या सूत्रांशी संपर्क साधला असता, सेंसरमध्ये बिघाड झाल्याने किंवा केंद्राकडून सर्व्हरकडे डाटा पाठविताना तांत्रिक अडथळे आल्याने ही आकडेवारी आली असेल, तसेच केंद्रामध्ये विद्युत भार कमी अधिक झाला तरी अशी तफावत होऊ शकते. नोंदीची तफावतीची फेर पडताळणी केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com