चिंच प्रक्रियेसाठी बहुपयोगी यंत्रे

चिंच गर काढण्यासाठी पुर्णपणे स्वयंचलीत यंत्र उपलब्ध आहे.चिंचेचा गर गरम करण्यासाठी व बाष्पीभवनाद्वारे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी स्टीम जॅकेटेड कॅटल या यंत्राचा वापर होतो. त्याच प्रमाणे एक समान उष्णता आणि वाफेद्वारे चिंचेचे निर्जंतुकीकरण केले जात असल्याने गर अधिक काळ टिकतो.
various machines in Tamarind processing
various machines in Tamarind processing

चिंच गर काढण्यासाठी पुर्णपणे स्वयंचलीत यंत्र उपलब्ध आहे.चिंचेचा गर गरम करण्यासाठी व बाष्पीभवनाद्वारे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी स्टीम जॅकेटेड कॅटल या यंत्राचा वापर होतो. त्याच प्रमाणे एक समान उष्णता आणि वाफेद्वारे चिंचेचे निर्जंतुकीकरण केले जात असल्याने गर अधिक काळ टिकतो.   चिंच प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक बहुतांश सर्व यंत्रे ही ५ ते ६ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होतात. प्रक्रिया यंत्रांसाठी २० फूट बाय २० फूट शेड किंवा मोकळी जागा पुरेशी आहे. चिंचेपासून गर, प्युरी, केक, पावडर इ. पदार्थ बनवून त्याचे मुल्यवर्धन शक्य आहे.   चिंचेचे टरफल काढणारे यंत्र (डिहलिंग) 

  • चिंचेच्या प्रक्रियेमध्ये टरफल काढण्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता भासते. वाळलेल्या चिंचेचे टरफल वेगळे करण्यासाठी यंत्र बाजारात उपलब्ध आहे.
  • या यंत्राला २६० व्होल्ट इतक्या उर्जेची आवश्यकता असून, ते सिंगल फेज किंवा थ्री फेज अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहे. वजन सुमारे ६० ते ७० किलो आहे. हे यंत्र एक व्यक्ती चालवू शकते. ४०० किलो प्रति तास क्षमतेच्या यंत्राची किंमत ४० हजार रुपयांपासून पुढे आहे.
  • बिया वेगळे करणारे यंत्र (डिसिडींग)

  • या यंत्रामध्ये हळू फिरणारे दोन स्टेनलेस स्टीलचे रोलर असतात. एक स्थिर बार (छोटा हातोडा) असतो. चिंच स्टेनलेस स्टीलच्या रोलरमध्ये घातल्यानंतर आतील तीक्ष्ण ब्लेडमुळे उभी कापली जाते. रोलर फिरत असतान त्यावर लावलेला बार दाबला जातो. त्यामुळे चिंचेतील बिया बाहेर टाकल्या जातात. चिंच पुढील बाजूने बाहेर काढली जाते. सुट्या झालेल्या चिंचेच्या बिया काढून बादलीमध्ये साठवल्या जातात. बिया विरहित चिंचा ट्रेमध्ये जमा केल्या जातात.
  • एक व्यक्ती ताशी ४० ते ५० किलो चिंचाच्या बिया काढू शकतो. या यंत्रासाठी ३ एचपी विद्यूत मोटार लागते. त्यातही सिंगल हेड व डबल हेड असे दोन प्रकार उपलब्ध आहेत. थ्री फेजवर चालणाऱ्या या यंत्रासाठी ४ फूट बाय ४ फूट जागा पुरेशी असून, वजन ८० ते ९० किलो असते.
  • उष्णतारोधक साठवण टाकी (इन्सुलेटेड स्टोरेज टॅंक)

  • संपूर्णपणे स्टेनलेस स्टिलपासून बनलेल्या या उष्णतारोधक टाकीचे उभे आणि आडवे असे दोन प्रकार आहेत.त्यात दोन थर असून बाह्य वातावरणापासून आतील तापमान कमी किंवा अधिक ठेवता येते. प्रामुख्याने याचा वापर शीतकरणासाठी केला जातो.
  • या यंत्राची क्षमता १००० लिटर व त्यापेक्षा अधिक असते. त्यानुसार त्याच्या किंमती १ लाख रुपयांपासून पुढे आहेत. साध्या टाक्यांच्या तुलनेमध्ये गराची टिकवणक्षमता यात अधिक असते. प्रत्येक वापराआधी टाकी चांगल्या प्रकारे धुवून घेणे गरजेचे असते.
  • चिंचेपासून गर काढणारे यंत्र (पल्पर)

  • मसाला उद्योगासाठी पेस्ट, साॅस,  ज्यूस, प्युरी अशा प्रक्रिया पदार्थासाठी चिंचेच्या गराची आवश्यकता असते. गर काढण्यासाठी पुर्णपणे स्वयंचलीत यंत्र उपलब्ध आहे. टरफल काढलेली चिंच किचिंत ओलसर करुन फीड हॉपरमध्ये टाकली जाते. आतील फीड रोलर्सच्या साह्याने चिंच फिरवली जाते. ब्लेडने चिंच कापून एकमेकांविरुद्ध दिशेने फिरणाऱ्या दोन रोलर्समध्ये चिंचेचा गर घट्ट दाबला जात एका भांड्यामध्ये जमा होतो. चिंचेच्या बिया व तंतुमय भाग रोलर्समधून पुढील बाजूला ढकलला जातो.
  • सिंगल फेजवर चालणाऱ्या या यंत्रासाठी १ व ३ एचपी क्षमतेची मोटार लागते.  २२० व्होल्ट ऊर्जेवर चालणाऱ्या यंत्रापासून एका मनुष्याच्या मदतीने प्रति तास १०० ते १५० किलो चिंच गर वेगळा केला जातो. त्याचे वजन ४० ते ५० किलो आहे. क्षमतेनुसार यंत्राची किंमत ७० हजार रुपयांपासून पुढे आहे.
  • गर भरणी यंत्र

  • हे यंत्र गर, चटणी, साॅस, जॅम, प्युरी, सीरप, लस्सी, श्रीखंड इ. पदार्थ पाऊच, बाटल्या किंवा कपामध्ये भरण्यासाठी वापरतात. हाॅपरमधून प्युरी न्युमॅटिक प्रेशर फिंलीगकडे पाठवली जाते. तेथे त्यावर दाब दिला जाऊन वजन किंवा आकारमानाप्रमाणे योग्य तेवढा भाग बाटलीमध्ये भरला जातो.
  • अचूक वजनासाठी यामध्ये स्क्रू स्टाॅप कॅलिब्रेटेड स्केल असते. यात आकारमानानुसार ५० मिली ते १००० मिलीपर्यंत गर किंवा द्रव भरता येतो. याद्वारे एक मिनिटामध्ये १५ बाटल्या भरता येतात. संपुर्ण स्वयंचलीत यंत्राची क्षमता ६०० लिटर प्रति तास असून, वजन ६५ किलो आहे. किंमत ८० हजार रुपयांच्यापुढे आहे.
  • यात माणसांद्वारे चालवण्याचे यंत्रही उपलब्ध असून, त्याच्या किंमती २० हजार रुपयांपासून पुढे आहे. यंत्राला २३० व्होल्ट ऊर्जा लागते. त्याची दाब रचना ०.४ ते ०.६ एमपीए आहे. याद्वारे आपणास १० मिली पासून ते १००० मिली पर्यंत बाटल्या भरता येतात. यंत्राचे वजन सुमारे ४० किलो आहे.
  • बाष्पीभवन किटली (स्टीम जॅकेटेड कॅटल)

  • चिंचेचा गर गरम करण्यासाठी व बाष्पीभवनाद्वारे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी या यंत्राचा वापर होतो. त्याच प्रमाणे एक समान उष्णता आणि वाफेद्वारे चिचेंचे निर्जंतुकीकरणही केले जात असल्याने गर अधिक काळ टिकतो. या किटलीमध्ये अंतर्गंत भाग आणि बाह्य जॅकेट असे दोन भाग असतात. बाहेरून जोडलेल्या बॉयलरद्वारे आतील पोकळ भागात वाफ सोडली जाते. वाफ नियंत्रित ठेवण्यासाठी प्रेशर गेज आणि सेफ्टी वॉल्व असतात.
  • किटली ही एसडब्ल्यूजी स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली असते. या किटल्या आपल्या आवश्यकतेनुसार ५० लिटरपासून १००० लिटर प्रति तास क्षमतेच्या उपलब्ध आहेत. या किटलीला १ एचपी क्षमतेची विद्यूत मोटार जोडलेली असते. २२० होल्ट्स, थ्री फेजवर हे यंत्र चालते. अर्ध स्वयंचलीत यंत्र स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असते. त्याची किंमत ५० ते ६० हजार रुपयांपासून पुढे आहे.
  • चिंचेची भुकटी करणारे यंत्र  

  • विविध मसाले किंवा प्रक्रिया पदार्थांमध्ये चिंचेच्या भुकटीचा वापर केला जातो. यासाठी बिया काढलेली चिंच उन्हामध्ये ८ ते १० दिवस वाळवून, भुकटी करणाऱ्या यंत्राद्वारे दळून घेतली जाते.
  • हे अर्ध स्वयंचलित पल्व्हरायझर पुर्णपणे स्टेनलेस स्ट्रीलचे बनवले जाते. २४० होल्ट ऊर्जा, सिंगल फेजवर चालणाऱ्या या यंत्राची क्षमता १० ते २५० किलो प्रति तास आहे. या यंत्रासोबत १० किलोची स्टीलची साठवणूक टाकी खालील बाजूला जोडलेली असते. या पल्व्हरायजरची किंमत ३५ हजार रुपये आहे. हे बहुपयोगी यंत्र असून, त्यात चिंच भुकटी सोबत सर्व प्रकारचे मसाले, डाळी, गहू, तांदूळ, बाजरी, मका, नाचणी बारीक करु शकतो.
  • चिंचेचे ठोकळे

  • पारंपरिक पद्धतीमध्ये चिंचेचे गोळे बनवून ते साठवले जातात. मात्र, अलिकडे यंत्राच्या साह्याने चिंचेचे साधारण अर्धा किलो वजनाचे ठोकळे बनवले जातात. बिया काढलेल्या या चिंचेच्या ठोकळ्यापासून विविध प्रक्रिया पदार्थ तयार करणे सोपे पडते.  
  • चिंचेचा ठोकळा बनवणारी यंत्रे स्वयंचलीत व मॅन्युअली अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत. यात ५०० ग्रॅम क्षमतेच्या साच्यामध्ये बिया विरहित चिंच टाकली जाते. त्यावर हायड्रॉलिक पद्धतीने दाब टाकला जातो. थ्री फेज, २२० ते २४० व्होल्टवर चालणाऱ्या यंत्राची क्षमता ताशी २०० किलो आहे. यामध्ये मनुष्यबळावर चालणारे यंत्रही उपलब्ध आहे
  • संपर्क- सचिन शेळके, ८८८८९९२५२२ (आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सैम हिग्निनबाॅटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तरप्रदेश.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com